Tarun Bharat

चीनमध्ये लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

Advertisements

मंजुरीपूर्वीच घेतला निर्णय : रशियाच्या एक पाऊल पुढे चीन : अतिजोखिमयुक्त लोकांना मिळाला पहिला डोस

चीनने मंजुरीपूर्वीच लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. ही लस चीनच्याच एका कंपनीने तयार केली आहे. लस व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत ही मंजुरी देण्यात आल्याचा दावा चिनी अधिकाऱयाने केला आहे. या कायद्यानुसार आजाराच्या अतिजोखिम शेणीत येणाऱया लोकांना मंजुरीपूर्वीच लस दिली जाऊ शकते.

चीनमध्ये जुलैपासूनच लोकांना लस दिली जात असल्याचा कयास आहे. यापूर्वी रशियाने स्पुतनिक-5 या लसीची तिसरी चाचणी पूर्ण होण्यापूर्वीच त्याची नोंदणी करविली होती. याचबरोबर लसीच्या निर्यातीचीही तयारी सुरू केली आहे.

आपत्कालीन वापराची योजना

चीनमध्ये कोराना वॅक्सिन डेव्हलपमेंट टास्क फोर्सचे प्रमुख झेंग झोंगवे यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे, परंतु यासाठी बचावाचीही योजना तयार करण्यात आली आहे. आम्ही अनेक योजना आखल्या असून यात 4 बाबींचा समावेश असल्याचे झेंग म्हणाले.

अन्य देशांमध्ये चाचण्या

लस तयार करणारी चिनी कंपनी सिनोफार्मने पेरू, मोरक्को आणि अर्जेंटीनामध्ये लवकरच तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी हिवाळय़ात महामारी रोखण्याची योजना आताच आखली जाणार आहे. लस उपलब्ध करण्याची व्याप्ती वाढविली जाईल, विशेषकरून खाद्यबाजार आणि वाहतुकीशी संबंधित लोकांना यात सामावून घेतले जाणार असल्याचे झेंग म्हणाले.

महिन्यापूर्वीच लसीचे सादरीकरण

झोंगवे यांच्यानुसार एक महिन्यापूर्वीच 22 जुलै रोजी अधिकृतपणे कोविड-19 लसीला आपत्कालीन वापरासाठी सादर करण्यात आले होते. यादरम्यान चाचण्या सुरूच होत्या. लस देण्यात आलेल्या काही जणांमध्ये रिऍक्शनचे सौम्य संकेत दिसून आले होते, परंतु कुणालाही ज्वर आला नाही.

किती जणांना डोस

लसीचा आपत्कालीन वापर केल्या जाणाऱया लोकांची संख्या हजारापर्यंत पोहोचू शकते. अनेक क्षेत्रांमध्ये लसीचा डोस मोफत उपलब्ध केला जात आहे. परंतु किती जणांना डोस देण्यात आला याची अचूक माहिती दिली जाऊ शकत नाही. सैन्याने स्वतःची आकडेवारी प्रसिद्ध केली नसल्याचे विधान शांघायच्या इम्यूनोलॉजिस्ट ताओ लिन यांनी केले आहे.

ऑकलंडमध्ये टाळेबंदीत वाढन्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ऑकलंडमधील टाळेबंदी 1 आठवडय़ासाठी वाढविण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. सुमारे 2 आठवडय़ांपूर्वी नवे बाधित समोर आल्यावर देशात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. याची मुदत 26 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार होती. पुढील काळात दुसऱया टप्प्यातील टाळेबंदी लागू होणार आहे. लोकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करता येणार असला तरीही मास्क परिधान करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असल्याचे पंतप्रधान आर्डर्न यांनी सांगितले आहे.

ब्लडप्लाज्मास मंजुरी

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन विभागाने कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी ब्लड प्लाज्माच्या वापरास मंजुरी दिली आहे. विभागाकडून आपत्कालीन स्थितीत याच्या वापराच्या मंजुरीचा आदेश काढला आहे. आपल्या सूचनेनुसारच एफडीएफने हा निर्णय घेतल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

मुलांना शाळेत पाठवा

पुढील आठवडय़ापासून मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे. मुलांना शाळेपासून अधिक दिवसांपर्यंत दूर ठेवणे विषाणूपेक्षाही अधिक नुकसानदायक आहे. आमची मुले स्वतःच्या वर्गात परतावीत आणि स्वतःच्या मित्रांसोबत त्यांनी शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

चीन : स्थानिक संसर्ग नाही

चीनमध्ये सलग 8 व्या दिवशी देशांतर्गत संसर्गाचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. मागील 24 तासांत देशात 16 बाधित सापडले असले तरीही ते सर्व अन्य देशांमधून पोहोचलेले लोक होते. देशात आतापर्यंत 84 हजार 967 रुग्ण सापडले असून 4,634 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सरकारने बीजिंग समवेत अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. बीजिंगच्या लोकांसाठी आता मास्कचा वापर अनिवार्य नाही. तेथील अम्यूजमेंट पार्क सुरू करण्यात आले असून लोक मोठय़ा संख्येत पोहोचून पार्टी करत आहेत.

फ्रान्समध्ये संसर्ग तीव्र

फ्रान्समध्ये मागील 24 तासांमध्ये 4,900 रुग्ण सापडले आहेत. मे महिन्यानंतर एका दिवसात सापडणाऱया रुग्णांचे हे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आरोग्यमंत्री ओलिवर वेरन यांनी दिली आहे.  40 ते 60 या वयोगटात हा संसर्ग 4 पट अधिक वेगाने फैलावत आहे. तरुणवर्ग हा आजार वृद्धांपर्यंत फैलावू शकतो.

सोलमध्ये मास्क आवश्यक राजधानी सोलमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय दक्षिण कोरियाने घेतला आहे. सोलमध्ये सर्व इनडोअर आणि आउटडोअर ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य असेल. मे महिन्यात सरकारने शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा आणि टॅक्सीतून प्रवास करताना मास्क वापरणे अनिवार्य केले होते.  

Related Stories

‘पराभव झाला तर देश सोडावा लागेल’

Patil_p

85 देशांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट

datta jadhav

कमला हॅरिस दीड तासांसाठी झाल्या राष्ट्राध्यक्ष

datta jadhav

अविवाहित पुरुषांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीचे निधन

Patil_p

रशियन दुतावासाबाहेर काबूलमध्ये स्फोट

Patil_p
error: Content is protected !!