Tarun Bharat

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व्यवस्थापन

स्वराज्य संकल्पक, छत्रपती शिवाजी महाराज यांची शनिवार 19 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळय़ांना संघटीत करून स्वराज्याची उभारणी केली. त्यांनी आदर्श व्यवस्थापनाचा घालून दिलेला धडा आजही आदर्शवत आहे. त्यांच्या आदर्श व्यवस्थापनाविषयीचा हा लेख…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनव्यवस्थेतील मूल्ये जगाला विधायक दृष्टी देणारी आदर्शवत आहेत. त्यांची विधायक दृष्टी काळाच्या पुढे होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रत्येक गड-किल्ले म्हणजे आदर्श व्यवस्थापनाची केंदे होती. गड-किल्ल्यावर आपत्कालीन व्यवस्था नेहमी सज्ज असे. प्रत्येक निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटाच्यावेळी तातडीने मदतीसाठी प्रत्येक किल्ल्यावर खास युनिट नेमलेले असे. छत्रपतींनी आपल्या शासनव्यवस्थेत अंमलात आणलेले व्यवस्थापनशास्त्र श्रेष्ट दर्जाचे होते. शिवाजी महाराज आधुनिक व्यवस्थापनाचे गुरू होत. शिवाजी महाराज प्रत्येक टप्प्यावर यशस्वी झाले त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे नेटके व्यवस्थापन होय. त्यांनी स्वराज्यातील प्रत्येक मावळय़ाला आदर्श व्यवस्थापनाचे धडे दिले होते. अचानक येणाऱया संकटाच्या वेळी त्याच्यावर मात करण्यासाठी छत्रपतींचे नियोजन तयार असे. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये केवळ जनतेच्या सुखासाठी योजना राबविणे, त्यांच्या चेहऱयावर कायम आनंद ठेवण्यासाठी काम करणे हे तत्व त्यांनी मनात कायम ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर जगणारे सर्वश्रेष्ट शासनकर्ते होत. त्यांनी जनता नेहमी सुखी रहावी म्हणून त्यांच्यासाठीच शासन चालविले. आपले उत्कृष्ट अशा प्रकारचे व्यवस्थापन या गुणांसाठी ते सर्वश्रेष्ट आहेत.

नैसर्गिक संकटे व मानवनिर्मिती संकटांवर मात करण्यासाठी स्वराज्यामध्ये छत्रपतींनी दक्ष अशी शासनव्यवस्था उभी केली होती. युध्द, मोहिमा, लढाया यामुळे अराजकता व अशांतता निर्माण होत असे हे लक्षात घेऊन छत्रपतींनी आदर्श व्यवस्थापान निर्माण केले होते. दुष्काळ, महापूर या नैसर्गिक संकटाबरोबरच मानवनिर्मित संकटाच्या वेळीही छत्रपतींचे व्यवस्थापन तत्पर असे. शेतकऱयांच्या शेतातील पिकांना कायमस्वरूपी संरक्षण दिले व पिकाला हमी भाव दिला. सागरी भरती व ओहोटीच्या वेळी किनारपट्टीला धोका निर्माण होत असे. अशा वेळी छत्रपतींनी खाडय़ांच्या काठच्या नवीन खाजणात भात जमीन बनावी म्हणून विशेष सवलती दिल्या. शासनाने जाहीर केले की ‘जो कोणी बांध बंदिस्ती करील व नवीन खार जमीन पिकास आणील त्यास महसूल माफ करून अशा शेतकऱयांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल.’ आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सागरी किनाऱयावरील रत्नागिरी जिल्हय़ातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला छत्रपतींच्या कालखंडामध्ये तरता तराफा तयार करण्यात आलेला होता. भुयारामध्ये हे ठाणे निर्माण करण्यात आले होते. सागरामध्ये शत्रूबरोबर युध्द सुरू असताना जहाज खराब झाले तर त्याला या ठिकाणी आणुन डागडुजी करून जायबंदी जहाज पुन्हा मोहिमेवर रवाना केले जात असे. यालाच आधुनिक भाषेत फ्लोटिंग डॉक्स फॉर बेस रिपेअरिंग युनिटस असे म्हटले जाते. छत्रपतींनी सुयोग्य तंत्रज्ञान वापरून जहाजे सुसज्ज ठेविली होती. जहाजांना किंवा नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी सागरी मार्गामध्ये दीपगृहे, इशारे वजा सूचना देणारी चिन्हे व तरंगते झेंडे आदि योजना सुसज्जपणे केलेली होती. यातून प्रवास सुरक्षित होत असे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वराज्यात होकायंत्रे/ दिशादर्शक यंत्रे व दुर्बिणी होत्या. वेगवेगळय़ा रंगाची निशाणे होती.

