Tarun Bharat

जि. प.च्या 300 शाळा होणार आदर्श

विकसित करण्यात येणाऱया शाळांमध्ये सिंधुदुर्गातील सहा शाळांचा समावेश

प्रत्येक शनिवारी दफ्तरमुक्त शाळाही उपक्रम राबविणार

विविध कौशल्य विकसित करणारी शाळा म्हणजे आदर्श शाळा

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

राज्यातील जिल्हा परिषदांच्या 300 शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्यात येणार आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सहा शाळांचा समावेश आहे. निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी 15 दिवसांमध्ये पुष्टी करण्याबाबत कळवायचे आहे. अभिप्राय प्राप्त न झाल्यास संमती गृहित धरून यादी अंतिम करण्यात येणार आहे. आदर्श शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय बाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहेत. अशा शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी दफ्तरमुक्त शाळा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

शिक्षणातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होणे हे आदर्श शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांतील अध्ययन फलनिष्पत्तीसह त्यांना सध्याच्या युगात विविध विषयांना सामोरे जाण्यासाठी नेतृत्वगुण विकसीत करून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी त्यांना विविध सहशालेय उपक्रमात (क्रीडा, भाषण, लेखन-अभिनय, गायन व अन्य) प्राविण्य मिळवून देणारी तसेच विविध क्षेत्रांतील कौशल्ये विकसित करणारी शाळा म्हणजे आदर्श शाळा.

भौतिक सुविधांच्या विस्तारास वाव

आदर्श शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय अशा भौतिक सुविधा, दळणवळणाचे रस्ते, भविष्यात विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यास इमारत व भौतिक सुविधांचा विस्तार करण्यास पुरेसा वाव असण्याची गरज आहे. या शाळांमध्ये पाठय़पुस्तकाच्या पलिकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील. विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे लिहिता-वाचता आले पाहिजे. वर्गात उभे राहून वाचन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. वाचनाचा सराव आवश्यक असून प्राथमिकस्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना त्यात वाचन, लेखन व गणिती क्रीया अवगत होणे अनिवार्य असणार आहे. येथे नवनिर्मितीला चालना देणारे, समिक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मूल्ये अंगी बाणविणे, सोबत काम करण्याचे कौशल्य, संभाषण कौशल्य यासारखी कौशल्ये जाणीवपूर्वक विकसीत करण्यात येणार आहेत.

आठवीचा वर्ग जोडण्यासही वाव

निवडण्यात आलेल्या या आदर्श शाळा शक्यतो किमान पहिली ते सातवीच्या जि. प. शाळा असणार असून त्यांना गरज पडल्यास आठवीचा वर्ग जोडण्यासाठी वाव असणार आहे. आदर्श शाळेकडे लोक आकर्षित होऊन इतर शाळा सोडून या शाळेत आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाठविण्यास तयार होतील. आदर्श शाळेत वातावरण प्रसन्न असावे. विद्यार्थ्यांना शनिवार, रविवार शाळेत यावे, असे वाटले पाहिजे. आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून स्वत:ला ज्ञानाची निर्मिती करता येईल. रचनात्मक व आनंददायी शिक्षणातून त्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विषयाचे शिक्षण अवगत करता येईल. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन मुलांना शिकवायचे आहे. आदर्श शाळेत शिक्षकांची काम करण्याची इच्छा असेल, तर तेथे 5 वर्षे काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.

शिकण्यासाठी ताणविरहीत वातावरण हवे!

विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ताणविरहीत वातावरण मिळायला हवे. पाठय़पुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलिकडे जाऊन त्यांना शाळेत, शाळेच्या परिसरातील  उपलब्ध साधन सामग्रीमधूनही विविध विषयांतील ज्ञान अवगत करता यावे, यासाठी आठवडय़ातून एकदा प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. यादीत बदल करायचा असल्यास 6 नोव्हेंबरपर्यंत कळवायचे आहे. जिल्हय़ाकडून अभिप्राय प्राप्त न झाल्यास शाळांना संमती असल्याचे गृहित धरून यादी अंतिम करण्यात येणार आहे.

जिल्हय़ातील सहा शाळांचा समावेश

जिल्हय़ातून या उपक्रमासाठी देवगड तालुक्यातील जामसंडे नं. 1, दोडामार्ग तालुक्यातील सातेरी जि. प. केंद्रशाळा साटेली-भेडशी, कणकवली तालुक्यातील खारेपाटण नं. 1, कुडाळ तालुक्यातील पावशी नं. 1, वैभववाडी तालुक्यातील लोरे – हेळेवाडी, तर मालवण तालुक्यातील आचरा नं. 1 या शाळांचा समावेश आहे.

Related Stories

राज्यस्तरीय कथा अभिवाचन स्पर्धेत अस्मिचे स्पृहणीय यश

NIKHIL_N

जुनाट वृक्षांचे होणार संवर्धन

NIKHIL_N

रत्नागिरी : कोरोना तपासणीसाठी शिक्षकांच्या रांगा

Archana Banage

देशातील तीन लाख ग्रामीण डाकसेवक 26 रोजी संपावर

NIKHIL_N

रायगड किल्याला भेट देणे हे प्रत्येक भारतीयांचा अभिमान

Patil_p

दापोली जोरदार पावसाचा सुरूवात

Patil_p
error: Content is protected !!