Tarun Bharat

‘जिओ प्लॉटफॉर्मस’ नंतर आता ‘रिलायन्स रिटेल’!

मुकेश अंबानी यांची ‘सौदी अराम्को’बरोबरची भागीदारी हवी तशी वाटचाल करू शकलेली नसली, तरी त्यांनी ती कसर भरून काढताना ’जिओ प्लॅटफॉर्म्स’कडे मोठय़ा प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केलंय…त्यानंतर आता त्यांचा मोर्चा ’रिलायन्स रिटेल’कडे वळलेला असून तिथंही ते हीच युक्ती वापरू पाहताहेत…

आता जग जिंकण्यासाठी पुढं पाऊल टाकलंय ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या (आरआयएल) ‘रिलायन्स रिटेल’नं…येऊ घातलेल्या महिन्यात दर्शन घडेल ते कंपनीला जागतिक भागीदार व गुंतवणूकदार यांनी दिलेल्या आर्थिक धडकेचं…‘आरआयएल’चे अध्यक्ष नि सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी म्हटलंय की, आस्थापनाला ‘स्ट्रटेजिक’ अन् वित्तीय गुंतवणूकदार यांच्याकडून भक्कम प्रतिसाद मिळालाय…त्याखेरीज ‘जिओमार्ट’ ‘इलेक्ट्रॉनिक्स’, ‘फॅशन’, ‘फार्मास्युटिकल्स’ आणि ‘हेल्थकेअर’ वगैरे ‘सेक्टर्स’वर आक्रमण करण्यास देखील सज्ज झालाय…मे महिन्यात लॉकडाऊन चालू असताना अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी ‘रिलायन्स रिटेल’नं जन्म दिला होता तो ‘ओम्नी चॅनल’ला (लहान प्रमाणात)…भविष्यात कंपनी शेतकऱयांवर लक्ष केंद्रीत करणार असून योजनेनुसार ग्राहकांना ताजा माल मिळणार तो घरात बसून. सध्या ‘रिलायन्स रिटेल’ला सुमारे 80 टक्के फळे व भाजी मिळतेय ती थेट शेतकऱयांकडून. मुकेश अंबानींनुसार, ‘जिओमार्ट’च्या भूमिकेत येऊ घातलेल्या दिवसांत खात्रीनं वृद्धी होणार…कंपनीचं ‘व्हॉट्सऍप’सह सध्या ‘हायब्रिड मॉडेल’वर नेटानं काम चाललंय. त्यामुळं ग्राहकांना शेजारी असलेल्या दुकानांतून माल खरेदी करणं शक्य होईल. या योजनेला, दुकानांना भक्कम आधार मिळणार तो ‘रिलायन्स रिटेल आऊटलेट्स’चा…

विशेष म्हणजे नवीन ‘मॉडेल’च्या जन्मानंतर ‘ऑर्डर्स’च्या संख्येनं पार केलाय तो अडीच लाखांचा टप्पा आणि हा आकडा वाढत चाललाय…‘जिओमार्ट’नं सध्या लक्ष केंद्रीत केलंय ते देशातील जास्तीत जास्त भागांपर्यंत पोहोचण्याचं अन् ‘डिलिव्हरी’ क्षमता वाढविण्याचं…‘येऊ घातलेल्या वर्षांत आम्हाला अधिक शहरांत प्रवेश करून भारतीय ग्राहकांचं समाधान करायचंय. शिवाय इच्छा आहे ती अन्य कित्येक गटांना धडक देण्याची’, मुकेश अंबानी आत्मविश्वासानं सांगतात…महसुलाचा विचार केल्यास भारतात ‘रिलायन्स रिटेल’ला तोंड देणं इतरांना शक्य नाहीये. गेल्या वर्षी कंपनीनं खिशात टाकला तो 1 लाख 62 हजार 936 कोटी रुपयांचा महसूल…गेल्या पाच वर्षांत ‘रिलायन्स रिटेल’चा महसूल आठ पटींनी वाढलाय, तर नफा तब्बल 11 पटींनाr…आस्थापनाचे देशभरात 12 हजार ‘स्टोअर्स’ असून त्यापैकी दोन तृतियांश दुसऱया, तिसऱया नि चौथ्या क्रमांकाच्या शहरात (यंदा मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात त्यात त्यांनी भर घातली ती दीड हजार ‘स्टोअर्स’ची)…

‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या वार्षिक अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2019-20 मध्ये त्यांच्या या 1.4 लाख कर्मचारी असलेल्या ‘रिटेल’ विभागाकडून विक्री झाली ती 2 कोटी इलेक्ट्रॉनिक युनिट्सची, 16 कोटी तयार कपडय़ांची, तर 2.6 अब्ज किराणामालाच्या नगांची. त्यांना जवळपास 64 कोटी ग्राहकांनी भेट दिली आणि ही संख्या 2018-19 शी तुलना केल्यास 40 टक्क्यांनी अधिक. ‘रिलायन्स रिटेल’कडील नोंदणीकृत ग्राहकांचा आकडा साधारणपणे साडेबारा कोटाr. त्यांच्या व्यवसायात 61 टक्के वाटा उचलतो तो ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स’ विभाग…एका अंदाजानुसार, भारतातील ‘रिटेल’ बाजारपेठ 2019 मधील 0.7 ट्रिलियन डॉलर्सवरून 2025 पर्यंत 1.1 ते 1.3 ट्रिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचेल. अंबानी या क्षेत्रात नेटानं धडका का मारताहेत ते यावरून सहज कळावं…

‘ऑईल-टू-केमिकल्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’मधील हिस्सा ‘सौदी अराम्को’ला विकण्याच्या मुकेश अंबानींच्या निर्णयाला मात्र अपेक्षेनुसार पुढं जाणं जमलेलं नाहीये…सध्या विश्वातील ‘उर्जा क्षेत्र’ हेलकावे खात असल्यानं सारं गणित चुकलंय…‘आरआयएल’ला ‘सौदी अराम्को’बरोबरचा व्यवहार लवकर पूर्ण करण्याची घाई किमान सध्या तरी नाही, कारण कंपनी कर्जमुक्त झालीय. ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’नं गुंतवणूकदारांची रक्कम तिजोरीत ओतण्याचं काम अगदी भरभरून केलंय…अंबानी यांनी सौदी अरेबियातील आस्थापनाबरोबरचा व्यवहार केव्हा पूर्ण होणार हे सांगितलेलं नसलं, तरी त्यांनी सूचित केल्यानुसार, कित्येक जागतिक कंपन्या ‘पेट्रोकेमिकल’ उद्योगातील ‘स्ट्रटेजिक’ भागीदारीसाठी उत्सुक आहेत. मुकेशनी एखाद्या आस्थापनाचं नाव मात्र जाहीर केलेलं नाहीये…

गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं होतं की, ‘सौदी अराम्को’ तब्बल 75 अब्ज डॉलर्सच्या साहाय्यानं ‘ऑईल-टू-केमिकल्स’ उद्योगातील 20 टक्के हिस्सा ‘रिलायन्स’वरील कर्जासह मार्च, 2020 पर्यंत खरेदी करणार. पण उर्जा बाजारपेठेतील गोंधळ व ‘कोव्हिड-19’ यांच्यामुळं कराराला अगोदर ठरल्यानुसार प्रगती करणं शक्य झालेलं नाहीये…गेल्या 20 वर्षांपासून ‘रिलायन्स’ नि ‘सौदी अराम्को’ यांच्यात अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळं कंपनीला त्यांच्याबरोबरची भागीदारी महत्त्वाची वाटतेय. ‘आरआयएल’नं गेल्या कित्येक वर्षांपासून ‘सौदी अराम्को’कडून ‘क्रूड ऑईल’ आयात केलीय आणि ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’मधील 2.32 टक्के हिस्सा 11 हजार 367 कोटी रुपयांना वा 1.5 अब्ज डॉलर्सना विकलाय तो सौदी अरेबियाच्या ‘पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड’ला (पीआयएफ). ‘सौदी अराम्को’चे अध्यक्ष यासिर अल्-रूमायान हेच ‘पीआयएफ’चे व्यवस्थापन पाहतात…‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ला येऊ घातलेल्या दिवसांत ‘ऑईल-टू-केमिकल्स’ उद्योगांची वेगळी कंपनी बनवायचीय. कंपनीनं स्वप्न पाहिलंय ते 2021 च्या सुरुवातीलाच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचं…

