Tarun Bharat

‘जेल पर्यटन’ प्रकल्पात रत्नागिरी विशेष कारागृह!

जान्हवी पाटील / रत्नागिरी

राज्यातील कारागृहे ही स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये ‘प्रिझन टुरिझम’ची संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात येरवडा कारागृहापासून ‘जेल पर्यटन प्रकल्पा’ने होणार आहे. या प्रकल्पामध्ये रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाचाही समावेश करण्यात आला आहे. जेल पर्यटनाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच घोषणा केली. येत्या 26 जानेवारीला येरवडा जेल प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईनद्वारे करणार आहेत. त्यानंतर नागपूर कारागृह, रत्नागिरी कारागृह अशा टप्याटप्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे 16 मे 1921 ते 23 सप्टेंबर 1923 या कालावधीपर्यंत रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात होते. तसेच मुळशी सत्याग्रहातील अग्रणी क्रांतीकारक सेनापती बापट यांनाही याच कारागृहात 24 नोव्हेंबर 1931 ते 31 डिसेंबर 1935 या काळात ठेवण्यात आले होते. मात्र वीर सावरकरांना 6.5 फूट बाय 8.5 फूट एवढ्याच आकाराच्या खोलीत ठेवण्यात आले होते. सावरकरांची इतकी धास्ती ब्रिटिशांना होती. सध्या या खोलीत सावरकर यांच्या गळ्यात अडकवण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे आदी वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. ही खोली व त्याच्या बाहेरचा भाग स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर 1983 साली कोठडीत सावरकरांची स्मृती म्हणून ठेवलेल्या भव्य तैलचित्राचे अनावरण करण्यात आले होते. या कारागृहात 750 चित्रे आढळली. यात 200 चित्रे स्मारकात लावण्यात आली आहेत.

जानेवारी 2018 मध्ये कारागृहात झालेल्या बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी क्रांतिकारकांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या कारागृहाबाबत विशेष आस्था दाखवून जुन्या कागदपत्रांची माहिती घेण्याची सूचना केली होती. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यासाठी कारागृहात 4 ते 5 तास ठाण मांडून या कागदपत्रांची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. यावेळी 1908 पासूनची काही गोपनीय कागदपत्रे हाती लागली. वीर सावरकर व सेनापती बापट यांच्याबरोबरच कराचीचे क्रांतिकारक स्वामी गोविंदानंदही रत्नागिरीच्या कारागृहात होते. या तीन क्रांतिकारकांच्या कारागृहातील वास्तव्यादरम्यानच्या गोपनीय कागदपत्रांचा ऐतिहासिक खजिना कारागृह प्रशासनाच्या हाती लागला. शंभर वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक कागदपत्रे म्हणजे इतिहासातील महत्त्वाचा ठेवा ठरणार असून त्यात महात्मा गांधींजींनी सेनापती बापट यांना पाठवलेली तार व अन्य पत्रांचाही समावेश आहे. 110 वर्षापूर्वीची कागदपत्रे आजही सुस्थितीत आहेत. ही कागदपत्रे लोकांना पाहता यावी, अभ्यास करता यावा, यासाठी एक प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.

पर्यटक म्हणून 50 व्यक्तींना प्रवेश देणार

जेल पर्यटन भेटीसाठी विद्यापीठ, महाविद्यालय व शाळा यांचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था व नोंदणीकृत सामाजिक संस्थांचे सदस्य पात्र असतील. पर्यटक म्हणून भेट देण्याच्या परवानगीचे अधिकार संबंधित कारागृहाचे अधीक्षक व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असतील. भेटीसाठी किमान 7 दिवस अगोदर अधीक्षकांकडे अर्ज करून परवानगी घेतील. परवानगी देतेवेळी अधीक्षकांडे अर्ज करावा लागणार आहे. परवानगी देतेवेळी अधीक्षक दिनांक ठरवून देतील. या भेटीची वेळ ही दुपारी 12 ते 3च्या दरम्यान असणार आहे. पर्यटक म्हणून भेटीसाठी एका दिवशी जास्तीत-जास्त 50 व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.

Related Stories

आजपासून आठवडाभर ‘कडक’ लॉकडाऊन

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात २१ कोरोनामुक्त,तर १० पॉझिटिव्ह

Archana Banage

आठ लाखाच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकासह सरपंचावर गुन्हा

Patil_p

Ratnagiri : गुहागरात अधिकाऱ्यास ७७ हजारांचा ऑनलाईन गंडा!

Abhijeet Khandekar

दिवाणखवटीतील तरूणाचा बीड येथे अपघाती मृत्यू

Archana Banage

दोन वर्षानंतरही खुनाचा तपास शून्य

NIKHIL_N