Tarun Bharat

चीन महापुराच्या विळख्यात

25 हून अधिक बळी ः अनेक शहरे जलमय ः प्रचंड वित्तहानी

बीजिंग / वृत्तसंस्था

मागील आठवडय़ातच जर्मनीसह युरोपमध्ये महापुरात शेकडो बळी गेलेले असतानाच आता चीन पुराच्या विळख्यात अडकला आहे. चीनमध्ये कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक शहरांना महापुराचा फटका बसला आहे. बऱयाच ठिकाणी सखल भाग जलमय झाला असून प्रचंड आर्थिक नुकसानही झाले आहे. महापुरात 25 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. गेल्या 100 वर्षातील ही मोठी पूरहानी असल्याचा दावा केला जात आहे.

महापुराच्या विळख्यात अडकलेल्या अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कित्येक लोक बेपत्ता असून मदत व बचावकार्यानेही वेग घेतला आहे.

आयफोनसाठी जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱया मध्यवर्ती चिनी शहराला सर्वाधिक फटका बसला आहे. जवळपास 12.4 लाख लोकांना या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच 1 लाख 60 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. विविध भागात विक्रमी पावसाची नोंद झाली असून सखल भाग पूर्णपणे जलमय झाले आहेत. पूरस्थितीने तीव्र स्वरुप धारण केले असून अनेक रस्त्यांना समुद्राचे रुप आले आहे. सर्वत्र पाणी तुंबल्याने लोकांना हालचाल करणेही कठीण झाले आहे. अनेक भागात दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत.

मेट्रोसह रस्ते वाहतूक कोलमडली

 पुरामुळे रस्ते भरल्यामुळे अनेक वाहने वाहताना किंवा पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. मेट्रो स्टेशनचे पाण्याच्या तलावात रुपांतर झाले असून अनेक मेट्रो रेल्वेही पाण्यात अडकल्या आहेत. मोठय़ा पुरामुळे लोक भुयारी रेल्वेस्थानक आणि शाळांमध्ये अडकले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर प्रशासनाला बससेवा बंद ठेवावी लागली. रस्ते पाण्याने भरल्यामुळे बस वाहतूक ठप्प झाली असून मेट्रो सेवाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. भुयारी रेल्वेच्या बोगद्यात पाणी साचल्यामुळे मेट्रो वाहतूकही कोलमडली आहे. या आपत्तीमुळे बचावासाठी लोक पाण्यातूनच मार्ग काढताना दिसत आहेत.

बाजारपेठांसोबत रहिवासी भागही पूरमय

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बऱयाच लोकांना त्यांच्या कार्यालयात रात्री मुक्काम करावा लागला. हेनान प्रांताची राजधानी झेंगझोऊ येथे मंगळवारी सायंकाळनंतर मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. संततधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. शहरातील बाजारपेठ, आस्थापने आणि रहिवासी भागही पाण्याने भरलेले दिसत आहेत, असे चीन सरकारच्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

हवाई सेवाही विस्कळीत

बचाव आणि मदत कार्यासाठी पोलिसांपासून अग्निशमन दलाकडे आणि स्थानिक प्रशासनापर्यंतचे पथक रात्रंदिवस काम करत आहेत. याशिवाय या पावसामुळे हवाई सेवेवरही परिणाम झाला असून 260 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बुधवारी रात्री हेनान प्रांतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय हेनानची राजधानी झेंगझोऊ येथे संततधार सुरूच असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Stories

सरकारी शाळांसाठी यंदा 6,601 वर्गखोल्या बांधणार

Patil_p

सूरतमध्ये रसायनगळती, 6 जणांचा ओढवला मृत्यू

Amit Kulkarni

कोरोनामुळे जीव गमाविणाऱया पत्रकारांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत

Patil_p

पीएफआयला इस्लामिक स्टेटचे समर्थन

Patil_p

‘डेल्टा’विरोधात फायझर, मॉडर्नाचा प्रभाव कमी

datta jadhav

मोठा निर्णय! प्रथमच इंजिनिअरिंग क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांची कर्नल पदावर पदोन्नती

Archana Banage