Tarun Bharat

जिह्याचा लसीकरणात विक्रम

शनिवारी एकाच दिवसांत 42 हजार नागरिकांनी घेतला लाभ

प्रतिनिधी/ सातारा

जिह्यात लसीकरण मोहिम वेगाने आणि पूर्ण क्षमतेने चालू आहे. लस उपलब्ध होईल ती समन्याय पद्धतीने वाटप केली जात आहे. प्रभावीपणे लसीकरण होत आहे. शनिवार दि. 3 रोजी एका दिवसांत 262 लसीकरण सत्रामधून तब्बल 42,318 इतक्या विक्रमी संख्येने नागरिकांनी लसीकरण केले, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.

जिल्हय़ातील आरोग्य कर्मचारी 92, आघाडीचे कर्मचारी 264, 18 ते 44 वयोगटातील 20 हजार 697, 45 ते 60 वयोगटातील 12261, साठ वर्षाच्या पुढील 9004 नागरिक अशा एकूण 42 हजार 318 इतक्या विक्रमी संख्येने नागरिकांनी लसीकरणचा लाभ घेतला. जशा लसी उपलब्ध होत आहेत त्या पद्धतीने सर्वांना न्याय मिळेल अशा रीतीने लस वाटप केले जात असून आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी काटेकोर नियोजन करीत आहेत.

लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यावर देखील विविध पातळ्यांवर भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी लसीकरणाला योग्य प्रतिसाद मिळत असून ज्या ठिकाणी कमी प्रतिसाद आहे तेथे घरोघरी प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वच स्तरातील कर्मचारी, अधिकारी यासाठी कष्ट घेत आहेत. नागरिकांनी असाच प्रतिसाद लसीकरणाला द्यावा. तसेच; सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा सातत्याने अवलंब करावा असे आवाहन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

दरम्यान, शनिवारच्या मानाने रविवारी खूपच कमी लस उपलब्ध झाल्यामुळे जिल्हय़ात केवळ 5832 जणांना लसीकरणाचा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारअखेर जिल्हय़ातील 7 लाख 55 हजार 302 नागरिकांनी पहिला तर 1 लाख 88 हजार 729 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकुण 9 लाख 44 हजार 31 जणांचे आजपर्यंत लसीकरण झाले आहे, अशी माहितीही विनय गौडा यांनी दिली.

Related Stories

ऊसतोड कामगार महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

Patil_p

पुण्यात 10 ते 14 जानेवारीदरम्यान रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

datta jadhav

सातारा : 122 कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली

Archana Banage

राज ठाकरेंवर उद्या शस्त्रक्रिया

datta jadhav

कोरोना चाचणी निगेटिव्ह; पालकमंत्री अधिवेशनासाठी रवाना

Patil_p

शासकीय कर्ज योजनांच्या ग्राहकांना त्रास देऊ नका

Patil_p