Tarun Bharat

चोरलेल्या दुचाकीचा तपास लावण्यात वेर्णा पोलिसांना यश

प्रतिनिधी/ मडगाव

वेर्णा तसेच इतर परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी तपास लावतानाच वेर्णा पोलिसांनी या दुचाकी चोरण्यात गुंतलेल्या तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. गोव्यात लॉकडाऊन होण्याच्या पूर्वी या दुचाकी चोरण्यात आल्या होत्या अशी माहिती पोलीस तपासात आढळून आल्याची माहिती वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली आहे.

वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, न्यू वाडे-वास्को येथील रतीओश प्रभुदेसाई यांच्या मालकीची बुलेट मोटारसायकल वेर्णा येथील क्वाड्रो ओपन एअर हॉलच्या समोर खुल्या जागेत पार्क करण्यात आली होती. ती दि. 7 एप्रिल 2020 रोजी चोरीला गेली होती. रतीओश प्रभुदेसाई यांनी या प्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती व तपास सुरूच होता. पोलिसांनी बऱयाच ठिकाणी शोध घेतला पण, दुचाकी सापडली नव्हती. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आपला मोर्चा दुचाकी दुरूस्त करणाऱया गॅरेजवर वळविला असता खारेबांद-मडगाव येथील एका गॅरेजवळ ही बुलेट मोटारसायकल आढळून आली.

खारेबांद-मडगाव येथील गॅरेजमध्ये नंबरप्लेट नसलेली बुलेट मोटारसायकल आढळून आल्याने प्रभुदेसाई व पोलिसांना देखील संशय आला. त्यांनी बुलेटचा चेसी नंबर पाहिला असता, त्यात फेरफार केल्याचे आढळून आले. नंतर इंंजिन नंबरची तपासणी केली असता, बुलेट तिच असल्याचे स्पष्ट झाले. नंतर पोलिसांनी गॅरेज मालक शरीफ याची झडती घेतली असता, रॉय फिल्टोन शंके (32) राहणारा घोगळ-मडगाव याने ही बुलेट या ठिकाणी आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानतंर पोलिसांनी रॉय शंकेला ताब्यात घेतले व त्याची चौकशी सुरू केली. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने आपण बुलेट चोरल्याची कबुली दिली. बुलेटची नंबर प्लेट आपण काढली व ती आपण चालवित होतो व ती मॅकनिककडे दिली होती अशी माहिती दिल्यानतंर त्याला रितसर अटक करण्यात आली. नंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने काही अटी घालून त्याची सुटका केली. या अटीत त्याने पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट होती.

या अटीचा फायदा घेत पोलिसांनी त्याचा कसून तपास करण्यावर भर दिला. मात्र, त्याच्या जबानीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. शनिवारी त्याची दिवसभर उलट तपासणी करण्यात आली, तेव्हा ही बुलेट पळविण्यात आल्यासोबत दवर्ली येथील फ्रान्सिस्को वाझ (30) याचा समावेश होता अशी कबुली दिली. वेर्णात बुलेटची चोरी करण्यासाठी ते दोघे बुलेट मोटारसायकलवरूनच आले होते. ती बुलेट उत्तर गोव्यातून कांदोळी येथून दोघांनी चोरल्याची माहिती रॉय शंकेने दिली. या दोन्ही बुलेट पोलिसांनी जप्त केल्या.

रॉय शंके व फ्रान्सिस्को वाझ या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी आकें-मडगाव येथील प्रतिभा हाऊसिंग सोसायटीत राहणाऱया अभित तावडे (41) याचाही दुचाकी चोरीत समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अभित तावडे याने कोलवा येथून एक दुचाकीची चोरी करून ती दहा हजार रूपयांना विकली. त्यानंतर स्प्लेंडरची चोरी केली व तिची महाराष्ट्रात विक्री केली. ही स्प्लेंडर घेणारी व्यक्ती ही मयत झाली. त्यामुळे या प्रकरणाचा तपासही संपला.

या तिघांकडून वेर्णा पोलिसांनी दोन बुलेट तसेच पल्सर व अवेन्जर अशा चार दुचाकी जप्त पेलेल्या आहेत. अवेन्जर कोलवा येथून चोरली होती. त्यामुळे चोरीची तक्रार कोलवा पोलिस स्थानकात नोंद झालेली आहे. अन्वेजरची नोंदणी महाराष्ट्रात झाली होती. तिची नंबरप्लेट काढून ती गोव्याबाहेर विक्री करण्याची तयारी होती. तसेच तिचा रंगही बदलण्यात आला होता. दुचाकींची चोरी केल्यानंतर त्यांची महाराष्ट्रात विक्री केली जायची अशी माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे.

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या सोबत हेडकॉन्स्टेबल बाबाजी माटकर, हेडकॉन्स्टेबल गिरीश नाईक, पोलीस हवालदार निलेश कासकर, पोलीस हवालदार अजित शिरोडकर, पोलीस हवालदार सतीश लाकडे व ड्रायव्हर मुजिब खान यांनी या दुचाकी चोरीचा तपास लावतानाच तिघांना अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Related Stories

पंतप्रधानांचा आज गोमंतकीयांशी संवाद

Amit Kulkarni

पेडणे भाजपच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे दुचाकी रॅली

Amit Kulkarni

मडकई येथे प्रवासी बसच्या धडकेत युवक ठार

Omkar B

बेतोडा-निरंकाल रस्त्यावर झाडे धोकादायक स्थितीत

Omkar B

निवडणूक सभांवर मर्यादा घालाव्यात

Amit Kulkarni

भाजप सरकारकडून जनतेची लूट

Amit Kulkarni