Tarun Bharat

ज्याचे त्याचे अर्थशास्त्र

Advertisements

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आसपासचे बरेच जग उद्ध्वस्त झाले आहे. हातावर पोट असलेल्यांचे हाल झाले. खाजगी नोकऱया करणाऱयांचे हाल झाले. ज्याची त्याची अर्थशास्त्रे कोलमडली. आमची सखुबाई चार महिने कामावर येऊ शकली नाही. आम्ही घराबाहेर पडू शकलो नाही. शेजारच्या दुकानात मिळतील त्या वस्तूंवर घर चालवायला शिकलो. वेळ आली तेव्हा बिनदुधाचा चहा प्यायला शिकलो. त्या काळात सखूबाईला निम्मा पगार द्यायचो. तो न्यायला येताना ती फोन करून विचारायची, येताना तुमच्यासाठी काही खरेदी करू का? आम्ही यादी द्यायचो. ती सामान आणायची. पगाराचे आणि सामानाचे पैसे घेऊन जायची. दारातच उभी राहून चार चांगल्या वाईट बातम्या सांगायची. कधी व्हॉट्सअपवर आलेले विनोदी वैद्यकीय सल्ले गंभीरपणे सांगायची. आम्ही तिला त्या सल्ल्यांपासून परावृत्त करायचो.  

लॉकडाऊन संपला. सखुबाई नियमित येऊ लागली आहे. आता तिची आणि आमची मानसिक स्थिती थोडी ताळय़ावर आली आहे. कामं होत असतानाच मोकळेपणाने गप्पा होतात.

परवा तिच्या मैत्रिणीची हकिकत समजली. मैत्रीण विधवा आहे. दोन छोटी मुलं आहेत. ब्यूरोमधली परिचारिका. मध्यंतरी तिला कामच नव्हतं. आणि दुष्काळात तेरावा महिना यावा तशी तिची सासूच घरात पाय घसरून पडली. कंबरेचं हाड दुखावलं. लॉकडाऊनच्या गडबडीत धावपळ करून तपासण्या झाल्या. सासूचं वय लक्षात घेता ऑपरेशन धोक्मयाचं आणि मुख्य म्हणजे महाग… सासू घरातल्या एका कोपऱयात पलंगाला खिळली. सारे व्यवहार अंथरुणातच. ही सासूचं नर्सिंग करायला लागली. 

लॉकडाऊन संपल्यानंतरची गोष्ट. मैत्रिणीला एका श्रीमंत वस्तीत तिथल्या बजेटनुसार काम मिळालं. तिनं शेजारच्या मैत्रिणीला नियमित पैसे देऊन सासूची जबाबदारी दिली.

सकाळी ती लवकर उठून सासूला स्नान घालते. कपडे बदलून चार घास खाऊ घालते आणि ‘डय़ूटीवर’ जाते. मी शंका विचारली,

“पैसे घेऊन दुसऱया व्यक्तीची  शुश्रुषा करायची आणि आपल्या व्यक्तीसाठी दुसरी बाई नेमायची. यात फायदा काय?’’

“दुसऱया व्यक्तीचं करताना ब्यूरोच्या रेटने पैसे मिळतात. सासूचं करणारी बाई कमी पैशात करते. त्यातून उरलेल्या पैशात घर चालवायचं.’’ पिकासोला म्हणे “तुमच्या घरात इतरांची चित्रं का लावलीत?’’ असं विचारल्यावर तो म्हणाला होता, “माझी चित्रं घरात लावायला परवडत नाही.’’ खरं खोटं, देव जाणे. सखुबाईचा मात्र किस्सा नाही, हकिकत आहे, आणि हृदयस्पर्शी हकिकत आहे.

Related Stories

श्यामरंग

Patil_p

महाराष्ट्रात हस्तक्षेपाची केंद्राला संधी!

Patil_p

मिसळ आणि पाव

Patil_p

पाककृती अशी असते

Patil_p

अभाग्या कायसें हें मागणें

Omkar B

वरिलें आम्हांतें अनुचित हें

Patil_p
error: Content is protected !!