छत्रपती शिवाजी महाराज थोर मानसशास्त्रीय युध्दशास्त्र तज्ञ होते. त्यांनी प्रत्येक लढाईमध्ये मानसशास्त्रीय युध्दतंत्राचा अत्यंत कौशल्याने वापर करून बलाढय़ शत्रूवर विजय मिळविले. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यातील सैन्याची भरती स्वतः करीत असत. पुढे कोणतीही आपत्ती येऊ नये यासाठी सैनिकांचे नोंदपत्रक असे ज्यात नाव, गाव, पत्ता ही सर्व माहिती असे. त्यांचा हुद्दा, पगार याचीही नोंद या नोंदपत्रात दिसून येते. मानवाला जगण्यासाठी आहाराची नित्तांत आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन त्याचे काटेकोरपणे नियोजन केलेले होते. स्वराज्यातील प्रत्येक गड-किल्ल्यावर उत्तम अशी आहाराची व्यवस्था केलेली होती. स्वराज्यातील प्रत्येक गड-किल्ल्यावर अन्न-धान्याची कोठारे होती. स्वराज्यातील प्रत्येक गड अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. अचानक काही आपत्ती आलीच तर वर्ष वर्ष पुरेल एवढे अन्नधान्य किल्ल्यावर असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणीही स्वराज्यात उपाशी राहू नये यासाठी किल्ल्यांच्या माच्यावर मोफत शिधा देण्याची व्यवस्था केली होती. स्वराज्यातील किल्ल्यांच्या उतारावर असलेल्या माचीवर दररोज अन्नदान केले जात असे. स्वराज्यात जागोजागी अन्नक्षत्रे निर्माण करून गोर गरिबांच्या उदर निर्वाहाची सोय केली होती. युद्ध व मोहिमांच्या वेळी शेतीचे नुकसान होऊ नये याकडे महाराजांचे विशेषतत्वाने लक्ष असे. छत्रपतींनी शेतकरी कुटुंबांना संरक्षणाची हमी दिली व जमीन लागवडीला मदत करून शेतीचे उत्पन्न वाढविले.

छत्रपतींनी अधिकाऱयांना सक्त आदेश दिले होते की, आपल्या सैन्याकडून शेतकऱयांना त्रास होऊ नये. स्वारीवर जाताना उभ्या पिकातून घोडेस्वार व सैनिक अजिबात जात नसे. कारण शेतकऱयांनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे शेतातील पिकाला जपलेले असते. ते नष्ट होऊ नये म्हणून छत्रपतींनी नेहमी काळजी घेतली. संभाव्य धोक्मयापासून रयतेचे संरक्षण होण्यासाठी महाराजांनी आपल्या अधिकाऱयांना सक्त सूचना दिल्या होत्या. इ. स. 1662 मध्ये सर्जेराव जेधे यांना कळविले होते, ‘तुमच्या इलाख्यात मोगलांची फौज शाहिस्तेखान घेऊन येत असल्याची बातमी हिरांनी दिली आहे. त्यामुळे इलाख्यातील सर्व रयतेला लेकराबाळासह घाटाखाली सुरक्षित जागा असेल तेथे पाठवणे. या कामात हयगय करू नका. या कामात हयगय कराल तर तुमच्या माथी रयतेचे पाप बसेल. या कामात दक्षता बाळगावी’’. शत्रू पक्षाच्या स्वाऱया झाल्यानंतर छत्रपतींनी प्रथमतः रयतेला वाचविले. रयतेला विचारात घेऊनच राजांनी प्रत्येक धोरण राबविले.

इंग्रज अधिकारी ऑक्झिडेन महाराजांच्या भेटीसाठी 22.05.1674 रोजी किल्ले रायगडावर आले. त्यावेळी किल्ल्यावरील अधिकाऱयांनी त्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली होती. एवढेच नव्हेतर त्यांचे आरोग्य कसे आहे हेही तपासून त्यांना महाराजांना भेटण्याची परवानगी दिली होती. चार दिवसांनी त्यांनी छत्रपतींची भेट घेतली. 26 मे ला छत्रपती व ऑक्झिडेन यांच्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून बोलणी झाली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर असताना डच शिष्टमंडळ त्यांना भेटले. ही भेट 6 ऑगस्ट 1677 रोजी झाली. प्रत्यक्ष छत्रपतींबरोबर शिष्टमंडळ यांच्यामध्ये जेव्हा बोलणी झाली तेव्हा या शिष्टमंडळाला छत्रपतींपासून 4 ते 5 फूट अंतरावर बसवले होते. म्हणजे येथेही सामाजिक अंतर ठेवूनच चर्चा झाली. छत्रपतींनी हे सामाजिक अंतर ठेवूनच नेहमी इतरांबरोबर बोलणी, चर्चा, तह व करार वगैरे केले. छत्रपतींचे हे तत्व अभ्यासनीय असेच आहे. छत्रपतींनी सतराव्या शतकात सुध्दा सामाजिक अंतर ठेवून बोलण्याचे तत्व अमलात आणले होते. छत्रपतींचे हे व्यवस्थापन किती श्रेष्ट दर्जाचे होते हे लक्षात येते. एक उत्तम व्यवस्थापक म्हणून छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची दखल आज जगाने घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आजच्या काळातही जगाला दिशा देणारे आदर्शवत व महत्वपूर्ण असेच आहे.

– डॉ. मधुकर विठोबा जाधव

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर – 416552 फोन नं.- 9975546020

Related Stories

पिंगलेचे मनोगत

Patil_p

आग हिमाचलात, धूर कर्नाटकात!

Amit Kulkarni

सायबर जगातील ओळख – डिजिटल आयडेंटीटी

Patil_p

त्रैलोक्याच्या पलीकडे

Patil_p

शरीर परोपकारी लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।

Patil_p

हीरक महोत्सवी गोव्याचे दोन चेहरे

Patil_p