Tarun Bharat

जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 4.47 टक्क्यांवर

अचूक बातमी “तरूण भारत”ची, शनिवार 21 ऑगस्ट 2021, सकाळी 10.10

●फलटणकरांची वाढती संख्या चिंताजनक
●सातारा, कराड तालुक्यात काही अंशी प्रमाण कमी
●कोरेगाव तालुका घेतोय उसळी
●मृत्युदर वाढण्याचे कारण गुलदस्त्यात
●लसीकरणाच्या पोर्टलवर पहिला डोस दाखवेना

सातारा / प्रतिनिधी :

जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना फलटण तालुक्यात मात्र वाढती बाधित संख्या चिंतेची बाब बनू लागली आहे. सतत आघाडीवर असणाऱ्या सातारा आणि कराड या दोन्ही तालुक्यात आता बाधित प्रमाण कमी होताना दिसत आहे. दरम्यान, उपचारासाठी दाखवण्यात येणाऱ्या संख्येमध्ये काहीतरी लपवाछपवी असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरेगाव तालुका उसळी घेऊ लागला आहे. काल दिवसभरात 13920 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात 623 जण बाधित आढळून आले असून पॉझिटिव्हीटी रेट 4.47 टक्क्यांवर आला आहे.

कित्येक दिवसानंतर पॉझिटिव्हीटी रेट 4.47 टक्क्यांवर

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या आतापर्यंत 2 लाख 33 हजार 996 एवढी झालेली आहेत. तर तपासण्या आतापर्यंत 16 लाख 59 हजार 191 जणांच्या झाल्या आहेत. 5 हजार 706 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कालच्या 24 तासात 13 हजार 920 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. नेहमीच्या तुलनेत सुमारे दीड हजार जास्त तपासण्या झाल्या आहेत. जास्त तपासण्या होऊन सुद्धा बाधित संख्या 623 एवढी आढळून आली असून, पॉझिटिव्हीटी रेट 4.47 एवढ्यावर आला आहे. तो गेल्या काही दिवसात कमी झालेला दिसुन येत आहे.

फलटण तालुक्यातील वाढती बाधित संख्या चिंताजनक

फलटण तालुका पहिल्या लाटेपासून अकरा तालुक्यात मधोमध होता. फलटणची जास्त दळणवळण हे बारामती भागात असते. पहिल्या लाटेमध्ये ही काही गावे डेंजर झोनमध्ये होती. अगदी फलटण शहरात जास्त प्रादुर्भाव जाणवत होता. तो दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला एवढा जाणवत नव्हता. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून बाधित संख्या वाढत राहिली आहे. मग त्यातून छोटी गावे ही सुटलेली नाहीत. दि.15 रोजी 163, दि.16 रोजी 84, दि.17 रोजी 150, दि.18 रोजी 122, दि.19 रोजी 168, दि.20 रोजी 185 असा बाधित आकडा वाढत आहे. त्याप्रमाणेच कोरेगाव तालुका उसळी घेत आहे. सातारा आणि कराड हे दोन्ही तालुक्यात बाधित संख्या कमी होताना दिसत आहे.

मृत्यूदर वाढण्याचे कारण गुलदस्त्यात

सातारा जिल्ह्यातील मृत्युदर हा काही केल्या कमी होत नाही. मृत्यू झालेले नेमके आकडे कसे वाढत आहेत याचे कारण मात्र समजू शकले नाही. आकडे मात्र वाढत वाहेत. त्या मृत्यू झालेल्यामध्ये नेमके कारण कोरोना की सारी हे ही स्पष्ट केले जात असताना झाकली मूठ सव्वा लाखाची या प्रमाणे वाढत्या मृत्यूदराची कारणे गुलदस्त्यात आहेत. तसेच उपचारार्थ दाखवण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये ही तफावत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पहिला डोस मिळेल का?

सातारा जिल्ह्यातील लसीकरणाच रेकॉर्ड झालं अशी जिल्हा प्रशासनाने पाठ थोपटवून घेतली खरी पण जिल्ह्यात दि.19रोजी कोविशिल्ड 88 हजार आणि कोवॅक्सिन 5 हजार 920 एवढी लस आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी सांगितले. मात्र त्या प्रमाणात लसीकरण होत असल्याचा दावा ही करत असले तरी ही पहिल्या डोसच्या नोंदणी करण्यासाठी अनेक लाभार्थी इंटरनेटवर कोव्हिन हे पोर्टल सुरू करून बसलेले असतात. मात्र, पहिला डोस कुठेच फ्रीचा दाखवत नाही. विकतच्या लसीकरण केंद्रावर दाखवण्यात येतो. त्यामुळे लसीकरण टार्गेट साध्य करण्यासाठी आरोग्य विभाग परिश्रम घेत असताना अजून काही त्रुटी आहेत.

जिल्ह्यातील काही दुर्गम गावांत ही अजुन लस पोहचली नाही. ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्यांना तर लस कुठे, कधी घ्यायची याची माहिती नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 35 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 15 लाख 76 हजार 335 जण लस घेतल्याचे आरोग्य विभागाने नोंद केली आहे. त्यात पहिल्या डोस घेतलेले 10 लाख 99 हजार 4 जणांनी तर दुसरा डोस घेतलेले 4 लाख 77 हजार 331जणानी घेतल्याची नोंद आहे. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील 197 लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगितले. मात्र, सर्वसामान्यामधून आता ही लस घरोघरी जाऊन द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

शनिवारपर्यत
एकूण नमूने….1659191
एकूण बाधित…233996
घरी सोडण्यात आलेले….220336
मृत्यू…..5706
उपचारार्थ रुग्ण……10251

Related Stories

मॉर्निंग वॉकच्या वृद्धांना लुबाडणारे दोघे गजाआड

Patil_p

Satara : पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला

Abhijeet Khandekar

सातारा तालुक्यात पाठ्यपुस्तकांचे वितरण

Archana Banage

चार दिवसांनी पॉझिटिव्हीटी 7.06 टक्क्यांवर

datta jadhav

कृष्णा अभिमत विद्यापीठाचा आज दहावा दीक्षांत सोहळा

Patil_p

अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, सह्याद्री कॉलनीला जिल्हा रुग्णालयाचा त्रास

Amit Kulkarni