Tarun Bharat

जलवैभव सुरक्षित राखू

Advertisements

पाणी प्रश्न दिवसेंदिवस अक्राळ विक्राळ रूप धारण करीत आहे.  सामान्य माणसाला पाण्याचे महत्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो. पाणी प्रश्नावर समाजात उद्बोधक चर्चा व्हावी, पाणी प्रश्नाचे खरे रूप सामान्यांना कळावे, जनतेनी तो प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने काही संकल्प करावेत, या दृष्टीने दर वषी 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला.

पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, अयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोडय़ा म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुद्ध होण्याची शक्मयता वर्तवली जाते, इतके त्याचे महत्त्व आहे ! एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी, आपण त्या प्रश्नाचे महत्व जनमानसावर बिंबवण्यासाठी एखादा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून पाळतो.

हा जागतिक दिन साजरा करणे सुरू करण्याचा मान एका भारतीयाला जातो. जागतिक कीर्तीचे जलतज्ञ, स्टॉकहोम जल पुरस्काराचे विजेते डॉ. माधवराव चितळे यांनी हा प्रश्न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. त्यावर भरपूर चर्चा होऊन 22 मार्च हा दिवस निवडण्यात आला. सुरूवातीला हा दिवस निवडण्याबद्दल जलतज्ञात मतभेद होते. काही जण 22 मार्चबद्दल तर काही जण 22 सप्टेंबरबद्दल आग्रही होते. बहुसंख्येने 22 मार्चला संमती मिळाली. कारण दरवषी पावसाळा सुरू होण्यासाठी 22 मार्चपासून वातावरण बदल व्हावयास सुरूवात होते. त्यामुळे तात्विकदृष्टय़ा पावसाळय़ाची सुरूवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो हा तर्क वापरून हा दिवस निवडण्यात आला.

पाण्याशी निगडीत खरे प्रश्न कोणते ?

  1. एखादी गोष्ट अति परिचित असली तर त्या गोष्टीबद्दल जास्त अज्ञान असते. पाण्याशी संबंधित प्रश्न नेमके कोणते आहेत,1. पाण्याकडे पहाण्याची मानसिकता कशी बदलता येईल ?
  2. पावसाच्या पद्धतीत होणाऱया बदलांची नोंद घेऊन पाण्याची साठवणूक कशी करता येईल ?
  3. भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल ?
  4. नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल ?
  5. तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल ?
  6. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल ?
  7. पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ?
  8. पाण्याचा अधिक उत्पादक पद्धतीने वापर कसा वाढविता येईल ?
  9. पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल ?
  10. पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल ?

मानसिकतेत बदल :

 माणसाने पाणी वापराचे प्रमाण कमी न करता व पाणी साठवणुकीविषयी उपाय न शोधता उलट पाणी वापराचे विविध मार्ग शोधून काढल्यामुळे पाणी प्रश्नाची तीव्रता वाढतच चालली आहे. ती थांबवायची असेल तर आपण आपली मानसिकता बदलून पाणी बचतीचे नवनवीन मार्ग शोधून काढावयास हवेत.

पावसाचे पद्धतीत बदल

हवामान आणि पाऊस यामध्ये पावसाच्या पद्धतीत झपाटय़ाने बदल होत आहेत. पावसातील नियमितपणा व कालवधी कमी होत चालला आहे. त्याबरोबर पावसाचा वेगही वाढत चालला आहे. वेगाने पडणारा पाऊस पाणी वाहून गेल्याने साचून राहात नाही. पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी आपण भूजलाचा उपसा भरमसाठ वाढविला आहे. कोणत्याही प्रकारचे जल पुनर्भरण न करता निव्वळ उपसा वाढविला आहे. कृत्रिम पद्धतीने जलसाठे कसे वाढविता येतील, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

नद्यांचे बारमाहीकरण

वेगाने नद्यांचे पाणी वाहून जात असल्यामुळै पावसाळा संपताच नद्या कोरडय़ा पडतात. त्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नद्या पूर्वीसारख्या बारमाही कशा वाहू शकतील, याचा विचार करावा लागणार आहे. तलावांचे पुनरूज्जीवन अत्यंत निकडीचे आहे. अतिक्रमणांमुळे कित्येक तलाव बुजवण्यात आले. एवढेच नव्हे तर वाढत्या नागरी वस्तींची गरज भागविण्यासाठी तलावांचे आकार घटत आहेत. यामुळे ग्रामीण पाणी प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे.

पाण्याचा पुनर्वापर

लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तेच ते पाणी पुनः पुन्हा वापरावे लागणार आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे जल शुद्धीकरणाचे नवनवीन मार्ग सापडत आहेत. याचा वापर करून पाण्याचा पुरवठा वाढविणे शक्मय झाले आहे. आपल्या देशात शेतीसाठी जी सिंचन व्यवस्था वापरली जाते, तिला प्रवाही पद्धती म्हणतात. यामध्ये पाण्याचा मोठय़ा प्रमाणात दुर्वापर होतो. यासाठी पाणी अधिक उत्पादक पद्धतीने वापरावे लागेल.

वाढते प्रदूषण

 जिवाणू आणि विषाणू पाण्याच्या संपर्कात आले तर पाणी प्रदूषित होते. सध्या यामुळे नद्यांतील, तलावांतील एवढेच नव्हे तर भूगर्भातील पाणी सुद्धा प्रदूषित झाले आहे. यावर ताबडतोब उपचार न झाल्यास सामाजिक आरोग्य धोक्मयात आल्याशिवाय राहणार नाही. 

पाण्याचे सरकारीकरण धोक्मयाचे

 आज संपूर्ण पाणी प्रश्न सरकारमय झाला आहे. मोठी धरणे बांधली पण त्याची योग्य वितरण व्यवस्था न उभारल्यामुळे त्या पाण्याचा योग्य वापरच होत नाही.  जागतिक बँक आपल्याला पाणी व्यवस्था सुधारा असे वारंवार सांगत आहे. पण या क्षेत्रात केली जाणारी प्रगती अत्यंत धीम्या गतीने चालू आहे. या सर्व प्रश्नांवर जलजागरण होणे आवश्यक आहे. जलदिनाच्या निमित्ताने यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. लोकांना प्रश्न समजला तरच त्याची उत्तरे शोधली जाऊ शकतील. म्हणून आपण सर्वांनी मिळून जागतिक जल दिन साजरा करू या व या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू या.

Related Stories

प्रदूषणापासून सावध व्हा !

Patil_p

इतिहास वेणुग्रामचा

tarunbharat

अभियंत्यांचे स्नेहमीलन

Patil_p

गौरव कुस्ती परंपरेचा

Patil_p

भाजण्यावर उपाय

Patil_p

धूम स्टाईलवर हवे नियंत्रण

Patil_p
error: Content is protected !!