Tarun Bharat

चेन्नई सुपरकिंग्स संघात अनुभवी अम्बाती रायुडूचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ दुबई

अम्बाती रायुडूच्या पुनरागमनाने दडपणाखाली असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची बाजू थोडीशी बळकट होणार असून शुक्रवारी त्यांचा सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलमधील साखळी सामना होणार आहे. सनरायजर्स संघ आधीच्या सेटबॅकनंतर सावरला असून दोन्ही संघांचे बलाबल सारखे असल्याने ही लढत चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. सायंकाळी 7.30 पासून सामना सुरू होईल.

पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चेन्नईला विजय मिळवून देण्यात अम्बाती रायुडूने मोलाची भूमिका बजावली होती. पण धेंडशिरेची दुखापत झाल्याने त्याला नंतरचे सामने हुकले होते. ब्रॅव्होलाही अशाच प्रकारची दुखापत झाली असून सीपीएलपासून त्याला ही दुखापत झाली आहे. त्यामुळे सीपीएलमधील शेवटच्या दोन सामन्यात तो गोलंदाजी करू शकला नव्हता. ‘रायुडू व ब्रॅव्हो दोघेही निवडीसाठी उपलब्ध आहेत,’ असे सीएसकेचे सीईओ केएस विश्वनाथन यांनी सांगितले. सीएसके आणि सनरायजर्स हे दोन संघ आयपीएलच्या सुरुवातीपासूनच सर्वात समतोल संघ असल्याचे मानले जाते. पण यावेळी दोन्ही संघांच्या प्रदर्शनात अपेक्षित चमक दिसून आलेली नाही. पहिल्या तीनमधील दोन सामने दोन्ही संघांनी गमविले असून मध्यफळीतील असमतोल हे त्याचे मुख्य कारण आहे. रायुडूला संधी मिळाल्याने फॉर्ममध्ये नसलेल्या मुरली विजयच्या जागी त्याला वॅटसनसमवेत सलामीला पाठविले जाण्याची शक्यता आहे.

ब्रॅव्होच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही. त्याला स्थान देण्याचे ठरल्यास धोनीला संपूर्ण लाईनअपमध्येच अदलाबदल करावी लागणार आहे. केदार जाधवचा खराब फॉर्म हाही धोनीसाठी चिंतेचा विषय आहे. कारण त्याच्या जागी दुसरा बदली खेळाडूही उपलब्ध नाही. गेल्या काही सामन्यात जाधवला भरीव योगदान देता आलेले नाही. त्यामुळे ब्रॅव्होला संघात सामावून घ्यावे लागल्यास धोनीला सलामीवीर वॅटसनला किंवा जलद गोलंदाज हॅजलवुडला संघाबाहेर ठेवण्याचा विचार करावा लागेल. हैदराबादसाठी केन विल्यम्सनच्या समावेशामुळे नवोदित भारतीय खेळाडूंचा भरणा असलेली त्यांची मध्यफळी भक्कम झाली असून सलामीवीर बेअरस्टो व वॉर्नर यांनी बऱयापैकी योगदान दिले आहे. हैदराबादला यश मिळवायचे असल्यास बेअरस्टो, वॉर्नर व विल्यम्सन हे एकाच वेळी अपयशी ठरले तर मध्यफळीत भरवशाचा भारतीय बिग हिटरचा त्यांना शोध घ्यावा लागेल. काश्मिरच्या अब्दुल समदने आश्वासक कामगिरी केली आहे. मात्र प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा यांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

गोलंदाजीत दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. चेन्नईसाठी दीपक चहर, हॅजलवुड, करण, जडेजा, पीयूष चावला हे दुबईच्या संथ खेळपट्टीवर उपयुक्त ठरू शकतात. हैदराबादला टी. नटराजनच्या रूपात डेथओव्हर्समधील स्पेशालिस्ट गोलंदाज मिळाला असून टी-20 मधील अग्रमानांकित गोलंदाज रशिद खानला तो पूरक ठरणारा आहे. रशिद खानने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करीत 3 बळी मिळविले आणि सामनावीराचा मानही मिळविला होता.

@चेन्नई सुपरकिंग्स : धोनी (कर्णधार), मुरली विजय, रायुडू, डय़ु प्लेसिस, वॅटसन, केदार जाधव, ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इम्रान ताहिर, सँटनर, हॅजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, जगदीशन, केएम असिफ, मोनू कुमार, आर.साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.

@सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, अब्दुल समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर, कौल, स्टॅन्लेक, टी.नटराजन, बसिल थम्पी.

Related Stories

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ‘महाराष्ट्र केसरी’

Patil_p

विराट कोहलीच्या शुभेच्छा व अपेक्षा….फटाके फोडू नका!

Patil_p

प्रो कबड्डी लीगमध्ये आज रंगणार उपांत्य सामने

Patil_p

मँचेस्टर सिटी सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत

Patil_p

ब्लॉकबस्टर फिनिश! पोलार्ड जिंकला!

Patil_p

कोरोना संक्रमित सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Archana Banage