Tarun Bharat

जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विक्रांत जाधव

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडीत अखेर आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांचीच वर्णी लागली. शिवसेनेची सत्ता असताना अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सदस्य विक्रांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या पदाच्या शर्यतीत असलेले, गेली 25 वर्षे जिल्हा परिषद सदस्य असलेले सेनेचे उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.

  जिल्हा परिषदेवर सत्ताधारी शिवसेनेच्या वर्तूळातून अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे राजकीय नजरा खिळल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादीनेही मागणी लावून धरल्याने चुरस वाढली होती. यात रत्नागिरीचे ज्येष्ठ सदस्य उदय बने व चिपळूणचे तरूण नेतृत्व  विक्रांत जाधव यांची नावे आघाडीवर होती. उदय बने की, विक्रांत जाधव याबाबत उत्सुकता असताना पूर्वसंध्येला विक्रातं जाधव यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा रंगली होती. सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 या निवडीसाठी सोमवारी सकाळी टिआरपीतील जिल्हा परिषद पदाधिकारी निवासस्थानी शिवसेना व राष्ट्रवादी अशा महाविकास आघाडीतील नेते व सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, सेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके आदींची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदांवर बराचवेळ विचारविनिमय झाला. त्यानंतर अंजनवेल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीतून निवडून आलेले, मात्र राजकीय घडामोडींनंतर सेनेशी संलग्न असलेले सदस्य विक्रांत जाधव यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली.

 अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले सेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले. बने यांना उपाध्यक्षपदाचा मान दुसऱयांदा मिळाला आहे. यावेळी त्यांना अध्यक्षपद मिळण्याची अपेक्षा सेनेतील अनेक सदस्य व पदाधिकाऱयांना होती. पण सेनेतील पुढील राजकीय समिकरणाचा वाचर करून बने यांच्या पदरात उपाध्यक्षपद टाकण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याचवेळी उपाध्यक्षपदाकडे पूर्वी असलेला कृषी समितीचा पदभार प्रथमच वेगळा करण्यात आला आहे. कृषी समितीसाठी स्वतंत्र सभापतीपद तयार करण्यात आले आहे. उपाध्यक्षांकडे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीपद सोपवण्यात येणार आहे.

 इतर विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठीही यावेळी नावे निश्चिती झाली. त्यामध्ये शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदी लांजाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मणचेकर, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धविकास समिती सभापतीपदी दापोलीच्या रेश्मा झगडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राजापूरच्या भारती सरवणकर यांची निवड झाली. समाजकल्याण समिती सभापतीपदी रत्नागिरीचे परशुराम कदम यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यासाठी अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक असे उमेदवारी अर्ज होते. छाननी अंती सर्व अर्ज वैध ठरवून निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी दुपारी जाहीर केले.

  महत्वाच्या स्थायी समितीवर सदस्य म्हणून माजी अध्यक्ष रोहन बने, बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, अण्णा कदम यांची वर्णी लावण्यात आली आहे. शिवसेना गटनेतेपदी रचना महाडिक यांची निवड करण्यात आली. या पदाधिकारी निवडीनंतर जिल्हा परिषदेत अध्यक्ष विक्रांत जाधव व सर्व समिती  सभापतींना त्यांच्या दालनात विराजमान करण्यात आले. त्यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, माजी अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, जगदीश राजापकर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, यांच्यासह सदस्य, खातेप्रमुख यांची उपस्थिती होती.

Related Stories

पर्ससीनधारकांची भूमिका योग्य वाटल्यास मार्ग नक्की काढू!

NIKHIL_N

जॉबच्या शोधात गेला अन् लॉकडाऊनमध्ये अडकला…

Patil_p

रत्नागिरी : दापोलीच्या वनपालाचे अखेर निलंबन

Archana Banage

संगमेश्वर तालुक्यात मृत कावळे सापडल्याने खळबळ

Archana Banage

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर…पहा काय आहे निकाल ?

Anuja Kudatarkar

पोलीस खात्याच्या बदनामीप्रकरणी गुन्हा

NIKHIL_N
error: Content is protected !!