Tarun Bharat

जिल्हय़ात ‘भारत बंद’ चा फज्जा

रत्नागिरीत पोलिसांच्या उपस्थितीत बंद

प्रतिनिधी/ रत्नागिरी

भारत बंद’ ला जिल्हय़ात मंगळवारी अल्प प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत व्यापारी संघटना बंदमध्ये सामील नसल्याने बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या. दुकाने बंद करण्यासाठी काही शिवसैनिकांनी सक्तीचा प्रयत्न केला. मात्र व्यापारीवर्गाने त्याला जुमानले नाही. दरम्यान दुकाने बंद पाडण्यासाठी सरसावलेल्या 11 जणांना रत्नागिरीत ताब्यात घेण्यात आले आहे. जिह्यात एसटी, बँक व शैक्षणिक संस्था व्यस्थित सुरु होत्या. अन्य तालुक्यात सर्व लहान-मोठय़ा बाजारपेठा दिवसभर सुरळीत सुरु होत्या. या बदंमध्ये शेतकरीवर्गाची मात्र पूर्णपणे अनुपस्थिती होती.

  मंगळवारच्या भारत बंद’ बाबत व्यापारी संघटना वा कोणत्याही राजकीय संघटनेने आपली भूमिका प्रशासनाकडे स्पष्ट केली नव्हती. त्या बाबतचे पत्रही दिले नव्हते. त्यामुळे हा बंद होणार नसल्याचे आदल्या दिवशीच स्पष्ट झाले होते. तरीही नागरिकांमध्ये संभ्रम कायम होता. मात्र मंगळवारी बंदचा रत्नागिरीत कोणताही परिणाम दिसला नाही. सर्व जनजीवन नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होते. रत्नागिरीत काही शिवसैनिकांनी सकाळी रस्त्यावर उतरत दुकानदारांना दुकाने बंद करण्यासाठी सक्तीची भूमिका घेतली. काही दुकाने बंदही करायला लावली, मात्र त्यांची पाठ वळताच दुकाने सुरु झाली. त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरीत 11 शिवसैनिक ताब्यात

शिवसैनिकांच्या सक्तीच्या भूमिकेची चाहूल पोलिसांना लागली. शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड व त्यांच्या सहकाऱयांनी आपला फौजफाटा शिवसैनिकांच्या मोर्चाकडे वळवला. पोलीस आल्याचे कळताच काहींनी काढता पाय घेतला. मात्र काही शिवसैनिकांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारीवर्गांनेही समाधान व्यक्त केले. शिवसैनिकांच्या दबावासमोर न डगमगता काही मिनिटातच रत्नागिरी बाजारपेठ पूर्वपदावर आली होती. पोलिसांनी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह 11 शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 नुसार पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी टाळले.

धाकदपटशा सुरू असताना पोलीस ‘मूक’

रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील दुकाने बंद करण्यासाठी बंद समर्थक चक्क पोलीस बंदोबस्तात दाखल झाले होते. ताबडतोब दुकाने बंद करा, असे सांगत सुमारे 50 लोकांचा जमाव पुढे सरकत होता. यावेळी येथील एका व्यापाऱयाने दुकाने बंद करण्यास नकार दिला. हा सर्व विरोधाचा प्रसंग पोलिसांच्या देखत सुरू होता. धाकदपटशा दाखवणाऱयांना रोखा, अशी विनंती उपस्थित चौघा पोलीस कर्मचाऱयांना करण्यात आले. ही वाक्ये आपल्याला ऐकूच आली नाहीत. असे पोलिसांनी दर्शवले. त्यातील एका पोलीस कर्मचाऱयाने व्हिडिओ शुटींग करण्याचे काम सुरू ठेवले होते. उपस्थित पोलीस कर्मचाऱयांनी ‘मूक’ पवित्रा घेतल्याने तो व्यापारीही अचंबित झाला. सरतेशेवटी त्या व्यापाऱयाने आपल्या दुकानाचे शटर खाली ओढले. बंद समर्थकांची पाठ फिरताच त्या दुकानदाराने आपल्या दुकानाचे शटर उघडले अन् आपला व्यापार सुरू केला. यानंतर त्या पोलिसांच्या ‘मुक’ भूमिकेबाबत तेथील व्यापाऱयात जोरदार चर्चा सुरू होती. 

जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बंदमध्ये सहभागी

मंगळवारच्या देशव्यापी बंदमध्ये देशभरातील सर्व बाजार समित्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीही बंदमध्ये सहभागी झाली होती. बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, सचिव, अधिकारी व कर्मचारी तसेच बाजार आवारातील अडते, व्यापारी, शेतकरी, खरेदीदार, हमाल इत्यादी बाजार घटकांनी बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवून शांततेच्या मार्गाने, कायदा व सुव्यस्था यांचा भंग होणार नाही, याची दक्षता घेतली होती. रत्नागिरी बाजार समितीचे शांतीनगर-नाचणेतील मुख्य बाजार आवारावरील भाजीपाला लिलाव व कार्यालयीन कामकाज पूर्णपणे बंद राहिले होते.

व्यापारी भिंगार्डेंनी तर दुकाने बंद करणाऱयांना ठणकावले

रत्नागिरी शहरातील व्यापारी आपली दुकाने सुरू ठेवणार. हा संप शेतकऱयांचा असता तर आम्ही 100 टक्के पाठिंबा दिला असता, पण हा संप दलालांचा आहे. त्यामुळे आमचा याला पाठिंबा नाही, असे शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी गणेश भिंगार्डे यांनी सांगितले. आम्ही दुकाने सुरु ठेवणार, जबरदस्तीने कोणी दुकाने बंद करायला लावत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा  गणेश भिंगार्डे यांनी दिलेला इशारा सोशल मिडियावरून व्हायरल झाला होता.

सोशल मिडियावर रंगली चर्चा

गणेश भिंगार्डे यांनी व्यक्त केलेल्या त्या परखड भूमिकेबाबत समाधान व्यक्त करत अशा प्रकारे कुणीतरी ठणकावण्याची गरज असल्याची चर्चा व्यापारीवर्गात सुरू होती. व्यापारी संघटनेने कोणालाच दुकान बंद ठेवण्याचे आवाहन केलेले नाही. नाशवंत मालाचे नुकसान झाले तर याला कोण जबाबदार आहे. जे लोक जबरदस्तीने दुकाने बंद करतात, या नुकसान भरून देणार का, कामगारांच्या जाण्यायेण्याचा खर्च, वेतन देणार का, ग्रामीण भागातले लोक शहरात खरेदीसाठी  येतात, अचानक दुकाने बंद ठेवली तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही का, असे प्रश्न व्यापारीवर्गाकडून विचारण्यात येत होते. व्यापारीवर्गाचा दुकाने बंद ठेवायला प्रचंड विरोध असून दुकाने बंद ठेवायची की नाही, हा आमचा विषय आहे. कुठल्याही पक्षाने यात हस्तक्षेप करू नये, असे काही व्यापाऱयांनी तयार केलेले मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होताच त्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती.

Related Stories

निवती किनाऱयावर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

NIKHIL_N

‘जेल पर्यटन’ प्रकल्पात रत्नागिरी विशेष कारागृह!

Patil_p

‘तरुण भारत’ सिंधुदुर्ग वर्धापनदिन उद्या

NIKHIL_N

मुंबईतील शिवशंभू ग्रुपतर्फे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Anuja Kudatarkar

माल वाहतूक करणारा ट्रक मळगाव रेडकरवाडीत झाला पलटी

Anuja Kudatarkar

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू, 17 नवे रुग्ण

Archana Banage