- सलग दुसऱ्या वर्षी नाही होणार बाबा बर्फानींचे दर्शन
ऑनलाईन टीम / जम्मू :
कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील भाविकांना बाबा बर्फानींचे दर्शन करता येणार नाही आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने यावर्षी सुद्धा अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2020 मध्ये देखील कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती.


याबाबतची घोषणा उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी प्रतिकात्मक स्वरुपात यात्रा होईल. सर्व पारंपारिक विधी पूर्वीप्रमाणे केले जातील. लोकांचा जीव वाचवणे हे खूप महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, हिमालयाच्या उंच भागात 3,880 मीटर उंचीवर असलेल्या भगवान शिवाच्या गुहेतील मंदिरासाठी 56 दिवसीय यात्रा 22 जून रोजी पहलगाम आणि बालटाल मार्गे सुरू होणार होती आणि 22 ऑगस्टला संपणार होती. पण यावर्षी पुन्हा एकदा अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.
पुढे ते म्हणाले की, अमरनाथ श्राइन बोर्ड करोडो भाविकांच्या भावना समजतात आणि हे लक्षात घेऊन बोर्डाने सकाळी आणि संध्याकाळच्या आरतीचे लाईव्ह दर्शनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.