Tarun Bharat

जावडेकर यांनी मेळावलीकरांना मार्गदर्शन करावे

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील शेतकऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यात एवढीच हिंमत असेल आणि ते खरोखरच पर्यावरण मंत्री या नात्याने पर्यावरणाचा पुरस्कार करणारे असतील तर त्यांनी मेळावलीकरांना मार्गदर्शन करावे.  तेथील लाखो चौ. मी. पर्यावरणपूरक जमीन गिळंकृत करून आयआयटी प्रकल्प बांधण्याचा जो घाट घातला जात आहे, तो प्रयत्न असफल करून दाखवावा, चोडण येथील शेतकऱयांना मार्गदर्शन करण्यापेक्षा मेळावलीतील लोकांशी चर्चा करून दाखवावी, मोले येथे दोन प्रकल्पांसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यास विरोध करणाऱया लोकांशी चर्चा करून दाखवावी, असे आव्हान काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी दिले.

जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी गोमंतकीयांची फसवणूक केली आणि आता ते शेतकऱयांची फसवणूक करण्यासाठी पुन्हा गोव्यात आलेले आहेत, असा आरोप करत काँग्रेसतर्फे त्यांच्या भेटीचा निषेध करण्यात आला. याच निषेधातून राजधानीतील काँग्रेस हाऊस इमारतीसमोर भर रस्त्यावर जावडेकर यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.

त्यावेळी पणजीकर यांच्यासह माजी आमदार आग्नेल फर्नांडिस आणि अन्य काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ‘जावडेकर गो बॅक’, ‘जावडेकर तुमचे गोव्यात स्वागत नाही’, ‘आमची म्हादय आमकां जाय’, ‘म्हादयी वाचवा-गोवा वाचवा’, ‘मेळावली वाचवा-गोवा वाचवा’, ‘कोळशाला नाही म्हणा’, ‘पर्यावरण वाचवा’, ‘आम्हाला उल्लू बनवू नका’, अशा आशयाचे विविध फलक हाती घेत त्यांनी ‘जावडेकर गो बॅक’ घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

जावडेकरांना गोव्यात येण्याचा अधिकार नाही : काँग्रेस

प्रकाश जावडेकर यांना गोव्याच्या या भूमीवर पाय ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही.  त्यांनी आपली ही गोमंतभूमी विकलेली आहे. आमची म्हादई, आमची जीवनदायिनी त्यांनी कर्नाटकाकडे गहाण टाकलेली आहे. आमच्या आईचा त्यांनी सौदा केलेला आहे. जावडेकर हे सौदेबाज आहेत, त्यामुळे गोव्यात येण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, अशी कठोर टीका काँग्रेसने केली आहे. जावडेकर यांनी गोव्यात येण्यापूर्वी आधी गोमंतकीयांची माफी मागितली पाहिजे. म्हादईसाठी आतापर्यंत लढलेल्या लढय़ात गोव्याने करोडो रुपये खर्च केले. परंतु विद्यमान भाजपा सरकारने गोवा विकून टाकलेला आहे. आमच्या मातेलाच विकून टाकलेले आहे. त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही त्यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. हे आंदोलन यापुढेही असेच चालू राहणार असून जोपर्यंत जावडेकर गोमंतकीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पुतळ्यांचे जागोजागी दहन करून आमचा निषेध चालूच ठेवणार आहोत.

