Tarun Bharat

जम्मू एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला

तांत्रिक विभागात मध्यरात्री दोन स्फोट – एनआयए-फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

जम्मू / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याचे दिसत आहे. जम्मू येथील वायूदलाचा तळ रविवारी मध्यरात्री झालेल्या दोन स्फोटांनी हादरला. भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून कसून तपास सुरू करण्यात आला आहे. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही झालेल्या या स्फोटांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, स्फोटांची माहिती मिळाल्यानंतर लडाख दौऱयावर असलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या अधिकाऱयांशी चर्चा करत घटनेचा आढावा घेतला.

जम्मू  येथील वायूदलाच्या तळावर करण्यात आलेल्या या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याचे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे. ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून दहशतवादी हल्ला असण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. रविवारी मध्यरात्री पाच मिनिटांच्या अंतराने हे दोन स्फोट झाले आहेत. रात्री 1 वाजून 27 मिनिटांनी पहिला तर 1 वाजून 32 मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. पहिल्या स्फोटामध्ये इमारतीच्या छताचा भाग कोसळला असून दुसरा स्फोट मोकळय़ा परिसरात घडला. ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून यासाठी स्फोटक उपकरणाचा वापर करण्यात आल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट झाले आहे.

भारतीय हवाई दलाने ट्विट करत हल्ल्यासंबंधीची माहिती दिली असून स्फोटात मोठे नुकसान झालेले नाही. तसेच याप्रकरणी स्थानिक यंत्रणांसोबत तपास सुरू असल्याचे सांगितले. स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण परिसर सील करण्यात आला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सध्या घटनास्थळी असून स्फोटांचे मुख्य कारण शोधत आहेत.

हल्ल्यानंतर मोठय़ा घडामोडींना वेग

सध्या हा हल्ला कोणी केला? हे समोर आलेले नसले तरी या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे दिसत आहे. हा हल्ला भारतीय वायूसेनेवर करायचा होता का? हा हल्ला म्हणजे पठाणकोटप्रमाणे पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता का? दरम्यान हे प्रश्न उपस्थित होत असताना या ठिकाणी ‘एनआयए’ची टीमदेखील दाखल झाली आहे. या हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तात्काळ हवाई दलातील अधिकारी एच. एस. अरोरा यांच्याशी चर्चा करत परिस्थिती जाणून घेतली आहे.

…हल्ला दहशतवाद्यांकडूनच- डीजीपी दिलबाग सिंह

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी जम्मू एअरफोर्स स्टेशनवर रविवारी झालेले दोन हल्ले ‘दहशतवादी’ असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिक माहिती हातात आल्यानंतर इतरही काही संशयितांना अटक केली जाऊ शकते. इतर तपास संस्थांसोबत जम्मू पोलीस एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहेत. जम्मू एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेली स्फोटके ड्रोनचा वापर करून टाकण्यात आल्याचा संशय असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ‘युएपीए’च्या कलम 16, 18, 23 अंतर्गत तसेच ‘आयपीसी’च्या कलम 307 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस, हवाई दल आणि अन्य तपास संस्था या हल्ल्याचा तपास करत आहेत.

काश्मीरसह पठाणकोट एअरबेसवर अलर्ट

जम्मूमध्ये हवाईतळावर झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले. तसेच पठाणकोट एअरबेसमध्ये हायअलर्ट जारी करत सुरक्षाही वाढविण्यात आली. विशेषतः पंजाबचे सीमावर्ती क्षेत्र आणि गुरुदासपूर येथेही सुरक्षा वाढवली आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्याने ममून छावणीलाही विशेष सुरक्षा कवच पुरविले आहे. श्रीनगरमध्येही राज्य पोलिसांसह अन्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Related Stories

जम्मू-काश्मीर : प्रायोगिक तत्वावर 4 जी सेवा सुरू होणार

Patil_p

आप आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक

Patil_p

गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा

datta jadhav

विमानात तांत्रिक बिघाड नव्हता!

Patil_p

क्या बोलना है, आजका थीम क्या है !

Patil_p

वुहानचे नागरिक मायदेशातच ‘अस्पृश्य’

Patil_p