Tarun Bharat

‘जरंडेश्वर’चा नेमका मालक कोण ?

Advertisements

वार्ताहर/ एकांबे

15 वर्षे राज्यात यांचेच सरकार होते, पवार कुटुंबातील मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री होते, त्यावेळेस पध्दतशीरपणे साखर कारखाने आजारी पाडण्यात आले, या कारखान्याला जाणता राजा म्हणवणाऱयांनी मदत करावयास हवी होती, मात्र त्यांनी व त्यांच्या कंपूने पध्दतशीरपणे कारखाने बळकावले, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. जरंडेश्वर कारखान्याचा नेमका मालक कोण? असा थेट सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव घेऊन केला, हिंमत असेल तर माझ्यावर हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा, असे ओपन चॅलेंज देखील दिले.

किरीट सोमय्या यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव कांबळे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह बुधवारी सकाळी चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली. प्रवेशद्वारावरच कार्यकारी संचालक किसनराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या संचालक मंडळाने त्यांचे जरंडेश्वररुपी मारुतीरायाची मूर्ती देऊन स्वागत केले. कारखाना उभारणीत आपली हयात घालवलेले व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले-पाटील, भगवानराव फाळके, श्रीमती जाधव, दत्तुभाऊ धुमाळ, अविनाश फाळके यांच्याशी सोमय्या यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार टीका केली. प्रत्येक शब्दात त्यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधण्याचे काम केले.

सोमय्या पुढे म्हणाले की, 80-85  वर्षांचे शेतकरी सभासद असून, त्यांनी हा कारखाना स्थापन केला. ते गेल्या काही आठवडय़ात मला तीनवेळा भेटले. मुंबईत भेटले आणि साताऱयात भेटले. त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही या, तुम्ही संचालक आणि कारखान्याच्या मूळ संस्थापकांच्या व्यथा ऐका, म्हणून मी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी येथे आलो आहे. जरंडेश्वर कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत बोलण्यास मी आलो नाही, या कारखान्याचा मालक कोण, अजित पवार यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवावे, या कारखान्याचे मालक कोण, चालवतोय कोण, बेनामी पध्दतीने ताब्यात कसा घेतला, याची कथा अजित पवारांनी सांगावी, म्हणजे त्याच्यावर एक पिक्चर बनवता येईल, असे सोमय्या म्हणताच एकच हशा पिकला.

मी जे आज सांगतोय, त्याचे विश्लेषण तुम्हाला काही दिवसात समजेल.  कारखाना स्वतःच्या ताब्यात का घेतला जातो, तो बेनामी का ठेवला जातो ? याचे उत्तर द्या. आज जो कारखाना सुंदर चालतोय, मग तो शेतकऱयांच्या ताब्यात ठेवून चांगला चालवता येत नाही का?  असा सवाल देखील सोमय्या यांनी केला. तुमचे सरकार 15 वर्षे होते, तुमच्या परिवारात मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री आणि तुम्ही 15 वर्षे पहिले उपमुख्यमंत्री होता, आता दोन वर्षे उपमुख्यमंत्री आहात, तुमच्या काळात ज्या पध्दतीने कारखाने ताब्यात घेण्यात आले आहेत, अशा पाच कारखान्यांचा मी अभ्यास करत आहे, एक कंपनी, दुसरी कंपनी करत मी पाच लेअरपर्यंत पोहोचलो आहे. अजून मालक सापडत नाही. कारखाना लिलावात विकला जातो आणि कारखाना विकत घेतल्यावर काही दिवसात 85 कोटीचे कर्ज कसे मिळते, याचा अभ्यास करत असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

न्यायालयाच्या चौकशीत सत्य काय ते बाहेर येईल

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कारखान्याची चौकशी सुरु आहे, चौकशीमध्ये सर्व काही बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. शालिनीताई पाटील म्हणतात की, दोन्ही पवार हे आतमध्ये जातील, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी हा घोटाळ्याच्या चौकशीचा भाग आहे, त्याला कायदा आहे, नियम आहे. न्यायालय त्याबाबत निर्णय घेईल, असेही किरीट सोमय्या यांनी निदर्शनास आणून दिले.

