Tarun Bharat

चौथ्या लॉकडाऊनमध्ये निर्बंध आणखी शिथिल

राज्यांतर्गत बस, रेल्वे सुरू : दर रविवारी संपूर्ण संचारबंदी मास्क न परिधान केल्यास दंड..

प्रतिनिधी/बेंगळूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारपासून 31 मे पर्यंतच्या नव्या लॉकडाऊनची मार्गसूची प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार हॉटेल, चित्रपटगृहे मॉल वगळता सर्व दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. काही अटींवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. मात्र, रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहणार असून या दिवशी जनसंचारावरही निर्बंध राहणार आहे.

सोमवारी सकाळी विधानसौधमध्ये मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊननुसार ही मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली. त्यानुसार राज्यातल्या राज्यात बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, रेडझोन आणि कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवासी वाहतूक होणार नाही. समाधानाची बाब म्हणजे तिकीट दर वाढविणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

खासगी वाहनसेवाही सुरू होणार

आज मंगळवापासून प्रामुख्याने राज्य परिवहन महामंडळ, (केएसआरटीसी), बेंगळूर शहर परिवहन मंडळाच्या प्रवासी बससेवेबरोबरच (बीएमटीसी) खासगी प्रवासी सेवा सुरू होणार असून खासगी बस, ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅबना देखील प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये 30 पेक्षा अधिक जणांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच प्रवाशांना मास्कचा वापर सक्तीचा असेल. प्रवाशांच्या सुरक्षेखातर बसेसमध्ये सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. ऑटो रिक्षा, कॅब, टॅक्सीमध्ये चालकाव्यतिरिक्त दोघा प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे. मात्र सकाळी 7 ते रात्री 7 या कालावधीतच परिवहनकडून प्रवासी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे. शिवाय राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना पॅसेंजर गाडय़ा उपलब्ध होऊ शकणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

विलगीकरण अनिवार्य

आवश्यकता असेल तरच परराज्यातून कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र राज्यात येणाऱयांना 14 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि गुजरात या चार राज्यांमधील जनतेला कर्नाटकात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. इच्छुक असणाऱयांना परराज्यात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

उद्याने सकाळी, सायंकाळी 1 तास सुरू

बेंगळूरमधील कब्बन पार्क, लालबागसह राज्यातील सर्व उद्याने आणि बागा सुरू होणार आहेत. सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 6 ते 7 पर्यंत उद्याने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये आणखी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱयांना दंड ठोठावण्यात येणार आहे. मास्कचा उपयोगही घराबाहेर अनिवार्य आहे.

Related Stories

हवा प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत उभारला स्मॉग टॉवर

Archana Banage

राजस्थानातील करौलीत हिंसाचार, 42 जखमी

datta jadhav

हिजबुलच्या चार दहशतवाद्यांना ठार मारले

Patil_p

भाजप आमदार ठुकराल यांची रुद्रपूरमध्ये बंडखोरी

Amit Kulkarni

शहतूत धरणासंबंधी भारत-अफगाणिस्तान यांच्यात करार

Patil_p

न्यायाधीशांची नियुक्ती 5 दिवसांमध्ये

Patil_p