Tarun Bharat

जुन्या पुस्तकातले जग

एखाद्या निवांत दिवशी फिरायला निघालो तर ठाऊक असलेल्या रद्दीच्या दुकानांसमोरून जाण्याचा मोह मला टाळता येत नाही. एकीकडे वर्तमानपत्रांच्या रद्दीचे ढीग व्यवस्थित रचलेले आढळतात. दुसरीकडे थोडी जागा करून रद्दीत विकायला आलेली पुस्तके, मासिके विकायला मांडलेली दिसतात. त्या ढिगाऱयासमोर एकदा ठाण मांडले की एखादा तास कुठे आणि कसा जातो हे समजतही नाही.

जुनी पुस्तके म्हणजे पेरी मेसन नायक असलेल्या इंग्रजी रहस्य कथा, त्यातला तगडा वकील नायक पेरी मेसन, त्याची सहाय्यक डेला स्ट्रीट. खुनाचा आरोप असलेल्या अशीलाला संकटातून वाचवायला हे सदैव सज्ज असतात. त्यांच्या मदतीला पॉल डेक हा गुप्तहेर असतो. आगाथा ख्रिस्तीच्या कथेत हक्मर्युल पायरो गुन्हेगाराला लीलया पकडून देतो. मराठीत बाबुराव अर्नाळकरांचा झुंजार हेच कारनामे आपल्या विजया या पत्नीसह करतो. शिवाय आनंदराव या पोलीस अधिकाऱयाची वेळोवेळी थट्टा करतो. चंद्रवदन हा नायक अंधारात काळा पहाड होऊन वावरतो आणि त्याला कोणीही हरवू शकत नाही. या साऱया नायकांचे एक वैशिष्टय़ म्हणजे गुन्हेगारांना पकडू नये म्हणून यांच्यावर कधीही राजकीय दबाव येत नाही!

शाळेत असताना चांदोबा मासिक आणि त्यातल्या रंगीबेरंगी चित्रांनी व रसाळ कथांनी आम्हाला वेड लावले होते. चांदोबामधील लेखनात व्याकरणाच्या अगणित चुका असत. पण त्यामुळे आमचे मराठी कधी बिघडले नाही. त्यात अनेक वर्षे दरमहा येणारी ‘परोपकारी गोपाळ’ नावाची कथामाला वाचून आम्ही काही परोपकारी घडलो नाही! रामायण महाभारताची असंख्य पारायणे चांदोबामुळे घडली. विक्रम-वेताळाच्या कथेतील ‘पण विक्रमार्काने आपला हट्ट सोडला नाही’ हे सुरुवातीचे आणि ‘अशा रीतीने राजाचा मौनभंग होताच वेताळ…’ हे शेवटचे वाक्मय आम्हाला मुखोद्गत झाले होते. पण तरी त्या कथांचा कधीही कंटाळा आला नाही.

रामायणातील झोपणारा कुंभकर्ण आणि त्याला जागा करण्यासाठी राक्षसांनी केलेले प्रयत्न, अंगदाने केलेली रावणाची फजिती वाचून आम्ही पुनः पुन्हा हसलो होतो. महाभारतातील भीमाच्या सगळय़ा कथांमध्ये एक वाक्मय अतिशय आवडलेले, बकासुरासाठी आणलेले अन्न भीम खात असताना बकासुर त्याला ठोसे मारतो तेव्हा भीम म्हणतो, “छान छान, बकासुरा! खासे अंग रगडते आहे!’’

आणि ह. ना. आपटय़ांच्या ऐतिहासिक, गो. ना. दातारांच्या चित्तथरारक कादंबऱया… त्यांच्यावर तर एक प्रदीर्घ लेख लिहायला हवा. 

Related Stories

आपत्तीनंतर उदंड झाले दौरे

Amit Kulkarni

काँग्रेसची 136 वर्षे

Patil_p

आधी संचारबंदीची पुकार, नंतर लगेचच माघार

Omkar B

प्राणिक हीलिंग आणि व्यवसाय

Patil_p

माझे दत्तक वडील

Patil_p

जम्मू-काश्मीर निवडणुकीचा अन्वयार्थ

Omkar B