Tarun Bharat

चेन्नई सुपरकिंग्स चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन्स!

मागील हंगामातील अपयशाची पुरेपूर भरपाई! एकतर्फी फायनलमध्ये केकेआरचा 27 धावांनी फडशा

दुबई / वृत्तसंस्था

मागील हंगामात साखळी फेरीतच गारद झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदा मात्र केकेआरवर खणखणीत विजय संपादन करत आयपीएल इतिहासात चौथ्यांदा जेतेपद काबीज करण्याचा पराक्रम गाजवला. प्रारंभी, प्लेसिसच्या 92 धावांच्या झंझावाती खेळीमुळे 3 बाद 192 धावांचा डोंगर रचल्यानंतर चेन्नईने केकेआरला 20 षटकात 9 बाद 165 धावसंख्येवर रोखले आणि विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. धोनीचे कल्पक नेतृत्व या लढतीचे आणखी एक ठळक वैशिष्टय़ ठरले.

विजयासाठी 192 धावांचे खडतर आव्हान असताना केकेआरतर्फे शुभमन गिल व वेंकटेश अय्यर यांनी 10.4 षटकात 91 धावांची खणखणीत सलामी दिली. पण, त्यानंतर सुनील नरेन (2), मॉर्गन (4), दिनेश कार्तिक (9), शकीब हसन (0), राहुल त्रिपाठी (2) हे फलंदाज अगदी दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत आणि यानंतर केकेआरचा संघ जेतेपदापासून कित्येक दूर राहणार, हे स्पष्टच होते. शेवटच्या टप्प्यात लॉकी फर्ग्युसन 11 चेंडूत 18 धावांवर नाबाद राहिला तर मावीने 13 चेंडूत 20 धावा केल्या. 

डेव्हॉन ब्रेव्होच्या डावातील शेवटच्या षटकात 31 धावांची गरज असताना केकेआरचे 8 फलंदाज एव्हाना तंबूत परतले होते आणि याही षटकात काही चमत्कार घडण्याची सुतराम शक्यता नव्हती. अपेक्षेप्रमाणे, फर्ग्युसन व मावी फारसे काही करु शकले नाहीत आणि चेन्नईने सहज विजयासह आयपीएल जेतेपदाचा चौकार ठोकला.

प्लेसिसची फटकेबाजी

तत्पूर्वी, या महत्त्वपूर्ण लढतीत मॉर्गनने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर डय़ू प्लेसिसने 59 चेंडूत 86 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या फटकेबाजीमुळेच चेन्नईला 192 धावांची जोरदार मजल मारता आली.

37 वर्षीय प्लेसिसने रॉबिन उत्थप्पा (15 चेंडूत 31) व मोईन अली (20 चेंडूत नाबाद 37) यांच्यासह दमदार भागीदारी साकारली. माजी आफ्रिकन कर्णधार प्लेसिसला डावीतल तिसऱया षटकात दिनेश कार्तिककडून सोपे जीवदान मिळाले. कार्तिकने प्लेसिसला यष्टीचीत करण्याची सोपी संधी दवडली. त्याचा लाभ घेत प्लेसिसने 7 चौकार व 3 षटकार फटकावले. त्याने विशेषतः फर्ग्युसनचा बराच समाचार घेतला. फर्ग्युसनला 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 56 धावा मोजाव्या लागल्या.

‘फ्लेवर ऑफ द सीझन’ ऋतुराजने येथेही 27 चेंडूत 32 धावांचा दमदार स्टार्ट दिला. यामुळे, चेन्नईला 8 षटकात 61 धावा जोडता आल्या. रॉबिन उत्थप्पाने पहिल्या चेंडूपासूनच तुटून पडण्यावर भर देत 15 चेंडूत जलद 31 धावा फटकावल्या. अवघ्या 5.2 षटकात 63 धावा फलकावर लागलेले असताना केकेआर गोलंदाजीत अपयशी ठरत असल्याचे चित्र होते. सुनील नरेन (4 षटकात 2-26) वगळता त्यांचा एकही गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना रोखू शकला नाही.

त्यातच मोईन अलीच्या (20 चेंडूत नाबाद 37) फटकेबाजीने केकेआरला आणखी घायाळ करुन सोडले. मोईनची फटकेबाजी बहरत असल्याचे पाहत प्लेसिसने देखील त्याला अधिक स्ट्राईक देण्याचा निर्णय घेतला. या जोडीने 6.3 षटकातच 68 धावा जोडल्या. कार्तिकने यष्टीचीतची संधी दवडल्यानंतर शकीबला पुढे अजिबात सूर सापडला नाही. फर्ग्युसनला कव्हर व पॉईंटच्या दिशेने लगावलेले गायकवाडचे फटके धुवांधार स्वरुपाचे राहिले. नंतर प्लेसिसने देखील मोठय़ा फटक्यांवर भर दिला आणि पाहता पाहता चेन्नईचा संघ 20 षटकात 3 बाद 192 धावांपर्यंत पोहोचला होता.

