Tarun Bharat

जिल्हय़ात आणखी दहा पॉझिटिव्ह

पाच दिवसात 49 पॉझिटिव्ह रुग्ण : ‘कोरोना’चा वेग झपाटय़ाने वाढतोय : जिह्यात आणखी सहाजणांना डिस्चार्ज : सक्रिय रुग्णसंख्याही 67 वर

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिह्यात ‘कोरोना’चा वेग मंदावलेला असताना पुन्हा ‘कोरोना’चे रुग्ण झपाटय़ाने वाढू लागले आहेत. जिह्यात रविवारी आणखी दहा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच दिवसात 49 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या 329 वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी आणखी सहा रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने जिह्यात आतापर्यंत 256 रुग्ण ‘कोरोना’ मुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामनियंत्रण समित्यांनी चांगले काम केल्यामुळे ‘कोरोना’ची साथ नियंत्रणात ठेवता आली होती. मात्र, आता पुन्हा ‘कोरोना’बाधित रुग्ण झपाटय़ाने वाढू लागले आहेत. 21 जुलैला जिह्यात 280 रुग्ण होते. 25 जुलैपर्यंत रुग्णांची संख्या 329 वर गेली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसात 49 रुग्णांची वाढ झाली आहे. आता गणेशोत्सवात तर मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येणार असल्याने ‘कोरोना’चा वेग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

                          सावंतवाडीत सहा पॉझिटिव्ह

जिह्यात शनिवारी रात्री उशिरा सातजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये सावंतवाडी शहरातील सहा रुग्ण तर देवगड तालुक्यातील फणसगाव येथील एकाचा समावेश होता. रविवारी दिवसभरात तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात कुडाळ शहर एक, कणकवली तालुक्यातील नांदगावमधील एकाचा समावेश आहे. एका रुग्णाचे गाव समजलेले नाही

                         जिल्हय़ात रुग्णसंख्या 329 वर

जिल्हय़ात नव्याने दहा रुग्ण आढळल्याने ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 329 वर गेली आहे. त्यापैकी 256 रुग्ण बरे झाले. त्यातील सहा रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. एकूण रुग्णांपैकी सहाजणांचा मृत्यू तर एकजण मुंबईत गेला आहे. त्यामुळे आता सद्यस्थितीत 67 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

अ.क्र.               विषय                 संख्या

1       तपासण्यात आलेले एकूण नमुने       5,562

2       अहवाल प्राप्त झालेले नमुने 5,298

3       आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने  329

4       निगेटिव्ह आलेले नमुने      4,970

5       अहवाल प्राप्त न झालेले नमुने          264

6       सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 67

7       मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या         6

8       डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण          256

9       विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण      115

10     रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 3,823

11     संस्थात्मक विलगीकरणातील एकूण व्यक्ती 17,364

12     2 मेपासून आतापर्यंत जिह्यात दाखल व्यक्ती  1,51,753

कणकवली बांधकरवाडी येथे कंटेनमेंट झोन

कणकवली शहर बांधकरवाडी येथील एक घर, एक कुटुंब व तीन लोकसंख्येचा समावेश असणारा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या झोनमध्ये 7 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या- जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनास
प्रवेश बंद असणार आहे. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक आदी सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

तिरोडा- भरडवाडी येथे कंटेनमेंट झोन

सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा-भरडवाडी कार्यक्षेत्राचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या झोनमध्ये 7 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

Related Stories

चिपळूण हायटेक बसस्थानकाचे काम आठ दिवसांत सुरू?

Patil_p

दापोलीत आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

जिल्हा वार्षिक नियोजन मधून मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांच्यासाठी तरतूद करा; रविकिरण तोरसकर

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : शिक्षक आले…पण विद्यार्थी अत्यल्प

Archana Banage

साटेली भेडशीत पहिल्याच पावसात गटार तुंबले

NIKHIL_N

अजूनही एसटी कर्मचारी संपावर ठाम

Patil_p