लंडन : ब्रिटन या देशाला सध्याला वेगळय़ाच समस्येने ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. येथील मुलांना जंकफूड खूप आवडते. या खाद्यपदार्थामुळे अनेक मुले लठ्ठ झाली असल्याचे समोर आले आहे. ही बाब सरकारने गंभीरपणे घेत आता याच्या जाहिरातीवर काही निर्बंध लादण्याचा पर्याय अवलंबण्याचे संकेत सरकारकडून व्यक्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यासाठी सरकार रात्री 9 च्या आधी जंक फूडच्या ऑनलाइन आणि टीव्हीवरील जाहिरातींवर निर्बंध लादले जाणार आहेत. यासंदर्भात लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ऑनलाइन जाहिरातींबाबत नवा कायदा आणण्याचा विचारही सरकारने चालवला आहे. नव्या कायाद्यानुसार रात्री 9 नंतर सकाळी 5.30 वाजेपर्यंत जंक फूडच्या जाहिराती ऑनलाइन व टीव्हींवर प्रसारीत करता येणार आहेत. देशातील एक तृतियांश मुले जंक फूडच्या सेवनाने लठ्ठ होत असल्याची बाब समोर आली आहे. 1990 नंतरच्या दशकानंतर आता 60 टक्केहून अधिक मुले लठ्ठपणाचा सामना करत आहेत.

