ऑनलाईन टीम
कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्था ठप्प झाली असतानाच देशवासियांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून जुलै महिन्यात जीएसटी महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. जुलै महिन्यात जीएसटीमधून १,१६,३९३ कोटींचा विक्रमी महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ३३ टक्के वाढ झाली आहे. या आकडेवारीने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थ मंत्रालयाने आज रविवारी जीएसटीची आकडेवारी जाहीर केली.
सलग आठ महिने जीएसटी कलेक्शन एक लाख कोटींच्या पार जमा होत होता. मात्र गेल्या महिन्यात जीएसटीचं कलेक्शन १ लाख कोटींच्या खाली जमा झालं होतं. मात्र या महिन्यान पुन्हा एकदा जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. यात राज्याची कर रक्कम २८ हजार ५४१ कोटी आणि केंद्राचा वाटा २२ हजार १९७ कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी ५७ हजार ८६४ कोटी आहे. एकीकृत जीएसटीत २७ हजार ९०० कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर ७ हजार ७९० कोटी जमा झाला आहे. ८१५ कोटी आयतीवरील उपकरातून मिळाला आहे. जीएसटीची रक्कम १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान जीएसटीआर-३ बी च्या माध्यमातून जमा झाला आहे.
जुलै २०२० च्या तुलनेत ३३ टक्के अधिक कर जमा झाला आहे. जुलै २०२० मध्ये जीएसटी ८७ हजार ४२२ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार १४७ कोटी, तर राज्याचा वाटा २१ हजार ४१८ कोटी होता. तर एकीकृत जीएसटी ४२ हजार ५९२ कोटी रुपये इतका होता.

