Tarun Bharat

जलप्रलयामुळे दोन हजार कोटींचे नुकसान

Advertisements

हजारो घरे उद्ध्वस्त, :अनेक जनावरे दगावली, 25 हजार कोंबडय़ांचा मृत्यू,अनेक गाडय़ा बंद पडल्या,कुळागरांचे अतोनात नुकसान

प्रतिनिधी /पणजी

जलप्रलयामुळे झालेले नुकसान रु. 2000 कोटींच्या घरात पोहोचलेले आहे. हजारो घरे, उद्धवस्त, असंख्य जनावरे वाहून गेली. अनेक गाडय़ांमध्ये पाणी जाऊन बंद पडल्या. कुळागरांचे झालेले नुकसान वेगळेच. अनेक ठिकाणी संरक्षक भिंती, कठडे वाहून गेले आहेत. दोन पुलांची नव्याने उभारणी करणे भाग पडलेले आहे. काही भागात भौगोलिक परिस्थितीत झालेला बदलही घातक ठरला आहे. दरम्यान, पूर आला त्या दिवशी खडकी-सत्तरीमध्ये 1952 नंतर प्रथमच 16 मीटर उंचीचे पाणी होते. 1982 पेक्षाही हा भयंकर पूर होता. घाट विभागात 17 इंचांपेक्षा जास्त पडलेला पाऊस या पुरास कारणीभूत ठरला.

राज्यात आलेल्या महाभयंकर पुराने गोव्यातील हजारो नागरिक बेघर झालेले आहेत. शेजारीपाजारी उंच भागातील घरांमध्ये, मंदिर परिसरात, गोठय़ातदेखील अजूनही आसरा घेत आहेत. डोळय़ादेखत कोसळलेल्या घरांच्या त्या दृष्याने बसलेल्या धक्क्यातून अद्याप माणसे सावरलेली नाहीत. सत्तरी, धारबांदोडा या दोन तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त फटका बसलेला आहे. अद्याप पूल कोसळलेल्या गावांशी आता थेट संपर्क होत नाही. कारण गावाला जोडणारा दुसरा रस्ता नाही. प्राप्त माहितीनुसार, उसगाव येथील एका कुक्कुटपालन करणाऱया कंपनीच्या 25 हजार कोंबडय़ा बुडून मरण पावल्या. असंख्य जनावरे वाहून गेली. कित्येकांची घरे गेली.

आता ज्यांची घरे गेलेली आहेत त्यांना ती कोणी बांधून द्यायची? सरकारची मदतही तुटपुंजीच असते. भटवाडी-अडवई येथील विलास ऊर्फ राजू सावईकर यांनी सांगितले की, आमची मुख्य तीन घरे व त्यात एकूण सात उपघरे अशी सर्वच कोसळली. ही अत्यंत जुनी घरे होती. परंतु आम्हाला पुराची कल्पना नव्हती. पहाटेच आम्हाला उठवून घरातून बाहेर काढले. आमचे प्राण वाचले. गांजे येथे बंधारा बांधल्यापासून आमच्या येथे पूर येऊ लागला. यावर्षी या पुराने शिखर गाठल्याने आमच्या घरांचे नुकसान झाले.

29 इंच पावसाने म्हादईचे पाणी आले 16 मीटर उंच

दरम्यान, जलस्रोत खात्याचे प्रधान अभियंता बदामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की घाटमाथ्यावर 17 इंचांपेक्षाही जास्त पाऊस झाला. तर वाळपईमध्ये एकूण 12.5 इंच पाऊस झाला. वरून येणारे पाणी आणि मुसळधार पाऊस असे एकूण 29 इंच पावसाचे पाणी एकत्रित आल्यानंतर काय अवस्था होईल? म्हादईमध्ये जी पाण्याची पातळी वाढली, बहुदा 1950 नंतर प्रथमच एवढय़ा प्रमाणात वाढली. तब्बल 16 मीटर उंचीचे पाणी म्हादईमध्ये होते. खडकी पूल 13.5 मीटर उंचीवर आहे. तिथे चक्क 2.6 मीटरने पाणी वाढले. एकूण पाणी 16 मीटरपर्यंत वाढलेले होते. 1982 मध्ये जेव्हा मोठा पूर आला होता त्यावेळी म्हादईचे पाणी साधारणपणे 12 मीटरपर्यंत आले होते. गोव्यात विशेषतः सत्तरीमध्ये व डोंगरावर त्या दिवशी 12 इंचांपेक्षा जास्त पाऊस पडला होता. तर घाटमाथ्यावर 17 इंचांपेक्ष्हह जास्त पाऊस झाला.

म्हादईला मिळतात आठ मोठय़ा नद्या

म्हादई नदीला गोव्यातल्या एकूण आठ मोठय़ा नद्या मिळतात. ज्या त्या दिवशी मुसळधार पावसाने डेंजर झोनच्या बाहेर जाऊन वाहत होत्या. म्हादई मुख्य नदीला नानोडा, कृष्णापूर नदी, वेळूस, कोदाळ, खोतोडे, रगाडा, खांडेपार या नद्यांबरोबरच अडवई नाला एवढय़ा सर्वांचे पाणी एकत्रित आल्यानंतर म्हादईचे पाणी सरळ वाहून खाली जाण्याऐवजी माघारी आले आणि पुराची व्यापकता वाढली. मध्यरात्री 3 वाजता सुरू झालेला पूर पहाटे 5 वाजता वेगाने पाणी वाढण्यास प्रारंभ झाला. सकाळी 8 वाजेपर्यंत महापुराने अक्राळविक्राळ रुप धारण केले.

सांखळीकरांनाही वाचवले!

जलस्रोतखात्याने विशेषतः बदामी यांनी त्या दिवशी मोठी जोखीम पत्करली आणि अणजुणे धरणात जे अतिरिक्त 2.5 मीटरने पाणी वाढले. केरी धरण परिसरात त्या दिवशी 9 इंचांपेक्षा जास्त पाऊस कोसळला होता. सांखळीत पूर येण्यास प्रारंभ झालेला अशा वेळी अणजुणे धरणातील पाण्याचा विसर्ग केला असता तर संपूर्ण सांखळी जलमय झाली असती. कारण सांखळी शहरात उभारलेल्या पूरसंरक्षक भिंतीवरून पाणी जाण्यास केवळ दोन फूट कमी होते. ते वाढले असते तर सांखळी बुडण्याची भीती होती. सांखळीतील पूर लवकर ओसरल्यानंतर धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला असे बदामी म्हणाले. पाणी जादा वेळ साठवून ठेवणेदेखील फार मोठी जोखीम असते, असे ते म्हणाले.

Related Stories

हवाला प्रकरणी बाणावलीत छापे

Amit Kulkarni

वादळी पावसामुळे घरे, शेती, बागायतींचे नुकसान

Amit Kulkarni

मंत्री माविन गुदिन्हो व संकल्प आमोणकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल, नेत्यांनी घेतले दामोदराचे दर्शन

Amit Kulkarni

डय़ुरँड स्पर्धेत आज बेंगलोर एफसी-एफसी गोवा उपान्त्य लढत

Amit Kulkarni

अनिल होबळे यांना जीवनगौरव पुरस्कार

Amit Kulkarni

गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येऊया

Amit Kulkarni
error: Content is protected !!