पवारांचा ‘किसनवीर’ वर डोळा आहे काय?

पत्रकारांनी अजित पवार म्हणतात की, किरीट सोमय्या यांना किसनवीर साखर कारखान्याच्या सभासदांचा आक्रोश दिसत नाही का, हा प्रश्न उपस्थित केला, त्यावर उसळी घेत सोमय्या म्हणाले की, पवार परिवाराचे किसनवीर कारखान्यावर  लक्ष आहे काय? याचे उत्तर अजित पवार यांनी दिल्यानंतर मी पुढचे उत्तर देईन, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.

जरंडेश्वर कारखाना बंद पडणार नाही ः किरीट सोमय्या

 जरंडेश्वर साखर कारखाना दहशतीच्या जोरावर बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर असे हाऊ देणार नाही. शेतकऱयांना हा कारखाना परत मिळवून देऊ, कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालूच राहील, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शेतकऱयांना दिला. जरंडेश्वर कारखान्यात जर घोटाळा झाला असेल तर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची चौकशी होईल, कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना बंद राहणार नाही, शेतकरी व कामगार हित पाहिले जाईल, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी याबाबत गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.

पोलिसांचे प्रसंगावधन; अनुचित प्रकार घडला नाही

जरंडेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभारासंबंधी किरीट सोमय्या यांना काही जागरुक सभासद माहिती देत असताना, त्यास काही जणांनी विरोध केला, त्यांच्यामध्ये हमरीतुमरी सुरु झाली, पोलिसांबरोबरच स्वतः सोमय्या यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. तुमचे होईपर्यंत आम्ही थांबलो आहे, आता तुम्ही थांबा, असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी सुरु होती. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे यांच्यासह पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि सर्वांना बाजूला केले, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जागरुक सभासदांची निवेदने घेऊन, ती स्वीय सहाय्यकाकडे देत किरीट सोमय्या यांनी बारामतीकडे प्रस्थान केले.

जरंडेश्वरच्या व्यवस्थापनास किरीट सोमय्या भेटलेच नाही

किरीट सोमय्या यांना जरंडेश्वर शुगर मिल्सच्या व्यवस्थापनातील अधिकारी भेटण्यासाठी उत्सूक होते. त्यांनी भला मोठा पुष्पगुच्छ आणला होता. सर्वचजण कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आले होते, पोलिसांनी मात्र त्यांना आतल्या बाजूस थांबण्यास सांगितले. सोमय्या यांना भेटीसाठी व्यवस्थापनाने पोलीस यंत्रणेमार्फत निरोप दिले, मात्र सोमय्या यांनी त्यांना भेटायचे पध्दतशीरपणे टाळले.  

सोमय्या यांनी जरंडेश्वर शुगर मिल्स परिसराची पाहणी करावी, कारखान्यासंदर्भात आजपर्यंत न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांचे निकाल व त्यासंबंधीची कागदपत्रे पहावीत, अशी आमची भूमिका होती, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांना तशी पूर्वकल्पना दिली सुध्दा होती. कारखान्याचे काही अधिकारी गर्दीत जाऊन सोमय्या यांना विनवणी करत होते. मात्र किरीट सोमय्या आम्हाला न भेटता निघून जाणे, त्यांनी पसंत केले, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.  

Related Stories

इचलकरंजीत महिलेसह दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

ढेबेवाडीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना टेस्ट

Archana Banage

नगरमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार?

datta jadhav

सातारा : पांडे-खानापूर हद्दीलगत टाकलेल्या मळीने विहीरीचे पाणी होणार दुषीत

Archana Banage

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधमांना फाशी दया…

Archana Banage

फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; नेत्यांची बोलावली बैठक

Archana Banage
error: Content is protected !!