शनिवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत कडक निर्बंध : जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा आदेश


प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मागील आठवडय़ाप्रमाणेच या आठवडय़ातही म्हणजेच शनिवार दि. 29 मे रोजी सकाळी 6 पासून सोमवार दि. 31 मे पर्यंत सकाळी 6 पर्यंत जिल्हय़ात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मंगळवारी यासंबंधीचे आदेशपत्रक जारी केले आहे. त्यामुळे विकेंडला दोन दिवस केवळ औषधे, दूध, वैद्यकीय सेवा, रेशन दुकाने, कृषी संबंधित सेवा उपलब्ध राहणार आहेत.
राज्य सरकारने कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लॉकडाऊनचा कालावधी 7 जूनपर्यंत वाढविला आहे. याच दरम्यान, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सरकारने दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून मागील आठवडय़ाप्रमाणेच येत्या शनिवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
सरकारमान्य रेशन दुकाने आणि कृषी संबंधित आस्थापने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी ते सकाळी 6 ते 10 या चार तासांच्या कालावधीत सुरू राहतील. तसेच यापूर्वी परवानगी घेतलेल्या विवाह समारंभांना देखील परवानगी असणार आहे. मात्र, त्यासाठी निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. अत्यावश्यक सेवा असणारी हॉस्पिटल्स, औषध दुकाने व दूध विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित सर्व व्यवहार या काळात बंद राहणार आहेत. रुग्णांना इस्पितळात दाखल करणे किंवा इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आणण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करता येणार आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा मालवाहतूक वगळता इतर वाहतुकीवरही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. अनावश्यकपणे घराबाहेर फिरणाऱयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईबाबत आदेश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविला असला तरी सकाळी 6 ते 10 या कालावधीत बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. त्यावेळी कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दीवर नियंत्रण आणणे पोलिसांना कठीण होत आहे. त्यामुळेच आठवडय़ाच्या शेवटी दोन दिवस कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी घेतला आहे.
कडक निर्बंध लागू होणार असल्याने शनिवारी आणि रविवारी विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई करणार आहेत. संबंधितांची वाहनेही जप्त केली जाणार आहेत. केवळ दवाखान्यासाठी तसेच औषध खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींनाच मुभा देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही कामांसाठी मुभा दिली जाणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.
मागील वेळी मिळाला होता अभूतपूर्व प्रतिसाद
मागील आठवडय़ात मंगळवार दि. 18 मे रोजी जिल्हाधिकाऱयांनी दोन दिवसांचा कडक विकेंड लॉकडाऊन जारी केला होता. जिल्हय़ात याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा कडक विकेंड लॉकडाऊनचा आदेश देण्यात आला असून पोलीस प्रशासनांवर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई
आदेशाचे उल्लंघन करण्यांविरुद्ध भा. दं. वि. 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत अनावश्यकपणे रस्त्यावर फिरणाऱयांवर कठोर कारवाई होणार आहे. त्यामुळे आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.