Tarun Bharat

जी-20 अध्यक्षपद मिळणे अभिमानास्पद

अतिमहत्वाचे उत्तरदायित्व असल्याचे जयशंकर यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जी-20 संघटनेचे अध्यक्षपद भारताला मिळणे हे अत्यंत अभिमानास्पद असून ते एक आव्हानात्मक उत्तरदायित्वही आहे, असे प्रतिपादन भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. 1 डिसेंबरला भारताने इंडोनेशियाकडून या संघटनेच्या अध्यक्षपदाचे सूत्रे एक वर्षासाठी आपल्याकडे घेतली. त्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात आले होते. 100 महत्वाची स्मारके या निमित्ताने प्रकाशमान करण्यात आली होती. तसेच अनेक स्थानी विभिन्न प्रकारे सोहाळय़ांचे आयोजन झाले होते. त्यानिमित्त जयशंकर यांनी हे प्रतिपादन केले.

हे अध्यक्षपद मिळणे ही साधीसुधी घटना नाही. ते एक महत्वाचे उत्तरदायित्व आहे. सध्याच्या अतिशय आव्हानात्मक काळात ते भारताच्या खांद्यांवर येत आहे. ही अद्वितीय घटना आहे. जगभरातील राजकारण आज एका जटील कालखंडातून वाटचाल करत आहे. महागाई आणि आर्थिक मंदीची समस्या साऱया जगाला भेडसावत आहे. अशा परिस्थितीत हे अध्यक्षपद भारताला मिळणे ही केवळ एक मुत्सद्दी औपचारिकता नसून खरेखुरे आव्हान आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

अनुभव जगाशी वाटून घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदाच्या काळात भारताचा कार्यक्रम काय असेल हे स्पष्ट केले आहे. या कालावधीत भारत सर्वसमावेशक, निर्णायक, महत्वाकांक्षी आणि कृतीशील पद्धतीने जगाला सामोरा जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. या कालावधीत भारताला संघटनेचे सदस्य असणाऱया देशांशी आणि संघटनेच्या बाहेर पण संघटनेशी संबंधित असणाऱया देशांशी निकटचा संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. भारत आपला आजवरचा अनुभव, शिकवण आणि आपले आदर्श जगाशी, विशेषतः विकसनशील देशांशी वाटून घेणार आहे. ज्या देशांचा आवाज आजवर ऐकला गेला नव्हता, त्या देशांनाही संधी देण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करणे हे भारताचे ध्येय राहील, असे वक्तव्य त्यांनी केले.

केवळ दिल्ली केंद्रीत नाही

भारतात यावेळी होणारी जी-20 शिखर परिषद केवळ दिल्लीकेंद्रीत असणार नाही. तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱयात तिचे पडसाद उमटतील अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हा केवळ दिल्लीतील राजनेत्यांचा नव्हे, तर सर्वसामान्यांचा कार्यक्रम वाटला पाहिजे अशा प्रकारे नियोजन करण्यात येईल. त्यामुळे या परिषदेचे महत्व सर्वसामान्यांना पटेल असेही प्रतिपादन त्यांनी केले.

Related Stories

राज्यपालांची भूमिका मार्गदर्शक अन् मित्रासारखी

Amit Kulkarni

13 वर्षांनी काश्मीरमध्ये एअर शो

Patil_p

पाकिस्तानातील बैठकीचे हुर्रियतला निमंत्रण

Amit Kulkarni

गोध्रा ट्रेन जळीतकांडातील दोषी फारुकला जामीन मंजूर

Abhijeet Khandekar

तातडीच्या लसीकरणासाठी डिसेंबर अखेरपर्यंत अनुमती

Patil_p

कोरोनाला रोखण्यासाठी ‘अश्वगंधा’ प्रभावी

Patil_p