Tarun Bharat

झगडणाऱया राजस्थान रॉयल्सची आज मुंबईविरुद्ध ‘लिटमस टेस्ट’

सलग दोन पराभवांची मालिका खंडित करण्याचा रोहितसेनेचा प्रयत्न

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स आज (दि. 29) झगडणाऱया राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुंबईला यासाठी मध्यफळीतील चिंतांवर सर्वप्रथम मार्ग काढावा लागणार आहे. मुंबईला यापूर्वी सलग दोन सामन्यात पराभव पत्करावे लागले असून येथे त्यांना नव्याने सुरुवात करावी लागेल. मागील लढतीत त्यांना पंजाब किंग्सने चेन्नईत नमवले होते. आजच्या लढतीला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने या मोसमात आतापर्यंत सलग तीन पराभव पत्करले असून मागील लढतीत केकेआरला 6 गडी राखून नमवले होते, त्या विजयाची येथे पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (201) उत्तम प्रारंभ करण्यात यशस्वी ठरला असला तरी याचे त्याला अद्याप मोठय़ा खेळीत रुपांतर करता आलेले नाही. रोहितप्रमाणेच त्याचा सहकारी सलामीवीर क्विन्टॉन डी कॉकला (47) सूर सापडणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

सुर्यकुमार यादव (154), इशान किशन (73), हार्दिक पंडय़ा (36), कृणाल पंडय़ा (29), केरॉन पोलार्ड (65) हे मुंबईचे मध्यफळीतील फलंदाज मात्र अद्याप बहरात आलेले नाहीत. गोलंदाजीच्या आघाडीवर ट्रेंट बोल्ट (6 बळी), जसप्रित बुमराह (4 बळी) प्रभावी ठरले आहेत. लेगस्पिनर राहुल चहर (9 बळी), कृणाल (3 बळी) यांनीही उत्तम मारा केला आहे. पोलार्डला पाचवा किंवा सहावा गोलंदाज म्हणून संधी दिली गेली असून हार्दिक पंडय़ा फक्त फलंदाज या नात्याने खेळत आहे. मुंबईचा संघ या लढतीत जयंत यादवऐवजी ऍडम मिल्नेला खेळवण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), ऍडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मार्को जान्सन, मोहसिन खान, नॅथन काऊल्टर नाईल, पियुष चावला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), राहुल चहर, सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मार्कंडे, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकरिया, केसी करिअप्पा, कुलदीप यादव, आकाश सिंग.

सामन्याची वेळ दुपारी 3.30 पासून.

राजस्थान रॉयल्ससमोर असंख्य अडचणींचा डोंगर

जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन व ऍन्डय़्रू टायसारखे विदेशी खेळाडू गैरहजर असल्याने राजस्थानचा संघ बराच अडचणीत आहे. राजस्थानला अद्याप सलामीवीरांच्या अपयशाचा पेचही सोडवता आलेला नाही. मनन वोहरा (42 धावा) व यशस्वी जैस्वाल (22 धावा) यांना मोठी खेळी साकारता आलेली नाही. कर्णधार संजू सॅमसनने संघातर्फे सर्वाधिक 187 धावांचे योगदान दिले असून त्याला इंग्लिशमन जोस बटलरची समयोचित साथ मिळणे महत्त्वाचे असणार आहे.

शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग यांना मध्यफळीत उपयुक्त योगदान द्यावे लागेल. अष्टपैलू ख्रिस मॉरिस (9 बळी व 48 धावा) अद्याप आपला लौकिक सिद्ध करु शकलेला नाही. डावखुरा फिरकीपटू चेतन साकरियाने आतापर्यंत 7 बळी घेतले असून अनुभवी जयदेव उनादकट (4 बळी), मुस्तफिजूर रहमान (4 बळी) यांच्याकडून आणखी तिखट मारा अपेक्षित आहे. तिघे डावखुरे जलद गोलंदाज आणि ख्रिस मॉरिसवर या संघाची भिस्त असेल. लेगस्पिनर राहुल तेवातियाला 5 सामन्यात केवळ एकच बळी घेता आला असून आणखी एक लेगस्पिनर श्रेयस गोपालची पाटी दोन्ही सामन्यात कोरी राहिली आहे. ही लढत दुपारी खेळवली जाणार असल्याने यात डय़ू फॅक्टर असणार नाही.

Related Stories

रद्द झालेल्या सामन्यात जेमिमाची फटकेबाजी

Amit Kulkarni

इंग्लंडच्या पहिल्या डावात जॅन्सेनचे पाच बळी

Patil_p

समशेरबाजी स्पर्धेत भवानी देवी विजेती

Patil_p

भारताचे पात्र फेरीचे फुटबॉल सामने लांबणीवर

Patil_p

बाबर आझम, ऍलीसा हिली महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

लिसेस्टरशायरशी नवीन उल हक करारबद्ध

Patil_p