Tarun Bharat

जड मूक पिशाच्च

अध्याय अकरावा

भगवंत आणि उद्धव यांच्यात जीवनमुक्ताला केंद्रस्थानी ठेवून चर्चा चालू आहे. उद्धव भगवंतांना त्याबाबत निरनिराळे प्रश्न विचारून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेत आहेत तर काही प्रश्न भगवंत स्वतःच उपस्थित करून विषय आणखीन स्पष्ट करत आहेत. जेणेकरून जीवन्मुक्त ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात रूजावी आणि ती रुजवण्यात भगवंत कमालीचे यशस्वी झालेले आहेत. असं म्हणायचं कारण म्हणजे जीवनमुक्ताबाबत जे जे आपण सविस्तर समजाऊन घेत आहोत ते ते आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या जीवनातील किंवा माहीत असलेल्या संतांच्या चरित्रातील प्रसंग आठवत जातात आणि त्या त्या प्रसंगात ते ते संत ते जीवन्मुक्त असल्याची प्रचिती देत आहेत हे लक्षात येते. उदाहरणार्थ जीवन्मुक्त एका जागी बसून अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतो, विविध लोककल्याणकारी कामे विविध ठिकाणी एकाचवेळी करू शकतो, त्याला सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व जाणवत असते. इतके की, ईश्वराशिवाय जगात काही नाहीच ही त्याच्या दृष्टीने काळय़ा दगडावरची रेघ असते. पंचमहाभूते त्याच्या आज्ञेत वागत असतात. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर प्रभाव पडू शकत नाही. त्यांचे जन्मणे आणि देह ठेवणे हे पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन असते. त्यांच्या देहाला कुणी त्रास दिला किंवा कुणी पूजा केली तर त्यांना त्याबद्दल वाईटही वाटत नाही वा कौतुकही वाटत नाही. हा त्यांचा नित्यस्वभाव होय. सुखदुःखादि नानाप्रकारच्या व्यथा माणसाला त्यातील आसक्तीमुळे जाणवत असतात व त्या तात्पुरत्या असतात हे त्याने पक्कं ओळखलं असल्यामुळे त्याला त्याची व्यथा जाणवत नाही. कशामुळे भाळणे किंवा कुणाला घाबरणे हे त्यांच्या गावीही नसते. विदेहस्थिति जीवन्मुक्तात दृढ बाणलेली असल्याने देहदुःखाची व्यथा त्याला मुळीच बाधत नाही.

आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याला कुणाचे गुणदोषही जाणवत नाहीत. लोकांमध्ये साधु किंवा दुष्ट त्याने पाहिले तरी त्या दोघांनाही तो ब्रह्मरूपच समजतो. जो मुक्त असतो तो आपली योग्यता जगापासून लपवून ठेवीत असतो. म्हणून मुक्ताचे मुक्तपण स्वतः मुक्त असतात तेच जाणतात. दुसरा कितीही चतुर असला तरी त्याला ते लक्षण कळावयाचे नाही. मुक्ताची आणखीन वैशिष्टय़े सांगताना भगवंत म्हणाले,  मुक्त हा लौकिकामध्ये जड-मूक-पिशाचासारखाच वागत असतो.

मुक्त कायिक, वाचिक किंवा मानसिक कोणतेही कर्म सहेतुक करीत नसतो. त्याच्याकडून जे कर्म होते ते स्वाभाविक होत असते. त्याचंच नांव ‘अहेतुक’ कर्म. गुणागुणात दृष्टि ठेवून स्तुतीची किंवा निंदेची बोलणी करावयाची सोडून तो मौन धरून बसतो. पण मौनाचा अभिमान धरण्याचाही त्याचा हेतु नसतो. मनातल्या अशाश्वत गोष्टी काढून टाकून तो परब्रह्माचे चिंतन करू लागला की, त्याचे सद्गुरु समोर उभे ठाकतात. मग काय ? ध्येय, ध्याता, ध्यान हे सर्व उडून जाऊन भेदाचे भानच नाहीसे होते आणि जिकडे तिकडे चैतन्यधन भरून राहते. संत आणि असंत ह्याचे भानच नाहीसे होउन जिकडे तिकडे चैतन्यच भरून राहते. मनाचे मनपण मोडून वृत्तिशून्य अवस्था प्राप्त होते  ज्या चैतन्याचे मनाने ध्यान करावे तर ते मनच चैतन्यरूप होते. त्यामुळे ध्यान करणे सहजच खुंटले. हेच मुक्ताचे मुख्य लक्षण होय. ज्याचं चित्त चैतन्यात हरपलं आहे तो लोकांमध्ये जड-मूक-पिशाचासारखा वागताना दिसतो यात नवल ते काय ? जड मूक पिशाच्च म्हणजे एखाद्या दगडासारखं एका जागी पडून राहणे पण हे तो सर्व जाणून बुजून करत असतो. त्याचं एक कारण म्हणजे तो मुक्तपुरुष आहे हे त्याला लौकिकात जाणवून द्यायचं नसतं आणि दुसरं कारण म्हणजे नैष्कर्म्य ब्रह्माची त्याला दृढ प्राप्ती झालेली असते. अंतरांतील निजबोधाने तो अत्यंत गोड असतो. बाहेर मात्र दिसण्यात जडसा दिसतो. संकल्प विकल्प उभारणारे आणि मोडणारे मन आत्मस्वरूपातच लीन झालेले असते. त्यामुळे ते पडलेल्या ठिकाणावरून उठतच नाही. म्हणून ‘जडपणा’ भासतो. तो शब्दब्रह्माला गिळून टाकून स्वतः निःशब्द ब्रह्मच झालेला असतो. म्हणून निंदेचे किंवा स्तुतीही नाव घेत नाही. तो सदासर्वदा सर्वांगाने ‘मुकाच’ असतो.

क्रमशः

Related Stories

इतिहासाबाबत अनास्थेची हद्द…

Patil_p

ड्रगनला कोरोनाचा विळखा

Patil_p

चौदावा गुरु हत्ती

Patil_p

मोदींचे घणाघात

Patil_p

कोविडच्या छायेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन

Patil_p

शह-काटशहाचे राजकारण गतीने सुरू

Patil_p