Tarun Bharat

चैतन्य महाप्रभु आणि संत तुकाराम

मागील आठवडय़ात शुक्रवारी 18 मार्च रोजी भगवान चैतन्य महाप्रभूंचा अवतीर्ण दिवस आणि रविवार 20 मार्च रोजी संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन दिवस जो तुकाराम बीज या नावानेसुद्धा ओळखला जातो, साजरा करण्यात आला. दोघांनीही 15 आणि 16 व्या शतकात हरिनामाचा प्रचार केला. संत तुकाराम आपल्या अवतार कार्याचे वर्णन करताना सांगतात धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ।।1।। हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।।2।। तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे।।3।। नाही भीड भार । तुका म्हणे सानथोर ।।4।। अर्थात ‘सर्व पाखंड मताचे (वेदाविरुद्ध) खंडन करून (वेद प्रतिपादित) धर्मरक्षण (पाळणं) करावा, प्रत्येकाच्या हृदयात भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचे बीजारोपण करण्यासाठी प्रचार करावा, हेच काम आम्हाला करावयाचे आहे. हरिनामाचा प्रचार करताना कठोर शब्दरूपी बाण हातामध्ये घेऊन आम्ही नेहमी फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पवित्र कार्य करताना आम्ही कोणी लहान अथवा थोर आहे ह्याची भीड बाळगत नाही.’

सर्वप्रथम धर्माचे पालन अथवा रक्षण करावयाचे असेल तर धर्म म्हणजे काय, त्याचा उद्देश काय, तो कुणी आणि कशासाठी स्थापन केला याची माहिती आपल्याला असली पाहिजे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वर्णन येते की (भा 6.3.19)  धर्मं तु साक्षाद्भ‍गवत्प्रणीतं अर्थात धर्म म्हणजे साक्षात सृष्टीकर्त्या भगवंतांनी सर्व सृष्टीच्या संचलनासाठी घालून दिलेले नियम. जसे समाजामध्ये सुसूत्रता असावी यासाठी घर, शहर, राज्य, देश, आंतरराष्ट्रीय इत्यादी त्या त्या स्तरावर काही नियम असतात आणि ते पाळण्याचे बंधन प्रत्येकावर असते. ते नियम पाळणाऱयाना संरक्षण दिले जाते आणि मोडणाऱयांना शिक्षा केली जाते. याचप्रमाणे या सृष्टीचेही काही नियम आहेत. त्याला ‘धर्म’ म्हणतात. त्याचा उद्देश आहे सर्व जीवांचा भावनिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर विकास व्हावा. त्याचप्रमाणे ‘धर्म’ याचा अर्थ स्वभाव असाही आहे. ज्याप्रमाणे मिरचीचा धर्म आहे तिखटपणा, साखरेचा धर्म आहे गोडपणा. त्याचप्रमाणे जीवात्म्याचा स्वभाव आहे भगवंताची प्रेममयी सेवा करणे. या धर्माची आठवण करून देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून उपदेश केला आहे. याच कारणासाठी भगवंत अवतरित होतात आणि धर्माची स्थापना करतात. भगवद्गीतेतील दोन प्रसिद्ध श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 4-7,8) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। अर्थात ‘जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱहास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता! मी स्वतः अवतीर्ण होतो’. परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे। अर्थात ‘भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो.’ या दोन श्लोकांमधून स्पष्ट होते की केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर भगवान श्रीकृष्णांनीच सृष्टीतील पहिला जीव ब्रह्मदेव, त्याच्या हृदयात जे ज्ञान प्रकट केले त्याला वेद असे म्हणतात. पुढे द्वापारयुगाच्या शेवटी पुन्हा हेच ज्ञान स्वतः श्रीकृष्णांनीच अर्जुनाच्या माध्यमातून सर्व जीवांच्या कल्याणासाठी दिले. सर्व जीवात्मा हे भगवंताचे सनातन अंश आहेत, यास्तव त्यांच्याशी संबंधित त्यांच्या आज्ञेनुसार कार्यरत राहणे हा जीवात्म्याचा स्वभाव आहे. म्हणून याला ‘सनातन धर्म’ म्हणतात. वेदांवर आधारित आहे म्हणून ‘वैदिक धर्म’ म्हणतात. श्रीमद भागवत सर्व वेदांचे सार आहे, त्यावर आधारित आहे म्हणून याला ‘भागवत धर्म’ असेही म्हणतात. सर्वसामान्यपणे हिंदू या ग्रंथाचा धर्मग्रंथ म्हणून स्वीकार करतात. याविरुद्ध जे ज्ञान आहे त्याला अधर्म अथवा पाखंड म्हणतात. श्रीमद भागवतमध्ये हे स्पष्ट केले आहे (भा 6.1.40)  वेदप्रणिहितो धर्मो ह्यधर्मस्तद्विपर्ययः । अर्थात ‘वेदांमध्ये सांगितलेली तत्त्वे म्हणजे धर्म होय आणि या तत्त्वांच्या विरुद्ध असणारे सर्व काही अधर्म होय’

