Tarun Bharat

जर्मनीच्या विजयाला पोर्तुगालचाही हातभार!

युरो चषक फुटबॉल स्पर्धा -अवघ्या 5 मिनिटातील 2 स्वयंगोलांचा पोर्तुगालला फटका

बुडापेस्ट / वृत्तसंस्था

ग्रूप ऑफ डेथमध्ये समाविष्ट जर्मनीने युरो चषक साखळी सामन्यात पोर्तुगालला 4-2 अशा सनसनाटी फरकाने मात दिली असली तरी जर्मनीच्या या विजयात पोर्तुगालचा हातभारच अधिक महत्त्वाचा ठरला. पोर्तुगालने 35 ते 39 या अवघ्या 5 मिनिटांच्या कालावधीत चक्क 2 स्वयंगोल केले आणि इथे विजयश्रीने जर्मनीच्या पारडय़ात आपले वजन टाकले. या विजयामुळे जर्मनीच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशाअपेक्षा कायम राहिल्या आहेत.

या लढतीपूर्वी पोर्तुगालने मागील सामन्यात हंगेरीचा 3-0 असा धुव्वा उडवला असल्याने व दुसरीकडे जर्मनीला फ्रान्सविरुद्ध 0-1 फरकाने पराभवाचा सामना करावा लागला असल्याने त्या निकालाचे प्रतिबिंब या लढतीत थोडय़ाफार फरकाने तरी उमटावे, अशी पोर्तुगीज चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात रोनाल्डोने 15 व्या मिनिटाला केलेल्या पहिल्या गोलचा अपवाद वगळता वेगळेच चित्र दिसून आले.

या लढतीत जर्मनीने सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत एकच खळबळ उडवून दिली. पण, रिप्लेमध्ये तो अवैध असल्याचे दिसून आल्याने पोर्तुगालला दिलासा मिळाला. त्यानंतर 15 व्या मिनिटाला पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोलकोंडी फोडत युरो स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी 12 वा गोल नोंदवला. योग्य वेळी योग्य ठिकाणी तैनात रोनाल्डोने गोलजाळय़ाचा वेध घेतला आणि पोर्तुगीज चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. अर्थात, पोर्तुगालचा हा आनंद काही कालावधीपुरताच टिकला आणि याला कारणीभूत देखील पोर्तुगालचे खेळाडूच ठरले.

या पहिल्या सत्रात पोर्तुगालने अवघ्या 4 मिनिटात चक्क 2 स्वयंगोल केले आणि याचा त्यांना पहिल्या सत्राअखेर 1-2 फरकाने पिछाडीवर फेकले जाण्याच्या रुपाने फटका बसला. 35 व्या मिनिटाला रुबेन डियास व 39 व्या मिनिटाला राफाएल ग्युएरोच्या स्वयंगोलामुळे पोर्तुगाल संघाचे येथे चांगलीच फरफट झाली.

51 व्या मिनिटाला हॅवेर्त्झने गोल नोंदवला, त्यावेळी जर्मनीची छोटय़ा पासेसवर भर देण्याची रणनीती चांगलीच फळल्याचे स्पष्ट झाले. पुढे 10 मिनिटातच लेफ्ट-बॅक गॉसेन्सने पोर्तुगीज बचावाच्या मर्यादा आणखी एकदा चव्हाटय़ावर आणत संघाचा चौथा गोल नोंदवला. जर्मन संघ 4-2 फरकाने आघाडीवर असताना पोर्तुगाल संघाची धार किंचीत कमी झाली आणि हाच गोलफरक निर्धारित वेळेपर्यंत कायम राहिला.

वास्तविक, फर्नांडो सॅन्तोस यांचे प्रशिक्षण लाभत असलेल्या पोर्तुगाल संघाने एकंदरीत फॉर्म पाहता, येथे जर्मनीला नमवून अंतिम 16 संघातील आपले स्थान निश्चित करणे अपेक्षित होते. मात्र, रोनाल्डोने एकदा गोलजाळय़ाचा वेध घेऊनही त्यांच्या पदरी निराशा आली आणि यासाठी त्यांना कमकुवत बचावफळीला दोष देणे भाग आहे. दुसरीकडे, जर्मनी संघासाठी मात्र हा विजय अतिशय हवाहवासा होता, तो त्यांनी मिळवण्यात यश प्राप्त केले. युरो स्पर्धेत सलग चौथ्यांदा बाद फेरी गाठण्याचा जर्मनीचा यापुढे प्रयत्न असणार आहे.

Related Stories

‘तो’ विक्रम न केल्याबद्दल युवराजने मानले आभार!

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी साथियनकडून 1 लाखाची मदत

Patil_p

नेदरलँड्स, न्यूझीलंड, बेल्जियम, जर्मनीची विजयी सलामी

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टबॉल संघाचे जपानमध्ये आगमन

Amit Kulkarni

जोकोविच एटीपी अंतिम स्पर्धेसाठी पात्र

Patil_p

वर्ल्ड रॅपिड चेसमध्ये सविताला कांस्यपदक

Amit Kulkarni