Tarun Bharat

चोरी प्रकरणामुळे बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Advertisements

फिरोज मुलाणी/ औंध

मोठी बाजारपेठ असूनसुद्धा अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पुसेसावळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरटय़ांनी परवा चांगलाच हात मारला. बँकेत झालेल्या चोरीमुळे पुन्हा एकदा बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुढे तरी सुरक्षिततेच्या बाबतीत बँक प्रशासन योग्य ती खबरदारी घेणार काय? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

पुसेसावळी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मोठय़ा प्रमाणात सोने तारण व रोख रक्कम असा एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. खटाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील बँकांची सुरक्षा रामभरोसे असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. कोटय़वधी रुपयांची मालमत्ता बँकेत असूनही सुरक्षेच्या दृष्टीने कसलीही उपाययोजना नसल्याने बँकेकडून चोरटय़ांना एक प्रकारे चोरी करण्यासाठी मोकळीकच दिली जाते का काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  या अगोदरही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन शाखांमधून चोरीच्या मोठय़ा घटना घडून ही बँक प्रशासन व पोलीस यंत्रणा याबाबत योग्य ती खबरदारी का घेत नाही. घटना घडल्यानंतर आता सगळेच एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतील. परंतु घटना घडू नये, याकरिता त्यावर ठोस उपाययोजना का केली जात नाही. अशी विचारणा बँक ग्राहक व स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

पुसेसावळीत औंध रस्त्यावरील बँकेच्या इमारतीसमोर नवीन दुकान गाळे झाल्यामुळे पाठीमागे असलेली बँक अडगळीला पडली आहे. रस्त्यावरुन जाणाऱया येणाऱयांना काहीही दिसत नाही. मागील दोन दिवस सुट्टी असल्याने चोरटय़ांनी डाव साधून बँकेचे शटर व लाँकर उचकटून बँक लुटल्याचे निदर्शनास येत आहे व तशी चर्चा ही परिसरात सुरू आहे.

 मोठी बाजारपेठ आणि परीसरातील आठ दहा गावाचे मध्यवर्ती केंद्र असल्याने पुसेसावळी शाखा ही आर्थिक उलाढालीमध्ये खटाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची महत्वाची शाखा आहे. याठिकाणी तारणावर ठेवलेले सोने तसेच रोख रक्कमेवर चोरटय़ांनी लाँकर तोडून हात मारल्याचे दिसून येत आहे. शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याची संधी साधूनच हे काम केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखा खटाव तालुक्यात आहेत. यापूर्वी कलेढोण, चितळी या ठिकाणच्या शाखेत चोरीच्या घटना झाल्या आहेत तर पळशी शाखा लुटण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपूर्वी झाला होता. पण याबाबत कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

अलीकडे सर्वांनीच सुरक्षेसाठी सीसीटिव्ही  कँमेरे बसवले आहेत. तकलादू स्वरूपाच्या   सीसीटीव्ही कँमेर्यावर बँकां सुरक्षित राहणार नसल्याचे यावरून दिसून येत आहे. यासाठी सिक्युरिटी गार्ड पथक नियुक्त करणे ही काळाची गरज बनली आहे.

त्याचबरोबर बँक ज्या इमारतीमध्ये आहे ती बँक बँकींग नियमानुसार सुरक्षित आहे का त्याठिकाणी सर्वसाधन सामुग्री सुरक्षेच्या दूष्टीने उपलब्ध आहे  का ?हेही पाहणे गरजेचे आहे.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखा काही ठिकाणी अजूनही जुन्या इमारतीत आहेत त्यामुळे ग्राहक व कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दूष्टीने या बँका सुरक्षित ठिकाणी हलवणे गरजेचे बनले आहे. त्यादृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी होत असून वारंवार होणारे दरोडा व चोर्याचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा बँक प्रशासन, पदाधिकारी व पोलीस यंत्रणेने कार्यवाही करावी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांबरोबरच अन्य बँकांची ही सुरक्षितता वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुट्टी कालावधी मध्ये ही सुरक्षितता अधिक बळकट करणे गरजेचे बनले आहे.

Related Stories

जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन

Patil_p

नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या आराखडय़ास मंजुरी

Patil_p

सातारा जिल्ह्यात 54 नवे रुग्ण

Archana Banage

सातारा : मंथली देतोय म्हणून कारवाई होत नाही…

datta jadhav

कोरेगाव तालुक्यातील भाडळेत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

उर्वरित केशरी शिधापत्रिका धारकांना मे पासून रेशन धान्य मिळणार : श्रीकांत शेटे

Archana Banage
error: Content is protected !!