Tarun Bharat

चीनमध्ये लसींच्या चाचणीस प्रारंभ

Advertisements

चीनमधील एक हजार वैज्ञानिकांकडून एकत्रित प्रयत्न : जगभरात 1 लाख 20 हजार 438 जणांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत 19 लाख 34 हजार 754 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 20 हजार 438 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 56 हजार 776 जणांना कोरोनाच्या संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. चीनने कोरोना संसर्गावरील उपचारासाठी दोन लसींच्या क्लीनिकल ट्रायल्सना मंजुरी दिली आहे. दोन्ही लसी चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुप अंतर्गत वुहान इन्स्टीटय़ूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि सिनोवॅक बायोटेक या बायोफार्मास्युटिकल कंपनीकडून विकसित केल्या जात आहेत. चीन, युरोप आणि अमेरिका यांच्यात कोरोनावर सर्वप्रथम लस तयार करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. सुमारे एक हजार चिनी वैज्ञानिक कोरोनावरील लस तयार करण्याच्या मोहिमेत सामील झाले आहेत.

कोरोना स्वाईन फ्ल्यूपेक्षा घातक

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला स्वाईन फ्ल्यूपेक्षा 10 पट अधिक घातक ठरविले आहे. तसेच टाळेबंदी किंवा अन्य निर्बंध अचानक न हटविण्याचा सल्ला दिला आहे. हा विषाणू गर्दीयुक्त भागांमध्ये अधिक वेगाने फैलावतो आणि याचा संसर्ग रोखण्यासाठी बाधितांची ओळख पटविणे, तपासणी आणि त्याच्या संपर्कात येणाऱया प्रत्येक व्यक्तीला वेगळे करण्याची गरज असल्याचे उद्गार संघटनेचे महासंचालक गेब्रियेसस यांनी काढले आहेत.

न्यूयॉर्कमध्ये 10 हजारपेक्षा अधिक बळी

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 23 हजार 644 जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील 10 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू केवळ न्यूयॉर्कमध्येच झाला आहे. तर देशातील रुग्णांची संख्या 5,87,173 झाली आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 1 लाख 95 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत सोमवारी 1535 जणांचा मृत्यू झाला तर 26 हजार 641 नवे रुग्ण सापडल्याने संकटाची तीव्रता कायम राहिली आहे.

प्रसारमाध्यमांवर भडकले ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना विषाणूसंबंधी वृत्तांकनावरून प्रसारमाध्यमांवर भडकल्याचे दिसून आले. त्यांनी सीबीएस वाहिनीच्या पत्रकार पाउला रीड यांच्या एका प्रश्नावर तुम्ही खोटारडय़ा आहात आणि तुमचे पूर्ण वृत्तांकन बनावट असल्याचे सुनावले. व्हाइट हाउस टास्क फोर्सच्या पत्रकार परिषदेत रीड यांनी फेब्रुवारी महिन्यात कोरोना रोखण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलीत असा प्रश्न ट्रम्प यांना विचारला होता.

आयएमएफचे 25 देशांना पॅकेज

आयएमएफने 25 देशांना तत्काळ मदतनिधी देणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तान, बेनिन, बुर्किना फासो, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चाड, कॉमोरॉस, काँगो, द गांबिया, गुनिया, गुनिया-बिसाए, हैती, लायबेरिया, मादागास्कर, मलावी, माली, मोझाम्बिक, नेपाळ नायजर, रवांडा, साओ टोमे आणि प्रिंसिपे, सियारा लियोन, सोलोमन आयलँड, ताजिकिस्तान, टोगो, येमेन यांचा यात समावेश आहे.

ब्रिटनमध्ये 7 मेपर्यंत टाळेबंदी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये टाळेबंदीचा कालावधी 7 मेपर्यंत वाढविला जाणार आहे. ब्रिटनचे विदेशमंत्री डॉमिनिक रॉब गुरुवारी याची अधिकृत घोषणा करतील. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याने रॉब हे देशाची धुरा सांभाळत आहेत. ब्रिटनमध्ये सध्या आवश्यक सामग्रीची खरेदी, वैद्यकीय मदत, काम आणि व्यायाम करण्यासाठी एका घरातून एकाच व्यक्तीला दिवसभरात बाहेर पडता येते. ब्रिटनमध्ये सोमवारी 717 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 342 नवे रुग्ण सापडले आहेत.

इटलीत 20 हजारांहून अधिक बळी

इटलीत सोमवारी 566 जणांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर देशातील एकूण बळींची संख्या 20,465 झाली आहे. 20 हजारांपेक्षा अधिक बळींप्रकरणी अमेरिकेनंतर इटली दुसरा देश ठरला आहे. रविवारी इटलीत 466 जणांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी 3153 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 59 हजार 516 झाली आहे.

तुर्कस्तानात कैद्यांची मुक्तता होणार

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तुर्कस्तानात हजारो कैद्यांची मुक्तता केली जाणार आहे. या निर्णयाकरता मंगळवारी संसदेत विधेयक संमत करविण्यात आले आहे. परंतु दहशतवादाचा आरोप असणाऱया कैद्यांचा यात समावेश नसेल. या कायद्याच्या अंतर्गत देशात सुमारे 45 हजार कैद्यांना तात्पुरत्या स्वरुपात सोडले जाणार आहे. तुर्कस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 1296 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 61 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.

दक्षिण कोरियात 15 रोजी निवडणूक

कोरोना महामारीदरम्यान दक्षिण कोरियात 15 एप्रिल रोजी 300 जागांवर निवडणूक होणार आहे. दक्षिण कोरियात निवडणूक कधीच स्थगित झालेली नाही आणि कोरोनामुळे देखील ती रोखली जाणार नाही. श्रीलंका, ब्रिटन आणि इथियोपिया समवेत सुमारे 47 देशांनी कोरोनामुळे निवडणूक स्थगित केली आहे. तर अमेरिका आणि न्यूझीलंड निवडणूक पुढे ढकलण्यासंबंधी विचार करत आहेत.

पोर्तुगाल, स्पेनची सीमा बंद

पोर्तुगाल आणि स्पेनने कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता स्वतःची सीमा 15 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेन सरकारच्या समन्वयासह सीमेवर नियंत्रण तसेच बंदी एक महिन्याने वाढविल्याची माहिती पोर्तुगालचे गृहमंत्री एडुआर्डो कॅब्रिटा यांनी दिली आहे. या कालावधीत आवश्यक सामग्रीचे वाहन किंवा आवश्यक कामासाठी प्रवास करणाऱयांनाच सीमा ओलांडण्याची अनुमती असेल.

Related Stories

इटलीतील ज्वालामुखी पर्वत होतोय उंच

Amit Kulkarni

ऑफिसमध्येच थाटले बिऱहाड

Patil_p

नेपाळच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

Patil_p

भारतीय वंशाच्या महिलेकडे नासाची धुरा

Patil_p

मेक्सिकोमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 19 लाख 57 हजार 889 वर

Rohan_P

पाकिस्तानी विद्यार्थ्यांचे भवितव्य चीनमुळे टांगणीला

Amit Kulkarni
error: Content is protected !!