Tarun Bharat

चीन पुन्हा आक्रमक

Advertisements

चीन पुन्हा भारतासह जगाला ताप देणार असा स्पष्ट संकेत मिळू लागला आहे. गेली साधारण दोन वर्षे लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. चीनने भारतीय सीमेत घुसखोरी केली आणि भारताचा 1300 चौरस किलोमीटरचा प्रदेश बळकावला, अशी हाकाटी गेल्या वर्षी आपल्याच काही कथित विचारवंतांनी पिटली होती. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे, अशी एक भ्रामक भावना त्यांना देशात निर्माण करायची होती. तथापि, चीनला भारताच्या नियंत्रणातील सीमारेषेत घुसखोरी करु देण्यात आलेली नसून भारत आणि चीन यांच्या सेनांच्या मध्ये जी ‘नो मॅन्स लँड’ (रिकामी जागा) असते तेथे चीनने घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सेनेनेही तशाच प्रकारे पुढे सरकत चीनला रोखले, असे स्पष्टीकरण सेनाधिकारी आणि सामरिक तज्ञांनी केल्यानंतर या हेतुपुरस्सर करण्यात येत असलेल्या अपप्रचारातील हवा निघून गेली. त्यामुळे गेले काही महिने तो थंड पडल्याचे दिसून येते. तथापि, लडाखच्या सीमेवर तणावर आहे आणि त्याचे पर्यवसान युद्धाचा भडका उडण्यात होऊ शकते, हे नाकारले जाऊ शकत नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये चीनने लडाखमध्ये आणखी सैन्य आणले असून शस्त्रास्त्रे आणि बांधकामेही वाढविली आहेत, असे वृत्त आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही तशीच तयारी चालविली आहे. हे योग्यच आहे. तथापि, आता चीनची मुजोरी केवळ भारताच्या विरोधात सुरु आहे असे नसून त्याने तैवानचा घास घेण्याचीही तयारी चालविली असल्याचे दिसून येते. चीनमध्ये डावी क्रांती झाल्यानंतर तेथील राजघराण्याने चीनजवळच्याच तैवान या बेटावर आपले बस्तान बसविले. कालांतराने तैवानने अमेरिकेच्या साहाय्याने मोठी आर्थिक प्रगती साध्य केली. आज तो आर्थिकदृष्टय़ा प्रगत देशांमध्ये समाविष्ट केला जातो. त्या देशाचे दरडोई उत्पन्न चीनपेक्षाही काही पटींनी जास्त आहे. तथापि, तैवान हा आपल्याच देशाचा भाग आहे, असा चीनचा दावा प्रथमपासून आहे. तैवानच्या पाठीशी अमेरिका उभी असल्याने थेट सेना पाठवून तो देश ताब्यात घेणे चीनला अद्याप जमलेले नाही. त्याने तसा प्रयत्न केल्यास तैवानच्या संरक्षणार्थ अमेरिका आणि मित्रदेशांना पुढे यावे लागेल आणि जागतिक युद्धाचा भडका उडणे अशक्य नाही. चीन हा शांततावादी देश नाही. त्यामुळे अशा युद्धाचे त्याला वावडे नाही. पण युद्धाचा सर्वात विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. चीनला त्याची अर्थव्यवस्थाही सांभाळायची असल्याने थेट युद्धाला उतरताना त्यालाही दहा वेळा विचार करावा लागणार हे निश्चित आहे. तथापि, गेल्या काही दिवसात चीनने तैवानच्या आकाशात आपली युद्ध विमाने बऱयाच वेळा पाठविली आहेत. या विमानांनी तैवानवर बाँबफेक केलेली नसली तरी हा त्या देशावर दडपण आणण्याचा हा प्रयत्न आहे. बऱया बोलाने आमच्यात समाविष्ट व्हा, अन्यथा आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, तैवानला दाखवून देणे एवढाच उद्देश चीनच्या या आक्रमक हालचालींमधून सध्यातरी दिसून