Tarun Bharat

जिल्हय़ात होणार शासकीय कोव्हीड लॅब

Advertisements

सिंधुदुर्गनगरीत 25 दिवसात कार्यान्वित : मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी : 2 जूनपासून रॅपिड टेस्ट

कोरोना रॅपिड टेस्टच्या राज्यातील नऊ जिल्हय़ांत सिंधुदुर्गचा समावेश!

वार्ताहर / कणकवली:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोव्हीड 19 च्या स्वॅब तपासणीच्या लॅबला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. येत्या 25 दिवसांत ही लॅब कार्यान्वित होऊन जिल्हय़ातील शासकीय लॅबमध्ये कोरोना रुग्णाच्या स्वॅबची तपासणी करता येईल. 25 मे रोजी जिल्हाधिकाऱयांमार्फत शासनाकडे या लॅबसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयाजवळ माकडतापासाठी बांधण्यात आलेल्या प्रयोगशाळेच्या इमारतीत ही लॅब होणार आहे. कोरोनाच्या रॅपीड टेस्टसाठी राज्यात नऊ जिल्हय़ांत परवानगी देण्यात आली आहे. त्यात सिंधुदुर्गाचा समावेश आहे. सिंधुदुर्गात रॅपिड टेस्टची सुरुवातही 2 जूनपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

येथील ‘विजयभवन’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, मंगेश लोके आदी उपस्थित होते.

नियोजनचा निधी देण्याचा प्रस्ताव

नाईक पुढे म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर व कोकणातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत नुकत्याच झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सवेळी सिंधुदुर्गात कोरोना तपासणी लॅबची मागणी केली होती. माकडतापासाठी बांधण्यात आलेल्या प्रयोगशाळेच्या इमारतीत ही लॅब होणार आहे. या लॅबसाठी नियोजनचा निधी देण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. मात्र खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याची मागणी केली आहे.

जिल्हय़ातील रुग्णांना दिलासा मिळेल

कोरोनाच्या प्राथमिक चाचणी (रॅपिड टेस्ट) च्या प्रशिक्षणासाठी जिल्हय़ाच्या प्रयोगशाळेतील दोन तज्ञ पुण्यातील प्रयोगशाळेत गेले आहेत. जिल्हय़ात रॅपिड टेस्ट व कोरोना चाचणी सुरू होणार असल्याने येथील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल. रॅपिड टेस्टमध्ये ज्या व्यक्ती पॉझिटिव्ह येतील, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविता येणार आहेत. कोव्हीड लॅबसाठी रेण्वीय प्रयोगशाळेत जी स्वॅब तपासणी मशीन आहे, त्याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच या व्यतिरिक्त ज्या अजून मशीन लागणार आहेत, त्या नव्याने खरेदी करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

माकडतापाऐवजी कोव्हीड लॅबसाठी मशीन खरेदी

माकडतापासाठी ज्या मशीन नव्याने मागविण्यात आल्या होत्या, त्या थांबवून कोव्हीड लॅबसाठीच्या मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. यात मुंबई महापालिका व एम्स नागपूर यांनी ज्या पद्धतीने कोव्हीड लॅबसाठी मशीन खरेदी केल्या, त्या पद्धतीने जिल्हाधिकाऱयांमार्फत या मशिनरी खरेदी करण्यात येणार आहेत. कोव्हीड लॅबसाठी शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता याबाबत आवश्यक असणाऱया परवानग्यांबाबत आयसीएमआरकडे प्रस्ताव करण्यात येणार आहे. राजन तेली यांनी कोव्हीड तपासणी मशीन आहे म्हणून माहिती दिली. पण आम्ही कोव्हीड लॅब मंजूर केल्याची माहिती दिली, असा टोला नाईक यांनी लगावला.

अर्सेनिक अल्बमच्या सहा लाख गोळय़ा वाटणार

अर्सेनिक अल्बमच्या सहा लाख गोळ्य़ा वाटप करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या गोळ्य़ा नियोजनच्या निधीतून देण्यात येणार असल्याने त्याच्या खरेदीसाठी जी पद्धत आहे, त्याची पूर्तता झाली की या गोळ्य़ा जनतेला वाटण्यात येणार आहेत. त्यामुळे आता विरोधकांनी राजकारण थांबवावे. बोगस पासद्वारे जिल्हय़ात येणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र चाकरमान्यांनी जिल्हय़ात येण्यासाठी घाई करू नये. सर्व चाकरमान्यांना जिल्हय़ात घेणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

पत्र देणे म्हणजे प्रस्ताव नाही!

एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये कोव्हीड लॅब करण्याबाबत राणेंकडून परिपूर्ण प्रस्तावच देण्यात आलेला नाही. केवळ पत्र देणे म्हणजे प्रस्ताव करणे होत नाही. त्यामुळे प्रस्ताव नसल्यानेच आम्ही शासकीय लॅबला मंजुरी मिळवून घेतली. काहीजण घोषणा करतात व मुंबईला जातात, असे नाईक यांनी सांगितले.

Related Stories

वीस मजूर तुळजापूरला रवाना

NIKHIL_N

पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग दौऱयावर

NIKHIL_N

कणकवली मतदारसंघातील सरपंचांना विमा पाॅलिसी

Ganeshprasad Gogate

एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पद रिक्त

NIKHIL_N

भरवस्तीतील कॅमेऱ्यात दोन बिबटे कैद

Ganeshprasad Gogate

पोलिसाच्या घरातून 35 तोळे दागिन्यांची चोरी

NIKHIL_N
error: Content is protected !!