Tarun Bharat

जीवेत् शरद: शतम् मोदीजी

भारत स्वतंत्र झाला, त्याच सुमारास चीन, जपान, इस्राएल, दक्षिण कोरिया आणि जर्मनी यांनी शून्यातून पुन्हा उभे राहायला सुरुवात केली होती. सिंगापूर हा चिमुकला देशही आपल्याबरोबरच स्वतंत्र झाला. पण आज या देशांची स्थिती आणि भारताची स्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हे पहिल्यांदा मान्य करायला हवे. हे देश आपल्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. गेल्या सहा वर्षातील निर्णय पाहिले तर एका चहावाल्यापासून पंतप्रधानपदापर्यंत पोचलेल्या मोदींचे नेतृत्व आणि कर्तृत्व काय आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. जगात सर्वगुणसंपन्न कुणीच होऊ शकत नाही. त्यामुळे मोदीही चुकू शकतात आणि आपल्याकडे लोकशाही असल्याने त्यांच्या असलेल्या, नसलेल्या चुकांवर भरपूर चर्चाही होते आहे. मोदीभक्तांना वाटते की मोदी चुकूच शकत नाहीत, तर विरोधकांना वाटते की मोदींनी देशाला खड्डय़ात घालण्याशिवाय काहीही केलेले नाही.

‘मी रोज किलो दोन किलो शिव्या खातो व त्यामुळेच मी तंदुरुस्त राहतो, मला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते’ असे मोदी गंमतीने म्हणतात. केवळ एखाद्या लेखात त्यांच्याबद्दल लिहिणे अशक्मय असले तरी त्यांच्या काही वैशिष्टय़ांसह त्यांनी केलेल्या कामांच्या आढाव्याचा त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त केलेला हा छोटासा प्रयत्न. गेल्या साठ पासष्ट वर्षात नेहरू, मग इंदिराजी, राजीव गांधी, पुढे नरसिंहराव नी आता शेवटी मनमोहनसिंग अशा सगळय़ा महान नेत्यांमधल्या कुणालाही प्रत्येक घरात वीज पोचवावी, आरोग्यव्यवस्था सुधारावी, घराघरात गॅस पोचावा, दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्पाची सुरुवात करावी, देशात घराघरात शौचालय असावे, देशातल्या प्रत्येक माणसाकडे बँक अकाउंट असावे, देशात प्रत्येक क्षेत्रात  बोकाळलेला भ्रष्टाचार समूळ उखडण्यासाठी काही योजना राबवावी, गरीबातल्या गरीब माणसालाही विम्याचे संरक्षण मिळावे, देशात समान नागरी कायदा यावा, सरकारी सोयीसुविधा थेट लाभार्थ्याच्याच हाती पडतील अशी व्यवस्था आणावी, शस्त्रास्त्रांच्याबाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा, रामजन्मभूमीसारखे जटिल प्रश्न सुटावेत असे वाटले नसेल का? निश्चित वाटले असेल. या सर्व नेत्यांनी काही केले नाही असे म्हणणेही त्यांच्यावर अन्याय करणारेच होईल. उच्चपदी पोचल्यावर अनेक गोष्टी कराव्या लागतात, पण जेव्हा एखादा नेता अनेक कामे निस्वार्थीपणे आणि आपले शंभर टक्के योगदान देऊन करतो तेव्हा त्या नेत्याचे एक वेगळे स्थान आपोआपच तयार होते. तसे स्थान मोदींनी आपल्या सहा वर्षांच्या काळात पंतप्रधान म्हणून काम करताना नक्कीच मिळवले आहे. काही गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी इतर नेत्यांकडून जीव ओतून प्रयत्न केले गेले नाहीत, जे मोदींनी केले असे पहायला मिळते. काही अपरिहार्य कारणास्तव देशापासून वेगळा पाडणाऱया व तात्पुरत्या असलेल्या काश्मीर संदर्भातील 370 कलम काढून टाकावे असे सत्तर वर्षात कुणालाही का वाटले नाही? आठ दहा कोटी मुस्लिम भगिनींवर अन्याय करणारी तोंडी तलाक प्रथा रद्द करावी असे कुणालाही वाटले नाही. अजूनही अनेक जुने प्रश्न सोडवावे लागणार आहेत. पण मोदींनी झपाटय़ाने सुरुवात तर केली आहे. काय आहे हा झपाटा? गेल्या साठ वर्षात सत्ता राबवताना जर मागील सरकारांनी वरील मुद्यांची व्यवस्थित हाताळणी केली असती तर मोदींना लढावे लागले नसते, कदाचित पुढे येण्याची संधीही मिळाली नसती. देशात काँग्रेसने सगळय़ात जास्त काही केले असेल तर भ्रष्टाचार. त्यामुळे काँग्रेसने आपण काय केले यापेक्षा आपले काय चुकले याचा विचार अजूनही काँगेसने केला नाही तर या गौरवशाली पक्षाची अवस्था आणखी केविलवाणी होऊ शकेल.

