प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शाहू महाराज पहिले यांची समाधी संगममाहुली येथे आहे. त्या ठिकाणी दि. 15 रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजमाता कल्पनाराजे भोसले छत्रपती ह्यांच्या हस्ते समाधी स्थानाचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने यांनी दिली.
छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संगममाहुली येथे समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 डिसेंबर 1749 रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे साताऱयात निधन झाले. सातारा येथील कृष्ण-वेण्णा नद्यांच्या संगमावर असलेल्या संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराज ह्यांचे समाधीस्थळ आहे. 15 डिसेंबर 2020 रोजी 270 वर्ष पूर्ण होत आहेत. सातारा येथील अजय वीरसेन जाधवराव आणि धीरेंद्र राजपुरोहित यांनी ऑक्टोबर 2018 साली राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून समाधी स्थळाच्या पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेतले. समाधी, पुनर्निर्माण कार्य सुरु करण्याअगोदर निष्णात आर्किटेक्ट, इंजिनियर यांची मदत घेतली गेली. मूळ समाधी स्थान हे नदीपात्रापासून 9 फूट खोल आहे. हे बांधकाम 2019 साली पुराच्या पाण्याखाली गेले होते. सलग तीन दिवस हे बांधकाम पुराच्या पाण्याखाली होते. 15 डिसेंबर रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संगम माहुली येथे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते या समाधी स्थानाचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे, अशी माहिती प्रकाश माने यांनी दिली.