सातारा / प्रतिनिधी :
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणूकींना हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. राज्यातील 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांसाठी नुकतीच सहकार निवडूक प्राधिकरणाची बैठक पार पडली. यावेळी निवडणूकीस पात्र जिल्हा बँकांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू करण्याची सूचना सहकार विभागाला देण्यात आली. त्यानुसार आता बँकांच्या निवडणूकांसंबंधी तयारीला गती आली असुन, त्याअनुषंगाने आता जिल्हा बँका तयारीला लागल्या आहेत. सध्या मतदार यादींचा कार्यक्रम सुरू असून, येत्या सप्टेंबरमध्ये अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादींचा कार्यक्रम पुर्ण करून येत्या ऑक्टोंबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
मागील दीड वर्षात जिल्हा बँकांच्या संचालकांना 15 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. पण आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सहकार विभागाने निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकतीच सहकार निवडणूक प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्या टप्प्यांवर निवडणूक थांबली होती. तेथून पूढे कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 12 जिल्हा बँका या निवडणुकीसाठी पात्र असून, एका वेळेस सर्व जिल्हा बँकांचे कार्यक्रम घेण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकांच्या यादीची कार्यक्रम सुरू करण्याची सूचना प्राधिकरणाने सहकार विभागाला केली आहे. ज्या बँकांच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत, त्यांची प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया आता सप्टेंबरमध्ये होणार आहे. या यादींचा कार्यक्रम पुर्ण करून येत्या ऑक्टोंबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.