मुकेश अंबानींनी असंही म्हटलंय की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चा सध्या दर्जेदार भारतीय ‘स्टार्टअप्स’चा शोध घेण्याचा प्रयत्न चाललाय, कारण ‘आरआयएल’ला त्यांच्याशी भागीदारी करायचीय…कंपनीनं त्यांना वित्तीय साहाय्य, उत्पादनाचा विकास आणि बाजारपेठेत मुसंडी वगैरे क्षेत्रांत साहाय्य करण्याचं ठरविलंय…मुकेश यांनी ‘जिओ’चं वर्णनसुद्धा ‘स्टार्टअप’ असं करून ‘एजीएम’मधील भाषणात ‘स्टार्टअप’ शब्दाचा वापर केला ते तब्बल 39 वेळा…‘आमच्या ह्रदयात ‘स्टार्टअप्स’साठी खास, विशेष जागा असून आम्हाला त्यांचं वर्णन ‘ब्रदर्स-इन-आर्म्स’ असं करायचंय. मला वाटतंय की, भारतीय ‘स्टार्टअप्स’ना ‘जिओ’पेक्षा चांगला भागीदार मिळणं अशक्य. आम्ही त्यांना आमच्या ‘रोड मॅप’मध्ये जागा देण्यास, त्यांनी पूर्ण क्षमता गाठावी म्हणून आधार करण्यास तयार आहोत’, मुकेश अंबानी सांगतात…कंपनीनं यापूर्वीच 20 ‘स्टार्टअप्स’शी भागीदारी केलीय अन् ‘रिलायन्स’ला त्यांच्यासह ‘मेड-इन-इंडिया’, ‘मेड-फॉर-इंडिया’ नि ‘मेड-फॉर-दि-वर्ल्ड’ उत्पादनांना प्रोत्साहनांना द्यायचंय…‘आरआयएल’नं 2017 पासून ‘रिलायन्स रिटेल’ व ‘रिलायन्स जिओ’साठी 3 अब्ज डॉलर्सच्या ‘स्टार्टअप्स’चं अधिग्रहण केलंय…

विश्लेषकांनीही ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ची लहान व मध्यम आकाराच्या ‘स्टार्टअप्स’ना साहाय्य मिळण्याची शक्यता व्यक्त केलीय…विशेष म्हणजे मुकेश अंबानींना तोंड द्यावं लागेल ते काही बडय़ा भारतीय ‘स्टार्टअप्स’च्या स्पर्धेला. त्यात समावेश मोबाईल पेमेंट्स ‘पेटीएम’, शैक्षणिक क्षेत्रातील ‘बायजू’ नि ‘बिझनेस-टू-बिझनेस सेक्टर’मधील ‘उडान’ यांचा…संपूर्ण ‘स्टार्टअप इकोसिस्टम’नं 2019 साली तिजोरीत ओतलेत एकूण 14.5 अब्ज डॉलस&, तर ‘रिलायन्स जिओ’नं गेल्या काही महिन्यांत तब्बल 20 अब्ज डॉलर्सचा निधी गोळा केलाय. खेरीज सरकारनं चिनी गुंतवणुकीला अडविण्याचा जोरदार प्रयत्न केल्यामुळं व ‘जिओ’नं ‘गुगल-फेसबुक’ या विश्वातील दोन दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांशी करार केल्यानं अन्य आस्थापनांना ‘रिलायन्स’ला तोंड देणं सोपं ठरणार नाहीये !

– राजू प्रभू

Related Stories

एचडीएफसी बँकेचे ग्रामीण बँकिंगसाठी वेगळे कार्यक्षेत्र

Patil_p

एलआयसी सेवा – कोणत्याही शाखेत क्लेम जमा करता येणार

Patil_p

अखेर सेन्सेक्सची 646 अंकांची उसळी

Patil_p

ऑटो क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणण्याची तयारी

Patil_p

साखर उत्पादन 24 टक्क्यांनी वाढले

Amit Kulkarni

77,146 कोटींची दूरसंचार स्पेक्ट्रमसाठी बोली

Patil_p