Tarun Bharat

‘जैश’ कमांडरसह 5 दहशतवादी ठार

सुरक्षा दलाचा दहशतवाद्यांवर प्रहार

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीरमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या दोन चकमकीत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी रविवारी दिली. या चकमकींच्या माध्यमातून काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा येथे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानी याच्याव्यतिरिक्त अन्य तीन दहशतवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. दुसरी चकमक बडगामच्या चिनार-ए-शरीफ भागात झाली असून तेथे एक दहशतवादी मारला गेला. सदर दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा असून त्याच्याकडून एके-56 रायफल जप्त करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांनी शनिवारी रात्री उशिराने बडगाम आणि पुलवामा जिल्हय़ात शोधमोहीम हाती घेतली होती. दक्षिण काश्मीरच्या पुलवामाच्या नायरा भागात आणि मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्हय़ातील चरार-ए-शरीफ भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच कारवाई करत, सुरक्षा दलांनी परिसर घेरण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा कर्मचारी शोध घेत असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक सुरू झाल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

‘जैश’चा कमांडर जाहिद वानी ठार

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडर जाहिद वानी हा या चकमकीत ठार झाला आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी घटनेत जैशचा कमांडर जाहिद वानीचाही हात असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दल जाहिद वानीच्या मागावर होते.

तीन दहशतवाद्यांना अटक

या चकमकीपूर्वी गांदरबल पोलिसांनी 24 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या 115 बटालियनच्या पथकांसह राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाच्या रेझिस्टन्स प्रंटशी (टीआरएफ) संबंधित आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि दोन चायनीज ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. फैसल मंजूर, अझहर याकूब आणि नसीर अहमद दार अशी या तिघांची नावे आहेत.

अनंतनागमध्ये पोलीस कर्मचाऱयाची हत्या

दहशतवाद्यांनी शुक्रवारी अनंतनागमध्ये एका पोलिसाची गोळय़ा झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची अनंतनागमधील बिजबेहारा येथील तबला भागातील हसनपोरा येथील त्यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. घनी यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

2021 मध्ये काश्मीरमध्ये 171 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरात सातत्याने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवाया सुरू आहेत. या कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जात आहे. या संघर्षात 2021 मध्ये 171 दहशतवादी मारले गेले आहेत. मृतांमध्ये 19 पाकिस्तानी दहशतवादी आणि 152 स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या 200 पेक्षा कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या चकमकींमध्ये 24 दहशतवादी मारले गेले आहेत. यापैकी 5 पाकिस्तानी आहेत. राज्यात आणि सीमारेषेवर करण्यात आलेल्या कारवायांमध्ये मुख्यत्वेकरून पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सहभाग दिसून येत आहे.

Related Stories

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध : अमित शहा

prashant_c

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.44 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

विशेष न्यायालयाकडून येडियुराप्पांना समन्स

Patil_p

विविध संघ-संस्थांतर्फे बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

Patil_p

बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी ः चिराग पासवान

Patil_p

सैन्यप्रमुखांचा ऐतिहासिक दौरा आजपासून

Patil_p