धावफलक

चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. मावी, गो. नरेन 32 (27 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. अय्यर, गो. मावी 86 (59 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), रॉबिन उत्थप्पा पायचीत गो. नरेन 31 (15 चेंडूत 3 षटकार), मोईन अली नाबाद 37 (20 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार). अवांतर 6. एकूण 20 षटकात 3 बाद 192.

गडी बाद होण्याचा क्रम

1-61 (ऋतुराज, 8.1), 2-124 (उत्थप्पा, 13.3), 3-192 (प्लेसिस, 19.6).

गोलंदाजी

शकीब हसन 3-0-33-0, शिवम मावी 4-0-32-1, फर्ग्युसन 4-0-56-0, वरुण चक्रवर्ती 4-0-38-0, सुनील नरेन 4-0-26-2, वेंकटेश अय्यर 1-0-5-0.

केकेआर ः शुभमन गिल पायचीत गो. चहर 51 (43 चेंडूत 6 चौकार), वेंकटेश अय्यर झे. जडेजा, गो. शार्दुल 50 (32 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), नितीश राणा झे. प्लेसिस, गो. शार्दुल 0 (1 चेंडू), सुनील नरेन झे. जडेजा, गो. हॅझलवूड 2 (2 चेंडू), इयॉन मॉर्गन झे. चहर, गो. हॅझलवूड 4 (8 चेंडू), दिनेश कार्तिक झे. रायुडू, गो. जडेजा 9 (7 चेंडूत 1 षटकार), शकीब हसन पायचीत गो. जडेजा 0 (1 चेंडू), राहुल त्रिपाठी झे. अली, गो. शार्दुल 2 (3 चेंडू), फर्ग्युसन नाबाद 18 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शिवम मावी झे. चहर, गो. ब्रेव्हो 20 (13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), वरुण चक्रवर्ती नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 9. एकूण 20 षटकात 9 बाद 165.

गडी बाद होण्याचा क्रम

1-91 (वेंकटेश, 10.4), 2-93 (राणा, 10.6), 3-97 (नरेन, 11.3), 4-108 (गिल, 13.2), 5-119 (दिनेश कार्तिक, 14.5), 6-120 (हसन, 14.6), 7-123 (शकीब, 14.6), 8-125 (मॉर्गन, 16.3),  9-164 (मावी, 19.5).

गोलंदाजी

दीपक चहर 4-0-32-1, हॅझलवूड 4-0-29-2, शार्दुल ठाकुर 4-0-38-3, ब्रेव्हो 4-0-29-1, जडेजा 4-0-37-2.

300 टी-20 सामन्यात नेतृत्व भूषवणारा धोनी पहिला कर्णधार

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जागतिक क्रिकेटमध्ये 200 टी-20 सामन्यात नेतृत्व भूषवणारा पहिला खेळाडू ठरला. 40 वर्षीय माजी भारतीय कर्णधार धोनीसाठी ही आयपीएलमधील एकूण दहावी फायनल ठरली. त्याने यलो ब्रिगेडतर्फे 214 सामन्यात नेतृत्व केले असून यातील 23 सामने नंतर बरखास्त केल्या गेलेल्या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेतील आहेत.

धोनीने याशिवाय, रायजिंग पुणे सुपरजायंट संघाचे एका आयपीएल हंगामात 14 सामन्यात नेतृत्व भूषवले. शिवाय, 6 विश्वचषक स्पर्धांसह एकूण 72 सामन्यात नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. 2007 टी-विश्वचषक जिंकून दिला, ही त्याची टी-20 क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी आहे.

केकेआर बिनबाद 91 वरुन केकेआर 8 बाद 125!

विजयासाठी 192 धावांचे आव्हान असताना केकेआरने एकवेळ बिनबाद 91 अशी जोरदार सुरुवात केली होती. पण, वेंकटेश अय्यर पहिल्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि नंतर केकेआरचा डाव जणू पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत राहिला. पाहता पाहता त्यांची 8 बाद 125 अशी दाणादाण उडाली आणि यातून सावरणे निव्वळ अशक्यप्राय होते! यातील वेंकटेश अय्यरला शार्दुलने स्वीपर कव्हरवरील जडेजाकरवी झेलबाद केले होते.

Related Stories

पृथ्वी शॉचे नाबाद द्विशतक, यादवचे शतक

Amit Kulkarni

अभिषेक, अंकिता, ज्योतीची आगेकूच

Patil_p

भारत-जॉर्डन सरावाचा फुटबॉल सामना आज

Patil_p

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू सना मीरची निवृत्ती

Patil_p

प्राग्वे टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त

Patil_p

ऍक्सेलसेनला धक्का देत लक्ष्य सेन अंतिम फेरीत

Patil_p