 देशातील 60 नद्या जोडून संपूर्ण देशातील कोटय़वधी शेतकऱयांचे आयुष्य बदलू शकणारा रखडलेला नदी जोड प्रकल्प मोदी सरकारने तब्बल साडेपाच लाख कोटी खर्च करायची तयारी करून मार्गी लावला आहे. मोदी सरकारने आतापर्यंत 30 लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम तर निव्वळ विकासकामांवर खर्च करायचा निर्धार करून ‘सब का साथ सब का विकास, सबका विश्वास’ हे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. रेल्वेसाठी पावणे दहा लाख कोटी, रस्ते, महामार्ग, बंदरे यासाठी 12 लाख कोटी, बुलेट टेनसाठी 1.10 लाख कोटी आणि नदी जोड प्रकल्पासाठी साडेपाच लाख कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्याकडे हा प्रकल्प असल्याने यशाची खात्री आहे.  साडेपाच लाख कोटींच्या प्रकल्पाद्वारे देशातील 60 नद्यांना जोडल्यामुळे कमी पाऊस पडतो तिथे किंवा अतिवृष्टी होते अशा भागातील शेतकऱयांना हे वरदान ठरणार आहे. कालवे, तलाव बांधून अतिरिक्त पाण्याचा संचय केला जाईल. आठ कोटी सत्तर लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल आणि 34 गिगा वॅट  इतकी वीजनिर्मिती होईल. संपूर्ण देशभर 15 हजार कि.मी. लांबीच्या कालव्यांचे नेटवर्क उभे राहील आणि स्वस्त दळणवळणाचीही सोय होईल. दुष्काळ आणि पूर परिस्थितीवर रामबाण ठरणारा हा उपाय 15 वर्षापूर्वीच राबवला गेला असता तर आज शेतकऱयांवर कर्ज माफी मागायची, आत्महत्या करायची वेळच आली नसती. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा प्रकल्प युद्धपातळीवर पुढे नेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पहिला टप्पा कर्णावती-बेतवा, दमणगंगा-पिंजळ, पार तापी- नर्मदा नदी जोडणीपासून सुरूही झाला आहे. मोदीजींच्या प्रेरणेने 40 कोटी गरिबांची बँक खाती उघडली गेली, ज्याद्वारे कोरोनाच्या काळात भ्रष्टाचारविरहित थेट मदत पोचवणे शक्मय झाले, सात कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर, जवळपास सर्व गावांपर्यंत वीज व शौचालयांची सोय अशी खऱया गरिबांसाठीची कामे मोदींनी पूर्वापार चालत आलेल्या नोकरशाहीकडूनच करून घेतली हे विशेष.

कुठलीही सुट्टी न घेता रोज सोळा ते अठरा तास काम करणे हे तर त्यांचे आगळे वेगळे वैशिष्टय़. राम जन्मभूमीवरील कायदेशीर मंदिर उभारणी, ट्रिपल तलाक विरोधी कायदा आणि काश्मीर संदर्भातील 370 कलमाची समाप्ती, वन रँक वन पेन्शन हे जटिल प्रश्न सोडविण्याचे श्रेय निःसंशय मोदींकडे जाते. कोरोना साथीवर मात, चीन व पाकिस्तान प्रश्नांची यशस्वी सोडवणूक, रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यात त्यांना यश मिळावे अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा.

विलास पंढरी  – 9860613872

Related Stories

भूमिका आणि बहिष्कार

Patil_p

भंडारा अग्नितांडवाचा धडा

Patil_p

नवरत्नांची माळ

Patil_p

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या उभारणीचा विचार हवा

Patil_p

प्रहेलिका

Patil_p

शिवसेना-भाजपमध्ये ’बुलेट फॉर बुलेट’ कधीपर्यंत?

Patil_p