जवानांसोबत जीपला धक्काही दिला
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. राज्याच्या मियाओपासून विजयनगरपर्यंतच्या प्रवासाची छायाचित्रे खांडू यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये ते स्वतः गाडी चालवताना दिसून येतात. पेमा खांडू हे विजयनगरमध्ये राहणाऱया योबिन समुदायाच्या लोकांना भेटण्यासाठी गेले होते. या प्रवासात त्यांनी अनेक अवघड रस्त्यांवर गाडी चालविले आहे. याचबरोबर ते सुरक्षा कर्मचाऱयांसोबत चिखलातून गाडी बाहेर काढतानाही दिसून आले आहेत.


मियाओपासून विजयनगरपर्यंतच्या 157 किलोमीटरची गाडी आणि पायी प्रवास एक स्मरणीय प्रवास ठरला आहे. देबनपासून 25 मार्च रोजी सकाळी 5 वाजता सुरू झालेला प्रवास पुढील दिवशी रात्री विश्रांतीसाठी गांधीग्राम (137 किलोमीटर) येथे थांबला. दुसऱया दिवशी विजयनगरसाठी रवाना झाल्याचे खांडू यांनी सांगितले आहे.
लोकांच्या समस्या घेतल्या जाणून
विजयनगर येथे जाण्यासाठी सध्या कुठलेच वाहतुकीचे साधन नाही. वाहनांना ये-जा करता येण्यासारखा रस्ता नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तेथे पोहोचले. लवकरच वाहतुकीसाठी एक चांगला रस्ता निर्माण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.