Tarun Bharat

जुनाट वृक्षांचे होणार संवर्धन

गावनिहाय वृक्षांचे संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणने उचलली पावले

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

पर्यावरणदृष्टय़ा वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या अनेक सणांचा वृक्षांसोबत घनिष्ठ सबंध आहे. आपल्या पूर्वजांनी लावलेली किंवा आपोआप रुजून आलेली वर्षांनुवर्षांची झाडे आता कमी दिसून लागली आहेत. या जुन्या वृक्षांची तोड होऊ नये, यासाठी सामाजिक वनीकरणने पावले उचलली आहेत. या जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी अशा गावनिहाय मोठय़ा वृक्षांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गावनिहाय वटवृक्षांपासून ते चिंच, आंबा, पिंपळ, साग, जांभूळ, अर्जुन, मोह यासारख्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. दरम्यान, या नोंदीनंतर मोठाल्या वृक्षांच्या संवर्धनाच्या बदल्यात प्रतिवर्षी संबंधित शेतकऱयाला शासनाकडून काही रक्कमही मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, याबाबत सामाजिक वनीकरणचे सहाय्यक वनसंरक्षक एस. पी. बागडी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी याबाबतचे पत्र काढलेले आहे. याबाबत बागडी म्हणाले, शासनाच्या धोरणानुसार आपल्याकडे पर्यावरणदृष्टय़ा वृक्षांचे महत्व फारच मोठे आहे. तसेच आपल्याकडे वटपौर्णिमा, दसरा, गणेशोत्सव, गुढीपाडवा, हरतालिका अशा विविध सणांचा वृक्षांशी घनिष्ठ सबंध आहे. आपल्या पूर्वजांनी विविध प्रकारची झाडे लावली, ती जगवली, जोपासली. काही झाडे तर नैसर्गिकरित्या  आपोआपच रुजून आलेली आहेत. अनेक भागात अशाच प्रकारचे मोठमोठे वृक्ष आहेत. ज्यांच्यापासून सावली, पर्यावरण संरक्षण, चारा, पक्षांना निवारा अशा अनेक गोष्टींचा फायदा होत असतो. अशा वृक्षांचे संवर्धन, जतन व्हायला हवे. त्यांची तोड होऊ नये, यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगतिले.

कोलकत्यात 250 वर्षे जुना वृक्ष

आचार्य जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन कोलकाता येथील 250 वर्षे जुना वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष साधारणत: 4.27 एकरवर पसरलेला आहे. आंध्रप्रदेश येथील वटवृक्ष तर केरळमधील पेराम्बिकुलम व्याघ्र प्रकल्प परिसरातील कत्रिमारा सागवृक्ष अशी काही समृद्ध वृक्षांची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातही अशी प्राचीन आणि विस्तीर्ण झाडे गावोगावी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत अशा मोठमोठय़ा वृक्षांची तोड झाली किंवा होत आहे. असे वृक्ष पुन्हा निर्माण होण्यास वर्षानुवर्षे लागतात. दोनशे, अडीचशे वर्षांचे वयमान असलेले वृक्ष न तोडता संवर्धन केले तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. याच विचाराने सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

माहिती, आख्यायिका संकलित करणार!

याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणतात, हे महावृक्ष केवळ वयाने किंवा आकाराने मोठे नसून या वृक्षांची एक स्वतंत्र अशी परिसंस्था तयार केली आहे. अशा या समृद्ध वृक्षांची नोंदणी ही प्रेरणादायक ठरेल. या नोंदणीच्या माध्यमातून ही झाडे कुठे आहेत? त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे? याची माहिती गोळा होईल. या माहितीचा वापर करून या झाडांचे आपल्याला जतन करता येईल. तेथील जनसामान्यांच्या, पर्यावरणप्रेमींच्या, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून अशा नोंदी घेता येणे शक्य आहे. वनेतर क्षेत्रावर चिंच, आंबा, पिंपळ, साग, जांभूळ, अर्जुन, मोह यांसारखे जुने मोठे वृक्ष असू शकतात. त्यासाठी ही माहिती संकलित करण्यात येत आहे. यात जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हेनंबर, अक्षांश, रेखांश, वृक्षांची वेढी, उंची, साधारण वय तसेच त्याबाबत काही आख्यायिका असल्यास ती घेऊन माहिती संकलित करण्यात येणार आहे.

संवर्धनासाठी निधीही?

रम्यान, अशा वृक्षांची तोड होऊ नये यासाठी ही माहिती संकलित करण्यात आल्यानंतर या वृक्षांचे मालकांनी संवर्धन करावे, यासाठी मालकांना दरवर्षी काही रक्कम शासनाकडून वृक्षनिहाय मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरीही याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. माहिती संकलित झाल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Related Stories

हातपाटी वाळू उत्खनन अडकले ‘प्रक्रिये’त

Patil_p

गंगाराम शेळके यांच्या अपिलावर आज निर्णय

Anuja Kudatarkar

चिपळूणच्या प्रथमेश राजेशिर्केचा ‘युपीएससी’त झेंडा!

Patil_p

तोंडवळी ग्रामस्थांचे उपोषण तात्पुरते स्थगित

Anuja Kudatarkar

रिफायनरी प्रकल्प कोकणासह राज्याला संजीवनी देणारा

Patil_p

चक्क रुग्णालयात अवतरला साप

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!