प्रतिनिधी / कोल्हापूर
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिकांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. या सर्व निवडणुकांचा नारळ आता फुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.
राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा (ग्रामीण व शहर) संघटना बांधणीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे जिह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठÎा संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, आजतागायत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कधीही मित्रपक्षासोबत आघाडी केलेली नाही. निवडणुकीनंतर एकत्र आलो आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक देखील स्वबळावरच लढवली जाईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकीमध्ये जास्तीतजास्त जागा स्वबळावरच लढवल्या जातील.
व्ही.बी.पाटील महानगरपालिका निवडणुकीचे कारभारी
मंत्री मुश्रीफ यांच्या भाषणापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उद्योगपती व्ही.बी.पाटील यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्राध्यापकाला कारभारी न करता प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्याची विनंती केली होती. याचा आधार घेत यापुढे प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाणार असून व्ही.बी.पाटील हेच महानगरपालिका निवडणुकीचे कारभारी असतील असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी' की ये दिवार टुटनेवाली नही' 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे संख्याबळ पाहता त्यांचीच पुन्हा सत्ता येईल असे वाटत होते. त्यांची सत्ता आली असती तर कोणाकोणाच्या मागे ईडी लावली असती हे काही समजले नसते. पण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना एकत्र करून महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. पण भाजपचे नेते देवेद्र फडणवीस आणि चंदक्रांत पाटील यांना पलंगावरून जरी खाली पडले तरी महाविकास आघाडीचे सरकार पडल्याचा भास होत आहे.
लेकीन महाविकास आघाडी की ये दिवार शरद पवार साहब ने बनायी है, किसी को भी टुटनेवाली नही, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे आभार मानतो
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी यामधील प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी स्वबळाचा वापर करणे आवश्यक आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आगामी काळात राष्ट्रवादीचा मोठा विस्तार होणार असून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी सत्तेवर असेल असे एका कार्यक्रमात जाहीर विधान केले होते. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
राणेंना मंत्रीपद देऊन शिवसेनेविरोधात बोलायला लावले
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून आजतागायत भाजपकडून मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर आरोप केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत आजतागायत असे बेताल वक्तव्य कोणीच केले नाही. पण नारायण राणे यांना मंत्रीपद देऊन भाजपनेच त्यांना शिवसेनेविरोधात बोलायला भाग पाडले आहे. यामध्ये नारायण राणेंचा कोणताही दोष नाही, अशी स्पष्टोक्ती मंत्री मुश्रीफ यांनी केली.


previous post