Tarun Bharat

जनतेची तडफड, खनिजाची ओरबड!

मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन टाळण्यामागील सत्याची पोलखोल : बिनधास्तपणे खनिजाची वाहतूक,व्हिडिओ वायरमुळे माजली खळबळ

जय नाईक / पणजी

कोरोनाच्या उच्छादात हजारो लोक होरपळत असतानाही मुख्यमंत्री राज्यात लॉकडाऊन करण्यास का तयार होत नव्हते, त्याची सत्यता दर्शविणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून केवळ ’पॅसिनो’ आणि खाणींचे हित जपण्यासाठीच सरकारने हजारो लोकांच्या प्राणांशी ’जुगार’ केला हे आता पुराव्यासह सिद्ध झाले आहे.

’गोवा कोरोनाने होरपळत असताना सरकार खाणी ओरबाडण्यात व्यस्त होते’, असे म्हणण्यासारखाच हा प्रकार असून त्याच मोहापायी सरकारने कोरोनाच्या प्रसारास मुक्तवाट करून दिली, अशी जोरदार टीका सर्व स्तरातून होऊ लागली आहे.

कोरोनाच्या उच्छादात सरकारचे अर्थकारण

राज्यात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. इस्पितळे रुग्णांनी खचाखच भरलेली आहेत. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रोज 60-70 लोकांचे बळी जात आहेत, अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, घरोघरी लोकांचे आक्रोश ऐकू येत आहेत, गावोगावी सरणे जळत आहेत, काही ठिकाणी तर स्मशानभूमीतसुद्धा जागा अपुऱया पडू लागल्या आहेत, असे एकूणच राज्यातील चित्र असताना सरकार मात्र अर्थकारण डोळ्यांसमोर ठेऊन लॉकडाऊन टाळत होते.

सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही

एप्रिल महिन्यात 338 जणांचे बळी गेले तर मे महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसातच 511 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधितांच्या संख्येनेही रोज नवनवे विक्रम प्रस्थापित केले. कधी नव्हे ते एका दिवसात चार हजारपेक्षा जास्त लोक बाधित झाले आहेत. तज्ञांच्या मतानुसार सध्या प्रत्येक दुसऱया व्यक्तीमागे एक बाधित असे प्रमाण झाले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड भीती पसरू लागली. तरीही सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही.

खुद्द आरोग्यमंत्रीही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात

आता तर खुद्द आरोग्यमंत्रीही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. ’खरे तर महिन्याभरापूर्वीच लॉकडाऊन करणे आवश्यक होते. तसा सल्लाही आपण मुख्यमंत्र्यांना दिला होता. परंतु त्यांनी तो पाळला नाही व पर्यटनासाठी राज्याच्या सीमा खुल्या ठेवल्या. त्यामुळेच डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात हजारो पर्यटक गोव्यात आले. कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मुक्तपणे वावरले व कोरोनाचा कहर माजवून गेले’, असा दावाही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री हट्टापासून जराही हटले नाहीत

आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही सरकारवर जोरदार टीका करून उघडे पाडले होते. त्याचबरोबर अनेक मंत्र्यांसह विरोधी आमदारही सरकारवर तुटून पडले होते. वकील संघटना न्यायालयात गेली होती, शेजारील महाराष्ट्रानेही गोव्याला इशारा देऊन पाहिला. परंतु मुख्यमंत्री आपल्या हट्टापासून जराही हटले नाहीत.

अखेरीस शेजारील राज्यांनी लॉकडाऊन पुकारले, त्यामुळे आपसूकच पर्यटक येणे बंद झाले. परिणामी पॅसिनोंचा धंदा पडला. तेव्हा कुठे सरकारला गोमंतकीयांचा पुळका आला व ’इन मीन साडेतीन’ दिवसांची टाळेबंदी घोषित करण्यात आली. परंतु सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेऊन केलेली ही टाळेबंदी सुद्धा फसवीच होती हे लोकांच्या लक्षात येताच त्या निर्णयावरही जोरदार टीका झाली.

तरीही मुख्यमंत्री लॉकडाऊन कालावधी न वाढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. कारण त्याच काळात राज्याच्या दुसऱया भागात खाण व्यवसाय प्रचंड बहरला होता. शेकडोंच्या संख्येने ट्रक भरभरून खनिज बाहेर नेले जात होते.

गोव्याच्या 70 वर्षांच्या खनिज व्यवसायाच्या इतिहासात कोणत्याही खाणीवर कधी दिसले नसतील एवढे ट्रक एकेका खाणीवर वावरत होते. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्य होईल तेवढे खनिज खाणींबाहेर नेण्याच्या प्रयत्नांतूनच शेकडो ट्रकांची पळापळ सुरू होती. हे अर्थकारण डोळ्यांसमोर असताना लॉकडाऊन करणे मोठय़ा नुकसानीला आमंत्रण देण्यासारखेच ठरले असते, म्हणुनच ते टाळण्यात आले, अशी टीका आता होऊ लागली आहे.

हे एकूण चित्र पाहता स्वतः खाणमंत्रीही असलेल्या मुख्यमंत्र्यांना केवळ पॅसिनो आणि खाणींचेच हित महत्वाचे वाटत होते. त्यामुळेच ’राज्याची आर्थिक स्थिती खालावेल’ हे एकमेव पालुपद लावत ते लॉकडाऊन टाळत होते, हेच सिद्ध होत आहे, असेही लोक उघडपणे बोलू लागले आहेत. दरम्यान, सदर व्हिडिओ दक्षिण गोव्यातील एका खाणीचा असल्याचे स्पष्ट झाले असून त्यात सुमारे 200 ते 250 ट्रक वावरताना दिसत आहेत. त्याशिवाय तेवढय़ाच संख्येने ट्रक खनिज घेऊन बाहेरही गेलेले असतील, म्हणजेच रोज 500 च्या आसपास ट्रक एका खाणीवर कार्यरत होते, हेच त्यातून स्पष्ट होते, असे मत खाण क्षेत्रातील एका जाणकाराने व्यक्त केले आहे.

Related Stories

एनसीबीने हेमंत साहाच्या आवळल्या मुसक्या

Amit Kulkarni

पहिल्या खाण लिलावात वेदांताची बाजी

Patil_p

राज्यात एप्रिलमध्ये 52 मी.मी पावसाची नोंद

Patil_p

2 लाख नवीन नोकऱ्यांसह अनेक उद्दीष्टांचा गोवा तृणमूल आणि मगोचा गोमंतकियांसाठी जाहीरनामा

Abhijeet Khandekar

गुप्त अहवाल हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

Amit Kulkarni

तिसवाडी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्पे निवृत्त शिक्षक, विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Amit Kulkarni