Tarun Bharat

जांभ्या दगडांच्या टाईल्स वाढवणार घरांची शोभा!

जिल्हय़ातील पहिला कारखाना राजापुरातील ससाळे येथे सुरू

प्रकाश नाचणेकर /   राजापूर  

कोकणातील घरांना मजबुती देणारा जांभा दगड आता घरांचे सौंदर्य वाढवण्यातही मोलाची भूमिका बजावणार आहे. कारण राजापूर तालुक्यातील ससाळे येथील तरुण चिरेखाण व्यावसायिक मनोज सप्रे यांनी जांभ्या दगडापासून टाईल्स बनवण्याचा कारखाना सुरू केला आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील हा पहिलाच प्रयोग असून जांभ्या दगडांपासून तयार होणाऱया टाईल्सना मागणीही वाढू लागली आहे.

कोकणात जांभ्या दगडांचा म्हणजेच चिऱयांचा वापर घर बांधकामासाठी केला जातो. त्यामुळे कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात चिरेखाणी आहेत. कोकणातील या जांभ्या दगडाला आता घाटमाथ्यावर तसेच अन्य ठिकाणीही मोठी मागणी आहे. अशा या जांभ्या दगडापासून उत्तम दर्जाच्या टाईल्सही तयार होवू लागल्याने जांभ्या दगडाचे महत्व अधिकच वाढले आहे. मार्बल, गॅनाईडसह अन्य दगडापासून टाईल्स बनवल्या जातात, मग कोकणातील जांभ्या दगडापासून टाईल्स बनतील का, असा विचार समोर आला. यातूनच देवगड येथे पहिल्यांदा जांभ्या दगडापासून (चिरे) टाईल्स बनवण्याचा कारखाना सुरू झाला.

राजापूर तालुक्यातील ससाळे येथील तरुण चिरेखाण व्यावसायिक मनोज सप्रे यांच्याही डोक्यात चिऱयांपासून टाईल्स बनवण्याची संकल्पना आली. त्यानंतर त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून याबद्दल सर्व माहिती गोळा करून त्यासाठी लागणारी मशिन मागवली आणि जांभ्या दगडापासून टाईल्स बनवण्याचा रत्नागिरी जिल्हय़ातील पहिला कारखाना सुरू केला. सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर त्यांनी काही टाईल्स बनवल्यानंतर आता महिनाभरापासून त्यांनी व्यावसायिक दृष्टीकोनातून टाईल्स बनवण्यास सुरूवात केली आहे.

मशिनच्या सहाय्याने चिऱयांच्या वेगवेगळय़ा आकारातील टाईल्स मशिनच्या सहाय्याने कट करून त्यानंतर त्यावरील धूळ किंवा लाल रंग लागू नये, यासाठी स्वच्छ धुतल्या जातात. नंतर वेगवेळय़ा आकाराच्या बॉक्समध्ये भरून विक्रीसाठी पाठवल्या जातात. मार्बल, गॅनाईडसह पासून बनवल्या जाणाऱया टाईल्सना जसा गुळगुळीतपणा असतो तसाच गुळगुळीतपणा या स्टाईल्सनाही असल्याचे सप्रे यांनी सांगितले. सद्यस्थितीत सप्रे यांच्या कारखान्यात 6 बाय 12 आणि 14 बाय 8 इंचाच्या टाईल्स तयार केल्या जात आहेत. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळय़ा आकारातील टाईल्स देणार असल्याचे सप्रे यांनी सांगितले.

कोल्हापूर, मुंबई, पुणे येथून मागणी

जांभ्या दगडामुळे इमारतीचे तापमान स्थिर राखण्यास मदत होते. इमारतीच्या पुढील बाजूच्या सुशोभिकरणासाठी टाईल्सचा चांगला वापर करता येतो. तसेच घरांच्या भिंती सजवण्यासाठी या टाईल्सचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होत असून पुणे, मुंबई आदी प्रमुख शहरातील इंटेरीयर डिझाईनरकडून अशा टाईल्सना मोठी मागणी आहे. सध्या आपल्याकडे कोल्हापूर, मुंबई, पुणे येथून स्टाईल्ससाठी मागणी असल्याचे सप्रे यांनी सांगितले. मशिनच्या सहाय्याने टाईल्स बनवण्याचे काम स्थानिक कामगारांकडूनच होत असल्याने त्यांनाही आता वर्षभर रोजगार उपलब्ध होणार आहे.

Related Stories

धार्मिकता जपताना निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे!

NIKHIL_N

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाला वेताळ करंडक प्राप्त

Anuja Kudatarkar

जिह्यात ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत

Patil_p

अंघोळ करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Patil_p

महामार्गावरील कार अपघातात एकाचा मृत्यू

Patil_p

वेतोरे सातेरी देवीचा जत्रोत्सव रविवारी

Anuja Kudatarkar