प्रतिनिधी /पणजी
पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका डॉ. लता सत्यवान नाईक यांची एशिया पॅसिफिक कल्चरल सेंटर फॉर युनेस्को (ए. सी. सी. यु.) संस्थेतर्फे आयोजित भारत व जपान टिचर्स एक्सचेंज प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
केंद्र आणि जपान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा भारत-जपान सहावा शिक्षक देवाण-घेवाण प्रशिक्षण कार्यक्रम 12 ते 19 डिसेंबर 2021 दरम्यान होणार आहे. त्यासाठी गोव्यातील दोन शिक्षकांसह एकूण 15 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत डॉ. लता सत्यवान नाईक व शिरशिरे बोरी येथील विवेकानंद विद्यालयाचे चित्तरंजन देवूलकर यांचा समावेश आहे.
दि. 12 रोजी सकाळी 10.30 वाजता जपानच्या एम. ई. एक्स. टी, संस्थेचे संचालक मुराकामी ताकाहिसा यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल. या प्रसंगी टोकीयोतील भारताचे राजदूत व प्रथम सचीव ( राजकी व शिक्षण ) श्रीमती सुमन कनसोटीया, एशिया पॅशसिफीक कल्चरल सेंटर फॉर युनेस्कोच्या संचालक श्रीमती शिंदो युमी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या प्रसंगी जपानातील योकोहामा म्युनिसीपल हिगाशी हायस्कूलला आभासी भेट व त्या शाळेतील मुलांशी संवाद साधून तेथील शैक्षणिक पध्दती व वैविधतेची माहिती या शिक्षकांना देण्यात येईल.
डॉ. नाईक यांची या अंातरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाल्याबद्दल प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, व्यवस्थापक दत्ता भी. नाईक, एल.डी. सामंत विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक राजकुमार देसाई, प्राचार्य दामोदर म्हार्दोळकर यांनी अभिनंदन केले आहे.