Tarun Bharat

जि.पं. निवडणूक 12 रोजी घेण्यावर एक‘मत’

सकाळी 8 वाजल्यापासून मतदान

प्रतिनिधी/ पणजी

कोरोना महामारीमुळे शेवटच्या क्षणी स्थगित ठेवावी लागलेली जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यास अखेर मुहूर्त सापडला असून येत्या दि. 12 डिसेंबर रोजी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 14 रोजी निकाल जाहीर होऊन सुमारे 200 उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसंबंधी गेल्या कित्येक दिवसांपासून चाललेली चर्चा, तारखांचा घोळ या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळणार आहे. निवडणूक तारीख जाहीर झाल्यामुळे राज्यात आता आचारसंहिता लागू झाली असून दि. 14 रोजी रात्री 12 पर्यंत ती अस्तित्वात राहणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी शनिवारी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी दुर्गाप्रसाद, मेल्वीन वाझ, ब्रिजेश आणि सागर आदी अधिकारी उपस्थित होते.

दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान निवडणूक प्रक्रिया होईल. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे होणार असून निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे 9500 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दि. 14 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. त्यासाठी 15 केंद्रे स्थापन करण्यात येतील. असे गर्ग यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील कासावली मतदारसंघातील उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे तर नावेली येथील उमेदवाराचा मृत्यू झाला होता. नावेलीतील निवडणूक नंतर घेण्यात येणार आहे. सध्या उत्तरेतील 25 आणि दक्षिणेतील 23 मिळून एकूण 48 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. त्याद्वारे उत्तर गोव्यात 104 तर दक्षिणेतील 96 उमेदवार नशिब आजमावत आहेत.

एकूण मतदारसंख्या 791814

उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघातून अनुक्रमे 385222 पुरूष आणि 406592 महिलांसह एकूण 791814 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात उत्तर गोवा मतदारसंघात 204571 पुरूष आणि 214350 महिलांसह 418921 मतदार, तर दक्षिण गोवा मतदारसंघात 180651 पुरूष आणि 192242 महिलांसह 372893 मतदारांचा समावेश आहे.

जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्यात येते. त्यामुळे जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यात सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक 41 असून उत्तर गोवा मतदारसंघातील सर्वच्या सर्व 25सही मतदारसंघात त्यांचे उमेदवार आहेत. त्या खालोखाल काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या आहे. त्यांनी उत्तरेत 21 तर दक्षिणेत 16 उमेदवार दिले आहेत. मगो आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांचे उत्तरेत प्रत्येकी 7 तर दक्षिणेत अनुक्रमे 10 आणि 13 उमेदवार आहेत. राष्ट्रवादीही रिंगणात असून त्यांनी अगदीच कमी म्हणजे उत्तर आणि दक्षिणेत प्रत्येकी 3 उमेदवार दिले आहेत. राष्ट्रीय समाज नामक पक्षाचा उत्तरेत केवळ एकच उमेदवार आहे.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मात्र भरघोस आहे. त्यात उत्तरेतून 40 आणि दक्षिणेतून 38 जण नशीब आजमावत आहेत.

राखीव मतदारसंघ 30

उत्तर गोवा मतदारसंघातील हरमल, मोरजी, कोलवाळ, शिरसई, सुकूर, सांताक्रूज, चिंबल, सांत आंद्रे, मये आणि होंडा, तर दक्षिण गोवा मतदारसंघातील कवळे, बोरी, राय, दवर्ली, नावेली (निवडणूक नाही), सावर्डे, रिवण, शेल्डे, बार्शे आणि खोला, हे मतदारसंघ सर्वसाधारण गटांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत.

उत्तर गोवा मतदारसंघातील तोर्शे, शिवोली, अंजुणे, ताळगाव आणि केरी, तर दक्षिण गोवा मतदारसंघातील गिर्दोळी, कुडतरी, धारबांदोडा आणि सांकवाळ (बिनविरोध विजयी) हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत.

त्याशिवाय कळंगूट, रेईस मागूश, खोर्ली, लाटंबार्से, कारापूर सर्वण, बेतकी खांडोळा, वेलिंग प्रियोळ, वेळ्ळी, बाणावली, हे मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव असून त्यातील हळदोणे, पेन्ह द फ्रान्स, नगरगांव, कुर्टी आणि कोलवा, हे मतदारसंघ खास ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.

धारगळ हा एकमेव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तर पाळी, उसगांव गांजे, शिरोडा आणि कुठ्ठाळी हे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. नुवे आणि पैंगिण हे मतदारसंघ अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

नावेली व सांकवाळ वगळता अन्य सर्व मतदारसंघांसाठी उत्तरेत 641 तर दक्षिणेत 546 अशी एकूण 1187 मतदानकेंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यातील ताळगाव (2), चिंबल (4), कुर्टी (1) आणि दवर्ली (3) अशी एकूण 10 केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.

Related Stories

…तर काँग्रेसचे पतन निश्चित

Amit Kulkarni

राज्यातील 14 हजार हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली येणार

tarunbharat

पणजीत 19 व 20 रोजी नाटय़संगीत सोहळा

Omkar B

दाबोळी विमानतळावर प्रजासत्तकनिमित्त रोषणाई

Patil_p

हनुमान चालीसा तिचे सातत्याने पठण करा

Patil_p

कुंकळळी युनायटेड हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघ बैठक संपन्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!