जावडेकरांची गोव्याविरोधात षडयंत्रे : पणजीकर

जावडेकर गोव्यात येतात, गोमंतकीयांच्या पैशांतच हॉटेलवर वास्तव्य करतात आणि गोव्याविरोधात षडयंत्रे रचून गोव्यालाच नेऊन कर्नाटकाला विकतात, अशा जावडेकर यांनी गोव्यात येऊच नये. गोव्यात आतापासूनच अनेक भागात लोकांना धड पिण्याचे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत म्हादईचे पाणी आटले तर गोमंतकीयांवर तहानेने व्याकूळ होण्याची वेळ येणार आहे. येथील शेतकऱयांच्या हालांना तर पारावारच राहणार नाही. येथील पर्यावरणावरही गंभीर परिणाम होणार आहे. या सर्व गोष्टींची सर्वसामान्य जनतेलाही पूर्ण जाणीव आहे. परंतु सत्ताधारी भाजपला याचे काहीच सोयरसूतक नाही, असे खेदाने म्हणावे लागते. गोव्यात केवळ दोनच खासदार. याऊलट कर्नाटकात त्याच्या कित्येक पटीनी जास्त खासदार आहेत. त्यामुळे त्यांचे लांगूलचालन करण्यासाठीच भाजपचा हा खटाटोप असून त्यांच्या दृष्टीने गोव्याला काडीचीही किंमत नाही हेच यातून स्पष्ट होते. केवळ सत्तेसाठी आमच्या लहानशा परंतु निसर्गसंपन्न अशा गोमंतभूमीवर अन्याय अत्याचार करण्यासाठी भाजप पुढे सरसावले आहे, असा आरोप पणजीकर यांनी केला. त्यामुळे जावडेकर यांना गोव्यात राहण्याबरोबरच गोमंतकीयांना मार्गदर्शन करण्याचाही काहीच अधिकार नाही, असे ते म्हणाले.

गोव्यासाठी काँग्रेस 24 तास दक्ष

दरम्यान, जावडेकर हे वास्तव्यास असलेल्या हॉटेलवर एवढय़ा रात्री जाऊन आंदोलन करण्याची खरोखरच आवश्यकता होती का? असे पत्रकारांनी विचारले असता, ‘जावडेकर यांना अशाप्रकारे गुपचूप गोव्यात येण्याची आवश्यकता होती का’?, असे पणजीकर म्हणाले. गोव्याच्या हितासाठी, रक्षणासाठी रात्र किंवा दिवस याची गणिते मांडत बसू शकत नाही. आम्ही 24 तास दक्ष राहणार आहोत. काँग्रेस पार्टी झोपली तर भाजपवाले गोमंतकीयांना झोपवतील, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. त्यामुळे आम्ही रात्रीच त्यांना भेटण्यासाठी गेलो. रात्रीचे जाण्यात काय वाईट आहे. ते या देशाचे मंत्री आहेत. त्यांनी 24 तास उपलब्ध असले पाहिजेत. आम्ही काही भांडण करण्यासाठी गेलो नव्हतो. चर्चा करण्यासाठीच गेलो होतो. परंतु त्यांनी भेट नाकारली, उलट आम्हालाच अटक केली, असेही पणजीकर यांनी अन्य एका प्रश्नावर पुढे सांगितले.

आधी आयटीआय सारख्या चालवा नंतरच आयआयटी बनवा

गोव्यात ‘आयटी’ प्रकल्पास यांनीच विरोध केला, यांना ‘आयटीआय’ धड चालविता येत नाही, आणि आता ‘आयआयटी’ आणण्याच्या गोष्टी करतात. बरे आयआयटीसाठी गोव्यात अन्य कित्येक ठिकाणी जमिनी आहेत. तरीही मेळावलीतील जमीनीसाठीच हट्ट का? तेथील वनसंपत्तीचा, निसर्गसौंदर्याचा विनाश करण्यासाठी का? असे सवाल पणजीकर यांनी केला.

Related Stories

मडगाव नगराध्यक्षपदासाठी दामोदर शिरोडकरांकडून अर्ज

Omkar B

आमदाराने मंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

Amit Kulkarni

नटवर्य पणशीकरांमुळे पेडणेचे नाव अजरामर

Amit Kulkarni

चोरीप्रकरणातून चौघेही दोषमुक्त

Patil_p

शिवोलीत रस्ता रुंदीकरण कामाला प्रारंभ

Amit Kulkarni

पुढील निवडणुकीसाठी अत्याधुनिक ईव्हीएम

Amit Kulkarni