Tarun Bharat

जर्मनीत जनजीवन पूर्वपदावर

Advertisements

नियमांचे बंधन कायम : देवगडची सुकन्या विद्या राणे यांची माहिती : उत्कृष्ट वैद्यकीय सेवा व नियमांचे पालन केल्याने नियंत्रण

प्रशांत वाडेकर / देवगड:

जर्मनीमध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. कोरोनाची मोठी लढाई आम्ही जर्मनीत राहून लढली आहे. येथे 4 मेपासून लॉकडाऊन शिथील करण्यात आले असून सर्व आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती देवगड तालुक्यातील हिंदळे येथील सुकन्या विद्या राणे यांनी जर्मनी हिल्डन येथून दिली.

विद्या राणे या आपल्या पतीसमवेत गेल्या तीन वर्षापासून जर्मनीमध्ये वास्तव्यास आहेत. त्या व त्यांचे पती एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहेत. तेथील परिस्थितीबाबत ‘तरुण भारत’शी बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कित्येक देश लॉकडाऊनमध्ये आहेत. तसेच जर्मनीमध्येही गेले दोन महिने लॉकडाऊन होते. इथे लॉकडाऊनमध्ये शाळा, बालवाडय़ा, रेस्टॉरंट, दुकाने बंद करण्यात आली आहेत. फक्त अत्यावश्यक दुकाने व त्यात किराणा माल, मेडिकल्स सुरू ठेवण्यात आली आहेत. शक्य तितक्या लोकांना घरातूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरू आहे. लोकांना जॉगिंग, वॉकिंग, सायकलिंग करण्यास परवानगी आहे. असे असूनही लोक नियमांचे कोटेकोरपणे पालन करीत आहेत. दोनपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी आहे. दोन मीटर अंतर ठेवणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वाहतुकीमध्ये, दुकानांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

इतर देशांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी

इथे लोकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 200 ते 25,000 युरो असा दंड आकारण्यात येतो. जर्मनीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. आतापर्यंत एक लाख 79 हजार लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. जवळपास आठ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याची संख्याही जास्त आहे. एक लाख 59 हजार लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.

जर्मनीची इतर देशांनाही वैद्यकीय मदत

जर्मनीमध्ये वैद्यकीय सेवा उत्कृष्ट असल्यामुळे आणि लोकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जर्मनी स्वत: संकटात असूनही आपले शेजारी देश इटली, स्पेन, फ्रान्समधील कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहे.

जनजीवन पूर्वपदावर

जर्मनीमध्ये 4 मेपासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. दुकाने, लहान मुलांचे प्ले ग्राऊंड, प्राणी संग्रहालय सुरू करण्यात आली आहेत. परंतु सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नियोजन करून लवकरच शाळा, बालवाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. एकंदरीत पुन्हा जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे.

घरी रहा, सुरक्षित रहा!

सौ. राणे म्हणाल्या, घरी असल्यामुळे स्वत:साठी व कुटुंबासाठी अधिक वेळ देता आला. घराच्या आवारात विविध प्रकारच्या फुलांची लागवड, सायकलिंग, मुलांसोबत चित्रकला, गोष्टी वाचन असे बरेच छंद जोपासता आले. भारताने योग्यवेळी लॉकडाऊन करून अतिशय योग्य निर्णय घेतला. भारतातही कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, कृपया नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य करा. माझे भारतातील कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी काटेकोरपणे नियम पाळत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुकच. पण, इतरांनीही नियम काटेकोरपणे पाळावेत. घरी राहून तुम्ही तुमचे, कुटुंबाचे आणि आपल्या देशाचे रक्षण करा. सर्व मिळून कोरोनावर मात करू. ‘घरी रहा… सुरक्षित रहा…’ असा सल्ला तिने दिला आहे.

Related Stories

लग्न ‘सोहळय़ा’चा अट्टाहास नडला

NIKHIL_N

कोलगाव विलगीकरण कक्षासह कंटेनमेंट झोनला जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट

Ganeshprasad Gogate

निकृष्ट पोषण आहार, रत्नागिरीत गोडावून सील

Patil_p

विद्युतीकरणानंतर कोकण रेल्वेचे कोटय़वधी रुपये वाचणार

NIKHIL_N

भक्ती कॅश्यु फॅक्टरीचे मालक विजय चव्हाण यांचे निधन

Ganeshprasad Gogate

शास्त्री पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडीटमुळे वाहनांच्या रांगाच रांगा

Patil_p
error: Content is protected !!