ऑनलाईन टीम / जम्मू :
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे सुपुत्र उमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, माझ्या वडिलांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यामध्ये काही सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.


पुढे ते म्हणाले, मी आणि माझे कुटुंब जो पर्यंत आमची कोरोनाची टेस्ट होत नाही तोपर्यंत घरामध्येच विलगीकरणात राहणार आहोत. तसेच मागील काही दिवसांपासून जे कोणी आमच्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतः ची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, फारुक अब्दुल्ला यांनी याच महिन्यात कोरोनाची पहिली लस टोचून घेतली होती तरी देखील त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. सद्य स्थितीत जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
मागील 24 तासात 235 नवे रुग्ण आढळून आले. तर 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यातील एकूण संख्या 1 लाख 30 हजार 228 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1989 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 2,110 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 1 लाख 26 हजार 129 जणांनी कोरोनावर मात केली आहे.