Tarun Bharat

जडेजा-अश्विनवर आमचा फोकस असेल

Advertisements

न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज हेन्री निकोल्स याचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

न्यूझीलंडच्या जागतिक दर्जाच्या स्विंग गोलंदाजांसमोर भारताची जलद गोलंदाजी देखील अजिबात मागे नाही. न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज हेन्री निकोल्सने मात्र आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा यांच्याकडून धोका संभवतो. त्यामुळे, आमचा मुख्य फोकस या उभयतांवर असेल, असे प्रतिपादन केले आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील ही लढत दि. 18 जूनपासून खेळवली जाणार आहे. साऊदम्प्टनमधील एजिस बॉल स्टेडियमवर हा सामना होईल. इंग्लंडमधील अतिशय मोजक्या खेळपट्टय़ा फिरकी गोलंदाजीला काही प्रमाणात अनुकूल असतात. त्यामध्ये एजिस बॉलचा प्रामुख्याने समावेश होतो.

‘भारताची सीम गोलंदाजीची आघाडी भक्कम आहे आणि त्यांच्याकडे अश्विन-जडेजा यांच्यासारखे अनुभवी फिरकी गोलंदाजही आहेत. जगभरातील बहुतांशी खेळपट्टय़ांवर या उभयतांनी भेदक मारा साकारला आहे’, असे निकोल्सने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. निकोल्स अलीकडील कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम बहरात राहिला आहे. दुखापतीची कोणतीही समस्या नसेल तर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक लढतीत जसप्रित बुमराह, इशांत शर्मा व मोहम्मद शमी असे जलद त्रिकूट खेळवेल, हे जवळपास निश्चित आहे.

‘मोहम्मद शमीसह जसप्रित बुमराह व इशांत शर्मा यांनी सातत्याने आपला दर्जा अधोरेखित केला आहे. हीच भूमिका आमच्या ताफ्यात ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी व नील वॅग्नर यांनी बजावली आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. साहजिकच, ही लढत दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक असणार आहे’, असे 29 वर्षीय हेन्रीने पुढे नमूद केले.

खेळपट्टीवर रफ तयार करुन सराव एजिस बॉल, साऊदम्प्टनमधील खेळपट्टी मंद गोलंदाजीला पोषक असण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर, डेव्हॉन कॉनव्हेने खेळपट्टीवर गवत आच्छादून त्यावर सराव केला आणि या ट्रिकचे हेन्रीनेही स्वागत केले. अश्विन व जडेजा यांना सामोरे जाण्यापूर्वी अशी स्वतंत्र तयारी करणे गरजेचे आहे, असे तो म्हणाला. गतवर्षी न्यूझीलंडने मायभूमीतील 2 कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 3 दिवसांच्या आतच फडशा पाडला, त्यावेळी निकोल्सचा किवीज संघात समावेश होता. सध्या बहरात असलेल्या निकोल्सने मागील 3 कसोटी सामन्यात विंडीजविरुद्ध 174 व पाकिस्तानविरुद्ध 56, 11, 157 धावांचे योगदान दिले आहे. पाकिस्तानविरुद्ध ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात त्याने कर्णधार केन विल्यम्सनसमवेत 369 धावांची भरभक्कम भागीदारी देखील साकारली.

Related Stories

सित्सिपस- रूबलेव्ह यांच्यात अंतिम लढत

Patil_p

‘ओपनर्स’च्या भूमिकेत कोण?

Patil_p

गोलंदाजी अष्टपैलू रुमेली धर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची आघाडी

Patil_p

न्यूझीलंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

Omkar B

लंकेचा ऑस्ट्रेलियावर 26 धावांनी थरारक विजय

Patil_p
error: Content is protected !!