येतो. अर्थात, चीनी नेतृत्वाची एकंदर कार्यशैली पाहता यात आश्चर्य असे काहीच नाही. आक्रमकपणा हा चीनी धोरणाचा कणा आहे. त्यामुळे शेजारी देशांवर सातत्याने दबाव ठेवणे आणि त्यांना नमते घेण्यास भाग पाडणे, हे प्रयत्न तो देश करीत राहणार हे उघड आहे. तैवानचे सध्याचे नेतृत्व या दादागिरीसमोर झुकण्यास तयार नाही. भारतानेही लडाखमध्ये हाच बाणा दाखविला आहे. चीनच्या कलाने घेण्याऐवजी भारतानेही चीनी सेनेच्या नाकासमोर आपले तोडीस तोड सैन्य उभे केल्याने भूमीविस्ताराचे आपले ध्येय सहजगत्या साध्य होणार नाही, याचा अनुभव चीनला आला आहे. अशा प्रकारे तैवान आणि भारत अशा दोन्ही आघाडय़ांवर एकप्रकारे चीनची काहीशी कोंडीच झाली आहे, असे म्हणता येते. त्यामुळे त्याचा जळफळाट अधिकच होत असून तो दोन्ही देशांवर अधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. मात्र, चीनचे हे आव्हान केवळ भारत आणि तैवान यांच्यासमोर नसून ते चीनला रोखू पाहणाऱया प्रत्येक देशासमोर आहे. यात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील इतर छेटे देश या सर्वांनाच चीनसंबंधी गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. कारण आज भारत आणि तैवानच्या उंबरठय़ावर असणारा चीन या देशांनाही तितकाच घातक ठरु शकतो. चीनची भूमीची, बळाची आणि वर्चस्वाची भूक कधी भागेल असे वाटत नाही. जगावर आपला प्रभाव सातत्याने ठेवायचा असेल आक्रमक धोरण सोडून चालणार नाही, ही त्या देशाची भावना असल्याचे स्पष्ट समजून येते. आता प्रश्न विश्व समुदाय काय आणि कसे करणार हा आहे. एकत्रितरित्या चीनसमोर आव्हान निर्माण केल्याखेरीज पर्याय नाही. गेल्या 50 वर्षांमध्ये चीनने आपल्या डाव्या तत्वज्ञानाच्या विपरीत चाणाक्षपणे आर्थिक धोरण स्वीकारुन आपली प्रचंड आर्थिक प्रगती करुन घेतली आहे. भारताप्रमाणे निरुपयोगी समाजवादी विचारसरणीच्या मागे न लागता, त्याने व्यवहारवादाची कास धरुन हे साध्य केले आहे. आर्थिक प्रगतीबरोबरच प्रचंड असे सामरिक सामर्थ्यही त्याने प्राप्त केले आहे. तसे असले तरी सर्व संबंधित देश त्याच्यासमोर एक विचाराने उभे राहिले तर तो फारसे काही करु शकणार नाही, हे ही तितकेच खरे आहे. एकटय़ा भारताला नमवणेही चीनला असे होणार नाही. कारण सामर्थ्य कितीही असले तरी परिस्थितीवर यश अवलंबून असते. त्यामुळे भारतानेही गेली दोन वर्षे जसा निर्धार दाखविला आहे, तोच यापुढेही सातत्याने ठेवावा लागणार आहे. कारण त्याच्या समोर जितके नमते घेतले जाईल, तितकी त्याची महत्वाकांक्षा वाढतच जाणार. त्यामुळे सर्व शक्ती पणाला लावून आणि इतर देशांशी सहकार्य वाढवून भारताला चीनचे आव्हान पेलावे लागणारच आहे. भारताला यासाठी सातत्याने आपले सामरिक सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय राजकीय कौशल्य चोखपणे उपयोगात आणावे लागणार आहे.

Related Stories

गोव्याची बदनामी आणखी कितीवेळा?

Patil_p

कोकणात पूररेषांचा जीवघेणा खेळ!

Patil_p

सवयीचे गुलाम होताना…

Patil_p

यम

Patil_p

लडाख सांगा कुणाचे…

Patil_p

देहात असूनही देहबुद्धी नसणे हेच मुक्ताचे लक्षण

Patil_p
error: Content is protected !!