Tarun Bharat

जो आवडीने विष प्याला

बलरामदादा श्रीकृष्णाला म्हणाले- कृष्णा! आपल्या नातेवाईकाची रणामध्ये विटंबना करू नये. तुझ्या या चुकीच्या वर्तनाने क्षत्रियधर्माला बोल लागला. सोयऱयाने, बंधूने दंड करण्यास योग्य असा अपराध केला तरी त्यास दंडु नये. पण तू तर रुक्मीला ठार मारण्यापेक्षाही वेदनादायक, अवमानकारक शासन केलेस.

इतरांपासोनि अन्याय झाला। तो आपण पाहिजे क्षमा केला। शेखीं तवां सोयरा दंडिला। बोल लागला निजधर्मा।। जो आवडीने विष प्याला। तो आपआपणा मारक जाला। त्या अन्याया दंड नाही वहिला। घात केला निजकर्मे।। यालागीं प्रवर्ते जो अश्वर्मासी। तेणेंचि कर्मे दंडिजे त्यासी। मेलेंचि तुं कां मारूं पाहसी। रुक्मियासी जाऊ दे।।

मेलियासीच मारणे। हेंचि आम्हां लाजिरवाणे।

विनोद न करावा मेहुणेपणे। सोडूनि देणें सर्वथा।।

बलरामदादा कृष्णाला पुढे म्हणाले-कृष्णा! इतर कोणीही अपराध केला तरी आपण त्याला क्षमा करावी. इथे तर तू आपल्या सोयऱयालाच शासन केलेस.

 त्यामुळे आपल्या धर्माला बोल लागला. जो आवडीने विष पितो तो स्वतःलाच मारक होतो. त्याला वेगळा दंड, शासन देण्याची गरजच काय? त्याचे स्वतःचेच कर्म त्याला घातक ठरते. यामुळे जो अधर्माने वागतो ते कर्मच त्याला दंड शासन करते. मेलेल्याला तू आता का मारू पाहतोस. रुक्मीला सोडून दे. त्याला आता जाऊ दे. मेलेल्यालाच मारणे हे आपल्याला लाजिरवाणे आहे. मेहुण्याबरोबर असा जीवघेणा विनोद करू नये. त्याला सोडून दे.

सवेंचि म्हणे रुक्मिणीसी। कठिण कर्म क्षत्रियांसी।

उल्लंघु न करवे आम्हांसी।

निजधर्मासी सर्वथा।।विधात्याने नेमिला नेम।

क्षत्रियांचे अघोर कर्म।दारुण मांडिलीया संग्राम।

आपपर न म्हणावा।।समरंगणीं सन्नद्धू।

सन्मुख आलिया पिता बंधू।रणांगणी करिता वधू।

नाहीं बाधू क्षत्रियां।। ऐसें जाणूनि रुक्मिणी।

खेद न करी वो मनीं।

सवेंचि म्हणे शाङ्गपाणी।

विरुद्ध करणी तुवां केली।।

राज्यलोभें श्रीमदाध।

तयासी उपजे कामक्रोध।

तेणें लोभें होऊनि मंद।

थोर विरुद्ध आचरती।।

आपुलें राज्य जाता। कीं पुढिलांचे राज्य घेतां। तेणें स्वार्थे क्रोध चित्ता।

उठे सर्वथा अनिवार।। नातरी वृत्तिभूमिउच्छेदू।

होता सज्ञान होय मंदु। तोही करू लागे विरोधु। निंदानुवादू द्वेषाचा।।

त्याचवेळी बलरामदादा रुक्मिणीला म्हणाले- रुक्मिणी! क्षत्रियाचा स्वधर्म मोठा कठीण आहे. त्याचे उल्लंघन आमच्याकडून होणार नाही. विधात्याने प्रत्येकाला आपले स्वकर्म करण्याचा आदेश दिला आहे.

 त्याप्रमाणे क्षत्रियाने युद्ध करताना आप पर असा भेदभाव करू नये. समरांगणात समोर शत्रू म्हणून प्रत्यक्ष बंधू अगर पिता जरी आला तरी त्याचा वध केल्यास क्षत्रियाला कोणतेही पाप लागत नाही. म्हणून रुक्मिणी तू खेद करू नको.

Related Stories

मनसेचा नवा झेंडा वादात, संभाजी ब्रिगेडचा पाेलिसांकडे तक्रार अर्ज

prashant_c

यापुढे सरकारी प्रशिक्षण बार, रेस्टॉरंटमध्ये ठेवा : आशिष शेलार

prashant_c

शेतकऱयांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतुद

prashant_c

माजी सैनिकांकडून सीडीएसची प्रेरणा

Patil_p

सुभाषबापू देशमुख यांच्याकडून वचनपूर्तीला सुरवात

Archana Banage

उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन

prashant_c