प्रत्येक अवतारामध्ये कार्य सारखेच असते ते म्हणजे जीवात्म्याला त्याच्या ‘स्वभावाची’ आठवण करून देणे आणि धर्मतत्त्वाचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. यासाठी भगवंत स्वतः अवतीर्ण होतात अथवा संत तुकारामांसारख्या प्रामाणिक प्रतिनिधीला त्यांचे कार्य करण्यासाठी पाठवितात. त्याचप्रमाणे वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन श्रीमद भागवतसारख्या धर्मग्रंथात करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगात ते अवतीर्ण होतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे श्रीचैतन्य महाप्रभु आहेत. (भा 11.5.32) कृष्णवर्णं त्विषाकृष्णं साङ्गोपाङ्गास्त्रपार्षदम् । यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः । अर्थात ‘अव्याहतपणे कृष्णनामाचे कीर्तन करणाऱया भगवद अवताराची आराधना करण्यासाठी कलियुगामधील बुद्धिमान लोक सामूहिक कीर्तन करतात. या अवताराचा वर्ण घननीळा नसला तरी ते श्रीकृष्णच आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे पार्षद, सेवक, शस्त्रे आणि घनि÷ सहचरदेखील आहेत.’ चैतन्य महाप्रभु यांनी भक्तरूपात अवतीर्ण होऊन संकीर्तन आंदोलनाद्वारे श्रीकृष्णभक्तीचा प्रचार व प्रसार सर्व भारतभर केला आणि भविष्यवाणी केली की या हरिनाम संकीर्तनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल. या चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात भगवंत दुष्टांचा वध करीत नाहीत कारण कलियुगामध्ये बहुतांश लोक रावण, हिरण्यकश्यपू, कंस, जरासंध, दुर्योधन या प्रवृत्तीचेच आहेत अर्थात भगवंताच्या आदेशाप्रमाणे न वागता त्याच्या आदेशाविरुद्धच वागणारे आहेत. त्या राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंत आपल्या पवित्र नामामध्येच अवतीर्ण होतात. 

कलियुगामध्ये या श्रीकृष्णभावनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठीच संत तुकाराम महाराजांसारखे आणि अलीकडच्या काळात श्रील प्रभुपाद यांच्यासारखे ज्यांनी संपूर्ण विश्वामध्ये हरिनामाचा प्रचार केला, महान आचार्य, भगवंताचे प्रिय सेवक अवतीर्ण होतात. ते स्वतःचे असे कुठलेही नवीन मार्ग शोधून न काढता भगवंतानीच दिलेल्या मार्गाचा म्हणजे हरिनामाचा निर्भीडपणे, कोणताही भेदभाव न करता प्रसार व प्रचार करतात. या हरिनाम संकीर्तनातच सर्व प्रश्नांचे मग ते वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा सर्व स्तरांवरील समस्यांचे उत्तर दडलेले आहे. 

वृंदावनदास

Related Stories

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (33)

Patil_p

बंदर क्षेत्रामध्ये 130 प्रकल्प उभारण्याची योजना

Patil_p

कृष्णावर सत्राजिताचा आरोप

Patil_p

हाचि हाचि तो होय

Patil_p

शिवस्तवन

Patil_p

विजयदुर्गच्या निमित्ताने…

Patil_p